Join us   

Mother's Day : सुरक्षित मातृत्वाचे प्रश्न गंभीर ! ‘सेफ मदरहूड’चा अधिकार कोरोनकाळात कोण नाकारतं आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 2:36 PM

सुरक्षित मातृत्व, सुरक्षित बाळंतपण आणि सुरक्षित वातावरणात बाळाची वाढ हे आईसह बालकाचेही मूलभूत हक्क आहेत याचा विसर मोठ्यांच्या जगाला फार चटकन पडतो.

मुक्ता चैतन्य

आज जगभर मातृत्व दिन साजरा केला जातोय. मदर्स डे. आईपणाची महती आज गायली जाईल. मात्र या वर्षी तरी मातृत्वाची थोरवी गात असताना हे पहायला हवं की जगभर आणि आपल्या देशात, राज्यात, शहरात गल्लीबोळातही आज अनेक महिलांसाठी मातृत्व ही अतिशय कठीण आणि आव्हानात्मक अवस्था आहे. कोरोनाकाळानं सुरक्षित मातृत्वाचेही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. यंदा मदर्स डे निमित्त चर्चा आहे ती ‘सेफ मदरहूड’ची. आई आणि बाळांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्याची. सुरक्षित प्रसूती आणि मातृत्व हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे हे तर आता जागतिक आरोग्यसंस्थाही आग्रहाने सांगते. पण कोरोनाकाळात तसं सुरक्षित मातृत्व आणि बालपण लाभतं आहे का हे ही या निमित्ताने बोलायला हवं.  आईचा त्याग, तिची महती आणि बाबाचं अबोल प्रेम वगैरे आपण खूपच वेळा वाचतो. ऐकतो. पण ज्या मुलांना आपण जन्माला घालतो त्यांच्या बाजूनेही थोडा विचार करून बघायला हवा असा हा आव्हानात्मक काळ आहे. मुलं जन्माला घालणं हा प्रत्येक स्त्री पुरुषाचा हक्क असतो, आईबाबा होणं ही भावनिक गरज असते हे मान्यच आहे. पण हा हक्क आणि ही गरज पूर्ण करत असताना आपल्याला मुलं का हवी आहेत, किती हवी आहेत आणि कधी हवी आहेत याचा विविध पातळीवरचा विचार जोडपी करतात का असा प्रश्न मनात येतो. आपली आर्थिक, मानसिक क्षमता, आईची शारीरिक, मानसिक क्षमता, आपण मुलांना देऊ शकणारं आयुष्य या सगळ्याचा विचार आपल्या भावनिक गरजांच्या आधी करता आला पाहिजे , तसं या काळात करायला हवं. लग्न झालंय म्हणून आणि सगळ्यांना व्हायलाच हवीत म्हणून मुलं जन्माला घालणं, प्रत्येक स्त्रीमध्ये आईपणाची भावना ठासून भरलेली असते हे गृहीत धरणं हे ही पूर्णपणे चुकीचं आहे.

