Join us   

गरोदरमातेपासून पोटातल्या बाळाला संसर्ग होतो? कोरोना पॉझिटिव्ह आई स्तनपान करु शकते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 5:33 PM

तिसऱ्या लाटेत मुलांना धोका आहे अशी चर्चा आहे, मात्र हा धोका नेमका कसा यासंदर्भातल्या प्रश्नांना युनिसेफमधील तज्ज्ञांनी दिलेली ही उत्तरं..

पहिल्या लाटेत लहान मुलांना कोविडची लागण होण्याची शक्यता कमी आहे असं सांगितलं गेलं. तरी मुलांच्या आरोग्याला धोका लागण होणार नाही याची काटेकोर काळजी पालकांनी घेतली. मुलांच्या शाळा, बाहेर खेळणं बंद झालं याला आता जवळजवळ वर्ष उलटून गेलं. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड लागण झाल्याच्या आणि मृत्युच्या काही घटना घडल्याने खळबळ माजली. काही मुलांना म्युकरमायकोसीसही झाला आणि तिसऱ्या लाटेबद्दल मुलांच्या लागणीबद्दल अंदाज वर्तवले जात असल्याने कोविड आणि लहान मुलं याबाबत खूप प्रश्न आहेत त्यापैकी काही नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरं ‘युनिसेफ’ मधील तज्ज्ञांनी दिली आहेत.

कोविड १९ चा नवीन विषाणू मुलांसाठी जास्त धोकादायक आहे का?

जगभरातले तज्ज्ञ या नवीन विषाणूवर सतत नजर ठेवून आहेत आणि नवीन विषाणूचा विशेषतः लहान मुलांवर काय परिणाम होतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. ज्या मुलांना नवीन विषाणूची लागण झाली आहे त्यांचा आजार तीव्र होण्याची किती शक्यता आहे याबद्दल संशोधन चालू आहे. हा विषाणू मुलांना विशेष लक्ष्य करतोय असं अजून तरी आढळलं नाही किंवा लहान मुलांना तीव्र आजार होतोय हे दुर्मिळ आहे. तरीही पालकांनी मुलांना योग्य ती काळजी घ्यायच्या सवयी लावून कोविडचा प्रसार होऊ नये याची दक्षता घ्यावी.

 

 

कोविडमधून बरं झाल्यानंतर होणारे दीर्घ पल्ल्याचे परिणाम म्हणजे ‘ लाँग कोविड’ मुलांमध्ये पण आढळतो का?

कोविडची लागण होऊन बरे झाल्यानंतरही काही लोकांमध्ये काही आठवडे, महिने काही लक्षणं कायम राहतात त्याला ‘लाँग कोविड’ म्हणतात. ‘लाँग कोविड’चे परिणाम आणखी चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेत ज्यांना दीर्घकालीन आजार नाहीत अशी किशोरवयीन आणि लहान मुलं आणि ज्या मुलांमध्ये कोविडची सौम्य लक्षणं आढळली आहेत त्याच्यावर परिणाम झालेला दिसतो पण किती मुलांना ‘लाँग कोविड’ झाला ही संख्या अजून निश्चित झाली नाही. परंतु सर्वेक्षणातून मुलांमध्ये थकवा, पोटात वात धरणे, घशाची खवखव होणे, डोकेदुखी, दुखरे स्नायू आणि अशक्तपणा ही लक्षणं आढळली आहेत. लहान आणि किशोरवयीन मुलांना मल्टीसिस्टम इनफ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन (MIS – C) ही कोविड १९ शी संबंधित दुर्मिळ लक्षणं आढळत असली – सतत ताप, पुरळ, डोळे लाल होणं, ओठ सुजणं, ओठ, जीभ, हात आणि पाय लाल होणे अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळायला हवं.

गरोदर आईकडून गर्भाला कोविडची लागण होते का?

गरोदर आईकडून गर्भाला कोविडची लागण होते का? किंवा संभाव्य परिणाम होतो का? याबद्दल अजून पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. याचा तपास अजून चालू आहे. गरोदर स्त्रीने कोविडची लागण होऊ नये म्हणून आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी आणि खोकला, ताप, आणि श्वसनाला त्रास होत असेल तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्यावी.

कोविडची लागण झालेल्या स्त्रीने मुलाला दूध पाजावे का?

याबद्दल तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आईच्या दुधाचे फायदे नक्कीच जास्त आहेत आणि आईच्या दुधातून श्वसनाचे आजार होतील अशा विषाणूची लागण होण्याची शक्यता खूप कमी असल्याने योग्य ती खबरदारी बाळगून आईने बाळाला दूध पाजू शकते. मुलांना कोविड लागण होण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र कोविडमुळे बदलेल्या परिस्थितीचा सर्व स्तरातल्या आणि सर्व वयोगटातल्या मुलांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. घरात राहणं, घरात आणि आजूबाजूचं तणावाचं वातावरण, विशेषतः दुसऱ्या लाटेत आलेले अनुभव यामुळे मुलं भयग्रस्त झाली आहेत. शाळेत न गेल्याने, सवंगड्याना भेटता न आल्याने मुलांच्या मानसिक स्थितीवर गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले आहेत. मुलं आणि मुली, शहरी आणि ग्रामीण, सुस्थितीतील आणि गरीब मुलांमध्ये असलेल्या मोठ्या दरीमुळे दुष्परिणाम आणखी तीव्र झाले आहेत. कोरोनावर उपाय सापडून शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत १० टक्के मुलं पुन्हा शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकणार नाहीत असं गेल्यावर्षी ‘युनिसेफ’ने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलं आहे. मुलांचं नियमित शिक्षण आणि मानसिक आरोग्य याबद्दल तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे.

(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)

टॅग्स : प्रेग्नंसीगर्भवती महिला