Join us   

गरोदरपणात दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष महागात पडू शकतं! गरोदरपणात दातांची काळजी कशी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 7:06 PM

नऊ महिन्यांच्या या काळात स्त्रीच्या शरीरातल्या हार्मोन्सच्या लेव्हल्स सतत बदलत असतात. त्यामुळे दात अतिशय संवेदनशील होतात.  म्हणून या काळात दातांची काळजी घेणं गरजेचं आहे. 

ठळक मुद्दे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स दात आणि हिरड्या संवेदनशील बनवतात.गरोदरपणात नेहमीच्या सवयीचे पदार्थ न खाल्ल्यामुळे दातांचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. दात आणि हिरड्यांना होणारा त्रास प्रत्येक स्त्रीनुसार वेगळा असू शकतो.

गर्भधारणेनंतर स्त्रीच्या शरीरात अगणित बदल होतात. याकाळात सकस तर खायलाच पाहिजे आणि दर महिन्याला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे तपासणीसाठी गेलंच पाहिजे. पण बऱ्याचवेळा या काळात दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नऊ महिन्यांच्या या काळात स्त्रीच्या शरीरातल्या हार्मोन्सच्या लेव्हल्स सतत बदलत असतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स दात आणि हिरड्या संवेदनशील बनवतात. आणि त्यात विषाणू होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या काळात दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.

गर्भधारणेनंतर निर्माण होणाऱ्या दातांच्या समस्या

दात आणि हिरड्यांना होणारा त्रास प्रत्येक स्त्रीनुसार वेगळा असू शकतो. पण काही मूलभूत गोष्टी सगळ्यांसाठी सारख्याच असतात.  १) गरोदरपणात खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात.  वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. नेहमीच्या सवयीचे पदार्थ न खाल्ल्यामुळे दातांचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. २) याकाळात दातदुखी सहन होत नाही. संवेदनशील हिरड्या आणि दातातून रक्त येऊ शकतं. ३) दातदुखी आणि दात किडणे हे त्रास गरोदरपणात होऊ शकतात. ४) पाचव्या महिन्यानंतर हिरड्यांना सूज येऊन अतिवेदना होऊ शकतात.

दातांचं आरोग्य कसं सांभाळायचं? नेहमीच्या दातांच्या स्वच्छतेखेरीज अजूनही काही उपाय केले पाहिजेत, जेणेकरून या काळात दातांच्या समस्या निर्माण होणार नाहीत. १) नियमित दातांची तपासणी करणे आहे. तुमच्या डॉक्टरला तुम्ही प्रेग्नन्ट आहात हे सांगितलंच पाहिजे. म्हणजे या काळात घेता येऊ शकतील अशीच औषधं तुम्हाला दिली जातील. २) डॉक्टरना विचारून, त्यांच्या सल्ल्यानुसार माऊथ वॉश वापरावा. जेणेकरून तोंड, दात स्वच्छ राहायला मदत मिळू शकते. ३) या काळात काहीवेळा ब्रश करणंही त्रासदायक वाटतं. अशावेळी अतिशय मऊ ब्रश वापरला पाहिजे. आणि दात, हिरड्या अतिशय हळुवारपणे स्वच्छ केल्या पाहिजेत. ४) ज्या स्त्रियांना मॉर्निग सिकनेसचा त्रास होतो, त्यांनी पाणी आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्याने चुळ भरावी. त्यामुळे तोंडाचा वास जातो, दात किडत नाहीत आणि उलट्यांमध्ये जे पित्त बाहेर पडतं त्यामुळे तुमचे दात खराब होत नाहीत. गरोदरपणात प्रत्येक टप्प्यावर नवी आव्हानं असतात. अस्वस्थता असते. आपल्याला जे जे म्हणून खावंसं वाटतं ते या काळात जरूर खाल्लंच पाहिजे. फक्त त्याबरोबर दातांची काळजी घेतली म्हणजे पुढे त्रास होत नाही. कारण शेवटी आई आणि बाळाचं आरोग्य  सगळ्यात महत्वाचं!

विशेष आभार: गणपत सावंत  (MBBS, MD - Obstetrics & Gynaecology, DGO, FCPS - General Surgery, DNB - Obstetrics & Gynecology, Gynecologist, Obstetrician, Infertility Specialist, Laparoscopic Surgeon (Obs & Gyn) )