जसा मुलांना सतत आईबाबा सोबत असल्याचा कंटाळा येतो तसाच कंटाळा आईलाही मुलांचा येऊ शकतो. याचा अर्थ तिचं प्रेम कमी होतं असं नाही. पण तिलाही तिची म्हणून स्पेस हवी असू शकते. हेच बाबाच्या बाबतीतही आहे. त्यामुळे एक जीव या जगात आणताना आपण त्याचं उत्तम पालनपोषण, भरणपोषण, गरजा आणि सर्वथा सुरक्षित बालपण देऊ शकतो का याचा विचार मूल होताना, आपल्याला किती मुलं हवीत हे ठरवताना करायला हवा, तो करणं प्रॅक्टीकल असू शकतं, कोरडं, माया नसलेलं नव्हे. विशेषतः कोरोनाच्या काळात ज्यांना दिवस राहिले आणि मुलं झाली त्यांच्याबद्दल काळजीवजा अस्वस्थता मनात दाटून आली. आयुष्य कुठल्याही महामारीसाठी थांबत नाही हे खरंच. महामारी आली म्हणून सेक्सची इच्छा आणि गरज संपत नसते आणि गर्भधारणाही! एकीकडे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे, दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने होतोय आणि त्यात रोजच्या रोज किती लोक दगावत आहेत हे चित्र समोर आहे. या अस्वस्थ काळात आपण संतती होऊ देण्याचा विचार करतो आहोत, गरोदरपण प्लॅन करतो आहोत त्याचा अधिक सजग विचार करता आला असता का? येऊ शकेल का? ज्यांना किमान गर्भनिरोधक साधनं उपलब्ध आहेत, वापरण्याचं स्वातंत्र्य आहे, वय बाजूने आहे अशा स्त्री पुरुषांनी आई बाबा होण्याची तीव्र इच्छा थोडी पुढे ढकलली असती तर? पालक होण्याची इच्छा महामारीच्या काळात बाजूला ठेवणं खरंच इतकं कठीण गेलं असतं का? हे प्रश्न अवघड आहेत आणि कुणाला असंही वाटेल की हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न आहे. बरोबरच आहे, हा खासगीच प्रश्न आहे. पण आरोग्य यंत्रणा सार्वजनिक असते. मुलं समाजात वाढतात.  समाजाचा एक भाग असतात. पत्रकार रवीश कुमार अलीकडे रोज ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स, प्लाझ्मा, रक्त हव्या असलेल्या कोरोना पेशंट लोकांची यादी त्यांच्या वॉलवर देतात. भारतभरातून लोक त्यांना मेसेज करतात आणि एखाद्या कनेक्टर प्रमाणे ते त्यांच्यापर्यंत मदतीसाठी येणारी प्रत्येक हाक इतरांपर्यंत पोचवत असतात. त्यात अनेकदा कोरोनाबाधित गर्भवती महिलांना तातडीने ऑक्सिजन, बेड आणि इतर सुविधा हव्या असल्याचे तपशील वाचले आहेत. ते वाचताना दर वेळी अंगावर काटा येतो, प्रचंड अस्वस्था येते आणि मग मनात विचार येतो की, हे सारं टाळता आलं असतं का? अर्थात भारतासारख्या देशात जिथे बायकांवर अनेकदा मातृत्व लादलं जातं तिथे थांबण्याचा आणि घाई न करण्याचा विचार त्या बाईच्या मनात असला तरी तिला तो राबवता येऊ शकतो का? ग्रामीण भागात तर ते शक्य तरी आहे का?  सुरक्षित मातृत्व, सुरक्षित बाळंतपण आणि सुरक्षित वातावरणात बाळाची वाढ हे बाळाचे मूलभूत हक्क आहेत याचा विसर आपल्या मोठ्यांच्या जगाला फार चटकन पडतो. भारतात दर वर्षी ४४ हजार स्त्रिया गर्भधारणेशी संबंधित आजारांनी मृत्युमुखी पडतात. या महामारीच्या काळात गर्भधारणेनंतर जे चेकअप नियमित व्हायला हवेत त्यात ५१ टक्केची घट झालेली आहे. याचा अर्थ गर्भधारणा झाल्यावर आवश्यक त्या चेकअपसाठी बायका डॉक्टरांकडे जात नाहीयेत. गेल्या नाहीत. हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होण्याचं प्रमाण ७९ टक्केने घसरलेलं आहे. आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुलांना कवेत घेतलेलंच असताना तिसऱ्या लाटेचा सगळ्यात जास्त तडाखा मुलांनाच बसणार असल्याचं बोललं जातंय. ही गोष्ट कालपर्यंत फक्त संशोधक आणि अभ्यासक म्हणत होते पण आता भारत सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार के. विजय राघवन यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. मातृत्वाचा गौरव करताना या अवघड काळात सुरक्षित गर्भधारणा आणि बाळाचा जन्म यांचे  प्रश्न आहेत हे तर मान्य करू..

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.) muktaachaitanya@gmail.com

टॅग्स : कोरोना वायरस बातम्याप्रेग्नंसीगर्भवती महिला