Join us   

गरोदरपणात कोरोना झाला तर? गरोदरपणात कोरोनाची लस घ्यावी का, त्याचे काय फायदे-तोटे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:51 PM

युनिसेफचे तज्ज्ञ सांगतात, कोरोनाकाळातल्या गरोदरपणात घ्यायची काळजी आणि लस घेण्यासंदर्भात  असलेल्या गैरसमजांची उत्तरं..   

ठळक मुद्दे कोविन संकेतस्थळावर जाऊन गरोदर स्त्रियांनी इतरांप्रमाणे आपलं नाव लसीकरणासाठी नोंदवावं आणि आपल्या जवळच्या केंद्रावर सोयीच्या वेळी स्वत:च्या आणि बाळाच्या सुरक्षेसाठी लसीकरण करून घ्यावं.

गरोदर महिला, कोरोनाकाळातलं गरोदरपण, कोरोना होण्याची धास्ती, घराबाहेर जाण्याची भीती यासाऱ्यामुळेही गरोदरपणात कोरोनातून बचाव कसा करायचा, कोरोना लस घ्यायची की नाही, बाळंतपणानंतर घ्यायची का? कोरोना होवून गेला असेल तर लस घ्यायची का? यासंदर्भात अनेकींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याचीच ही उत्तरं.. युनिसेफच्या तज्ज्ञांनी दिलेली..

गरोदर स्त्रियांनी कोविड – १९ लस का घ्यावी?

गरोदर असल्यामुळे कोविडची लागण होण्याचा धोका वाढत नाही. बहुतांश गरोदर महिलांना सौम्य आजार होईल किंवा त्यांच्यात लक्षण दिसणार नाही. परंतु त्याचं स्वास्थ्य झपाट्याने कमी होऊ शकते त्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोविड होऊ नये यासाठी त्यांनी स्वत:चं संरक्षण करण्यासाठी सर्व प्रतिबंधांचं पालन करावं त्यात लसीकरणाचाही समावेश आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीने लस घ्यावी.

कोविड होण्याची जास्त जोखीम कुणाला असते?

आरोग्यसेविका किंवा आघाडीवर काम करणाऱ्या महिला, कोविड लागणीचं प्रमाण जास्त असेलेले समुदाय. सतत घराबाहेर राहावं लागतं अशा व्यक्ती. शारीरिक अंतर राखता येणार नाही अशा घरात दाटीवाटीने राहणारी माणसं.

कोविडचा गरोदर स्त्रीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

बहुतांश ९० टक्क्याहून जास्त गरोदर स्त्रियांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत नाही. खूप कमीजणींचं आरोग्य झपाट्याने खालावतं. ज्या स्त्रियांमध्ये कोविडची लक्षणं आढळतात त्यांना गंभीर आजार किंवा मृत्युचं भय असतं. आजार गंभीर झाला तर इतर रुग्णांप्रमाणे गरोदर महिलांनाही रुग्णालयात भरती व्हावे लागते. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, हाता- पायावर गुठळ्या होण्याची प्रवृत्ती, पस्तीसहून अधिक वय असलेल्या गरोदर स्त्रियांना कोविडची लागण झाल्यावर गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.

गरोदर स्त्रीला कोविड झाला तर गर्भाला काय धोका असतो?

बहुतांश म्हणजे कोविड पॉझीटीव्ह मातांची ९५ टक्क्याहून जास्त मुलांचं जन्माच्या वेळी स्वास्थ्य चांगलं असतं. काही केसेसमध्ये कोविड संसर्गामुळे मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. बाळाचं वजन २.५ किलोहून कमी असू शकतं आणि क्वचित बाळ जन्मण्याअगोदर मरू शकतं.

गरोदर स्त्रीला अगोदरच कोविड झालेला असेल तर तिने कधी लस घ्यावी?

सध्याच्या गरोदरपणात महिलेला कोविड १९ची लागण झालेली असेल तरी बाळंतपणानंतर लगेच तिला लस दिली जावी.

कोविड लसीचे ती स्त्री आणि गर्भावर काही दुष्परिणाम होतात का?

सध्या उपलब्ध असेलेल्या सर्व लसी सुरक्षित असून इतर व्यक्तींप्रमाणे ते गरोदर स्त्रियांचं कोविडच्या आजारापर्यंत संरक्षण करतात. इतर कोणत्याही औषधाप्रमाणे लसीचेही काही दुष्परिणाम आहेत परंतु ते सौम्य स्वरूपाचे असतात. लसीकरण झाल्यावर तिला थोडा ताप येऊ शकतो, इंजेक्शन दिलेली जागा दुखू शकते आणि १-३ दिवस अस्वस्थ वाटू शकतं. माता किंवा बाळावर लसीचे विपरीत परिणाम होतात असं अजूनतरी आढळलेलं नाही. अगदी क्वचित १ ते ५ लाखांमध्ये एखाद्या स्त्रीला लस घेतल्यानंतर २० दिवसांमध्ये खालील लक्षणं दिसू शकतात. त्यावर तातडीने उपाय केले जावेत. १. दम लागणे/श्वसनाला त्रास, २. छातीत दुखणं, ३. सतत पोट दुखणे त्याबरोबपडणंर उलट्या होणं किंवा न होणं,४. हात-पाय दुखणं, सुजणं ( हात किंवा पोटऱ्या),५. एखादा भागावर तीव्र दुखणं अथवा इंजेक्शन दिलेल्या भागाशिवाय त्वचेवर जखम होणं ६. अशक्तपणा, हात पाय गळून जाणं किंवा शरीराची विशिष्ट बाजू लुळी पडणं. ७. फिट्स येण्याचा पूर्व इतिहास नसताना उलट्यासह अथवा उलट्या विना फिट्स येणं. ८. डोकेदुखीचा पूर्व इतिहास नसताना उलट्यासह अथवा उलट्या विना सतत तीव्र डोकेदुखी. ९. कोणत्याही ठराविक कारणाशिवाय सतत उलट्या होणं. १०. डोळे दुखणं किंवा धूसर दिसणं. ११.इतर कोणतंही लक्षण किंवा आजार जो त्या महिलेला किंवा कुटुंबियांसाठी चिंतेची बाब असेल.

गरोदर महिलेने लस घेतल्यावर कोणती काळजी घ्यावी?

गरोदर महिलेने आणि त्याच्या कुटुंबीयांनी स्वत:चं आणि आजूबाजूच्या लोकांचं कोविडपासून संरक्षण करण्यासाठी कोविड सुसंगत वर्तन कायम ठेवावं. दुहेरी मुखपट्टी वापरावी, सतत हात स्वच्छ ठेवावे आणि शारीरिक अंतर राखावं. कोविन संकेतस्थळावर जाऊन गरोदर स्त्रियांनी इतरांप्रमाणे आपलं नाव लसीकरणासाठी नोंदवावं आणि आपल्या जवळच्या केंद्रावर सोयीच्या वेळी स्वत:च्या आणि बाळाच्या सुरक्षेसाठी लसीकरण करून घ्यावं.

(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)

टॅग्स : कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याप्रेग्नंसीगर्भवती महिला