Join us   

बाळांतपणात शरीराची झालेली झीज भरुन यायला हवी तर घ्या हे खास पौष्टिक पेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 1:40 PM

प्रसूतीनंतर बाळ झाल्याचा मानसिक आनंद ही स्त्रीची मानसिक ताकद असते. पण जरी असं असलं तरी शरीराची ताकद मात्र संपलेली असते. आणि म्हणूनच बाळांतपणानंतर स्त्रीला भरपूर काळ अशक्तपणा जाणवत असतो. हा अशक्तपणा घालवण्याचं काम दुधाचा पौष्टिक चहा करतो. चहा म्हणत असलं तरी तो काढ्याच्या स्वरुपातला चहा असून त्यात चहा पावडर वापरली जात नाही.

ठळक मुद्दे  प्रसूतीनंतर शरीराला आलेला थकवा पटकन घालवण्याचं काम हा दुधाचा पौष्टिक चहा करतो.दुधाच्या या पौष्टिक चहामधे मसाले असतात. या मसाल्यापासून तयार झालेलं हे पेयं प्रसूतीनंतर शरीराला बरं करण्याच काम करतो. हा चहा शरीराला ताकद देण्याबरोबरच अंगावरचं दूधही वाढवतो. त्यामूळे आईला ताकद देण्यासोबतच बाळाच्या पोषणाचंही कार्य करतो.

  प्रसूतीनंतर बाळ हातात आल्यावर बाईला सगळा त्रास, वेदना विसरायला होतं. शरीरात एक मोठी घडामोड होवून गेलेली असते आणि बाळाला स्तनपान करण्याची एक मोठी जबाबदारी सुरु झालेली असते. यासोबतच बाळांतपणात जी शरीराची झीज झालेली असते तीही भरुन काढायची असते. स्तनपान करणाऱ्या आईनं केवळ बाळाची तब्येत सांभाळून चालत नाही तर स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं ही देखील तिची प्राधान्याची बाब असायला हवी.  स्तनपान करणाऱ्या आईची तब्येत चांगली असेल तरच बाळाची तब्येत चांगली राहाते. प्रसूतीनंतर स्त्रीचं शरीर थकलेलं असतं. बाळ पोटात असेपर्यंत गरोदरपणात शरीराला मिळालेलं पोषण बाळाला जात असतं. प्रसूतीनंतर बाळ झाल्याचा मानसिक आनंद ही स्त्रीची मानसिक ताकद असते. पण जरी असं असलं तरी शरीराची ताकद मात्र संपलेली असते. आणि म्हणूनच बाळांतपणानंतर स्त्रीला भरपूर काळ अशक्तपणा जाणवत असतो. खरंतर स्त्रीने ही ताकद आहार आणि आरामाची व्यवस्थित काळजी घेऊन लवकरात लवकर मिळवणं गरजेचं असतं. कारण बाळ अंगावर पीत असल्यानं त्यातूनही तिच्या शरीराला थकवा येत असतो. हा थकवा प्रसूतीनंतरची सामान्य बाब असली तरी त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नसतं. हा थकवा घालवण्यासाठी स्त्रीने आहारात काही विशिष्ट गोष्टींचा, पदार्थांचा/पेयांचा जाणीवपूर्वक समावेश केला तर शरीराचा थकवा लवकर दूर होण्यास मदत होते. असंच एक पौष्टिक आणि ताकद देणारं पेयं म्हणजे दुधाचा पौष्टिक चहा. याला चहा म्हणत असलं तरी तो काढ्याच्या स्वरुपातला चहा असून त्यात चहा पावडर वापरली जात नाही. तर त्यात अद्रक, वेलची, दालचिनी, लवंग, काळे मिरे ,बडिशेप आणि गूळ या घटकांचा वापर केला जातो.

दुधाचा पौष्टिक चहा म्हणजे काय? प्रसूतीनंतर शरीराला आलेला थकवा पटकन घालवण्याचं काम हा दूधाचा पौष्टिक चहा करतो. हा चहा बनवताना एक छोटा अद्रकाचा तूकडा किसलेला, दोन चमचे वेलची, एक चमचा लवंग, दोन दालचिनीच्या काड्या, पाव चमचा काळे मिरे, पाव चमचा बडिशेप, एक कप सायीचं दूध, एक कप पानी आणि चवीनुसार गूळ हे साहित्य लागतं. या सर्व गोष्टी एका भांड्यात एकत्र कराव्यात आणि भांडं गॅसवर उकळायला ठेवावं. उकळताना ते खूप आटणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा मिश्रण उकळलं की गॅस कमी करुन त्यावर झाकण ठेवावं. झाकण ठेवताना भांड्याचा अर्धा भाग उघडा ठेवावा. दहा मिनिट मिश्रण उकळलं की गॅस बंद करावा. पाच मिनिटं उकळलेला काढा तसाच भांड्यात राहू द्यावा. आणि मग तो थोडा निवळला की गाळून घोट घोट घेत प्यावा. हा पौष्टिक चहा काय करतो?  दुधाच्या या पौष्टिक चहामधे मसाले असतात. या मसाल्यापासून तयार झालेलं हे पेयं प्रसूतीनंतर शरीराला बरं करण्याच काम करतो. चहात समाविष्ट सर्व सामग्री शक्तीवर्धक असतात. शिवाय त्या पचनसंस्थेचं काम सुधारतात. यामुळे बध्दकोष्ठता दूर होते आणि शरीराला ताकद मिळते. हा चहा शरीराला ताकद देण्याबरोबरच अंगावरचं दूधही वाढवतो. त्यामुळे आईला ताकद देण्यासोबतच बाळाच्या पोषणाचंही कार्य करतो. म्हणून हा काढा पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

बाळांतपणानंतर स्वत:ची काळजी घेताना बाळांतपणानंतर अनेक महिलांना खूप आजारी असल्यासारखं, थकल्यासारखं वाटतं. पण सोबतच बाळाच्या तब्येतीचीही काळजी असते. त्याचा अनेक जणींना ताण येतो. परिणामी स्वत: आराम करण्याकडे, पूरेशी झोप घेण्याकडे दुर्लक्ष करतात. पण बाळांतपणानंतरच्या थकव्यातून बाहेर पडण्यासाठी आणि शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी स्त्रीला पुरेशी झोप मिळणं गरजेचं असतं. म्हणूनच बाळ झोपलं की आईनं बाकीच्या कामाच्या मागे न धावता स्वत:ही झोपावं. झोप पूर्ण करावी. यामुळे शरीराला आलेला थकवा जाण्यास मदत होते शिवाय डोकंही छान हलकं होतं.

  •  अनेक स्त्रिया बाळ पोटात असताना जेवढी खाण्या पिण्याची काळजी घेतात तितकी बाळ झाल्यावर घेत नाही. पण हे आई आणि बाळ दोन्हींसाठी घातक असतं. आईनं दिवसातून तीन वेळेस पौष्टिक आहार घेणं आणि मधे मधेही पौष्टिक खाणं फार महत्त्वाचं आहे.
  •  सतत पलंगावर पडून न राहाता थोडं उठून तिथल्या तिथे फिरणं गरजेचं आहे. शरीराला थोडी हालचाल मिळाली की शरीराला आलेला जडपणा आणि मरगळ कमी होते.
  •  बाळाकडे लक्ष देताना आपल्या शरीराला काय हवं आहे , आपलं शरीर काय म्हणत आहे याकडेही तितकचं बारकाईनं लक्ष दिलं तर प्रसूतीनंतर शरीराला आणि मनाला पटकन तरतरी येईल.