Join us   

गर्भपात झाला म्हणून आईलाच 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, बाळाचा जीव आईनेच  घेतला! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 5:28 PM

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील ब्रिटनी पुलॉ हिचा गर्भपात झाला आणि ऑक्टोबर महिन्यात तेथील न्यायालयानं तिला गर्भपाताची शिक्षा म्हणून 4 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला गेला . याचं कारण तेथील कायदा.

ठळक मुद्दे  ब्रिटनी गर्भपात प्रकरणात काही संस्था संघटना ब्रिटनीला मिळालेल्या शिक्षेचा जोरदार निषेध करत आहेत.अमेरिकेत हे असं पहिल्यांदाच घडलं अस नाही असं ब्रिटनीला पाठिंबा देणार्‍या ‘नॅशनल अँडव्होकेटस ऑफ प्रेगनंट वूमन’ (NAPW) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी म्ह्टलं आहे.

ब्रिटनी पुलॉ ही दक्षिण अमेरिकेतील ओक्लाहोमा या राज्यातील महिला. सध्या जगभरात या महिलेची चर्चा होते आहे. कारण काय तर तिचा गर्भपात. फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनी हिचा गर्भपात झाला आणि ऑक्टोबर महिन्यात तेथील न्यायालयानं तिला गर्भपाताची शिक्षा म्हणून 4 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला गेला. सामान्यत: गर्भपात झालेल्या स्त्रीबद्दल सगळ्यांनाच सहानुभूती वाटते.तिला झालेला त्रास, बाळ गमावल्याची तिला सोसावी लागत असलेली वेदना याबद्दल तिची कणव वाटू लागते. पण ओक्लाहोमामधे मात्र गर्भपाताची शिक्षा म्हणून महिलेला तुरुंगवास हे फारच निष्ठूर आहे.

Image: Google

पण याला कारण तेथील कायदा. कायद्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटनी पुलॉ ही झालेल्या गर्भपातास कारणीभूत आहे. म्हणूनच तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला गेला. यात ब्रिटनीचा काय दोष? तर तिचा दोष म्हणजे ती गर्भावस्थेतही बेकायदेशीर ड्रग्ज आणि औषधांचं सेवन करत होती. चार महिन्यांची गरोदर असताना तिला त्रास होवू लागल्यावर दवाखान्यात दाखल केलं गेलं. तिथे डॉक्टरांनी तिला ड्रग्ज घेतले का? असं विचारलं असता ती हो म्हणाली. तिच्या गर्भाची तपासणी केली असता गर्भात असलेल्या बाळाच्या यकृत आणि मेंदूमधे मेथॅम्फेटामाइन या अंमली पदार्थाचे अंश आढळून आले. तेथील डॉक्टरांनी आनुवांशिक दोष, वरीच्य अडचणी आणि ब्रिटनीने केलेले मेथाम्फेटामाईनचं सेवन ही कारणं ब्रिटनीच्या गर्भपातास कारणीभूत ठरल्याचं सांगितलं. न्यायालयानं बेकायदेशीर ड्रग्ज सेवनामुळे तिला दोषी ठरवून तिला शिक्षा ठोठावली.

Image: Google

ब्रिटनी गर्भपात प्रकरणात काही संस्था संघटना ब्रिटनीला मिळालेल्या शिक्षेचा जोरदार निषेध करत आहेत. तर काही संघटना तिला विरोध न करता आई सेवन करत असलेल्या ड्रग्जपासून बाळाचं रक्षण होण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेत हे असं पहिल्यांदाच घडलं अस नाही असं ब्रिटनीला पाठिंबा देणार्‍या ‘नॅशनल अँडव्होकेटस ऑफ प्रेगनंट वूमन’ ( NAPW) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी म्ह्टलं आहे. ही संस्था अमेरिकेतील गर्भवती महिलांच्या प्रकरणात बळजबरीने हस्तक्षेपाकडे , महिलांना होणार्‍या अटकेकडे नजर ठेवतात. महिलांना दिलेल्या शिक्षेविरोधात आवाज उठवतात. केवळ ड्रग्ज सेवन केल्यानं होणार्‍या गर्भपातातच नाही तर खाली पडल्यानं, घरी प्रसूत होवून बाळ दगावलं तर या प्रकरणीही त्या महिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्याविरुध्द खटले चालवले जातात, त्यांना शिक्षा ठोठावली जाते. पण खटला चालवून शिक्षा होणार्‍यांमधे ड्रग्ज घेतल्यानं झालेल्या गर्भपाताची प्रकरणं अधिक असल्याचं संस्थेकडील आकडेवारी सांगते. ब्रिटनीला झालेली शिक्षा म्हणजे अमेरिकेतील ड्रग्जविरोधातील लढ्याचा एक परिणाम मानला जात आहे.

Image: Google

ड्रग्ज घेणार्‍या, व्यसनाधीन मातांच्या बाळांना ‘क्रॅक बेबी’ने संबोधण्याची पध्दत 1980 पासून सुरु झाली. या संकल्पनेपासूनच आई घेत असलेल्या ड्रग्जचा , करत असलेल्या नशेचा परिणाम गर्भावर कसा होतो यावर चर्चा सुरु झाली. गर्भावस्थेत महिलेने ड्रग्ज घेतले तर त्याचे वाईट परिणाम होतात, गर्भपात तर होतोच शिवाय भ्रूणावर होणारे परिणाम गंभीर असतात. मृत बाळ जन्माला येण्याचा धोका असतो. तसेच अशा मातांच्या बाळांच्या विकासामधेही अनेक अडचणी निर्माण होतात. तेव्हापासूनच मेथॅम्फेटामाईंच्या वापराला दोषपूर्ण ठरवलं जात आहे. कारण ड्रग्जमधील या घटकाचा गर्भावर वाईट परिणाम होतो.

Image: Google

अमेरिकेत सध्या ब्रिटनी पुलॉ हिला झालेली शिक्षा ही अमानुष मानली जात आहे , तसेच आई घेत असलेल्या ड्रग्जच्या परिणामांपासून गर्भाला सुरक्षित ठेवण्याविषयीची कळकळ व्यक्त होते आहे. पण न्यायालयानं सध्याच्या घडीला ब्रिटनीला दोषी ठरवून तिला शिक्षा दिली आहे. ब्रिटनी पुलॉचे वकील तिला दिलेल्या शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.