Join us   

मासिक पाळीत होतात असह्य वेदना? आहारात हे 5 पदार्थ अवश्य खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 5:37 PM

मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान त्रास होत असल्यास नियमितपणे काही विशिष्ट पदार्थ सेवन करण्याची सवय लावली तर मासिक पाळीत त्रास आणि वेदना यांचा सामना करावा लागत नाही. ऋजुता दिवेकर मासिक पाळीतील त्रासाच्या मुक्तीसाठी पाच पदार्थांबद्दल सांगतात.

ठळक मुद्दे दोन्ही वेळच्या जेवणासोबत एक एक चमचा साजूक तूप खायला हवं. यामुळे मासिक पाळी सुलभ जाते.पाळीत पोटात, कंबरेत, पायात वेदना होत असतील तर दुपारच्या जेवणात दही भात खावा. पाळीच्या चार दिवसात जाणवणार्‍या वेदनांवर उपाय म्हणून या चार दिवसात ऋजुता दिवेकर मूठभर शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात.

वयात आल्यानंतर मुलींच्या बाबतीत पाळीचं चक्र सुरु होतं. पाळी येणं हा निसर्गधर्म असला तरी त्याचा कंटाळा यावा किंवा ती नकोशी वाटावी एवढा त्रास पाळीमधे अनेकींना सहन करावा लागतो. मासिक पाळी येण्याआधी , मासिक पाळी चालू असताना पोटात दुखणे, कंबर दुखणे, हातपाय आणि डोकं दुखणं, पोटात, कंबरेत चमका येणं, मळमळणं, उलट्या होणं, सतत मूड बदलणं, चिडचिड होणं यासारखे त्रास होतात. या त्रासावर तात्पुरती पेन किलरची गोळी घेऊन झोपणं हा काही योग्य उपाय नाही. मासिक पाळीतील हे त्रास कमी करण्यासाठी काही पदार्थांचा उपयोग होवू शकतो असं आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणतात. इतकंच नाही तर ते पदार्थ कोणते हेही त्यांनी सांगितलं आहे. मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान त्रास होत असल्यास नियमितपणे काही विशिष्ट पदार्थ सेवन करण्याची सवय लावली तर मासिक पाळीत त्रास आणि वेदना यांचा सामना करावा लागत नाही. ऋजुता दिवेकर मासिक पाळीतील त्रासाच्या मुक्तीसाठी पाच पदार्थांबद्दल सांगतात.

छायाचित्र- गुगल

1. भिजवलेले बेदाणे आणि केशर

येता जाता बेदाणे तसेही खाल्ले जातात. पण मासिक पाळीतील त्रासासाठी ऋजुता दिवेकर बेदाणे खाण्याची वेळ आणि योग्य पध्दत सांगतात. त्या म्हणतात बेदाणे सकाळी उपाशी पोटी खायला हवेत. पिवळ्या बेदाण्यांपेक्षा काळ्या मनुका आणि त्यासोबत केशर खाल्ल्यानं मासिक पाळीतील वेदना आणि चमका कमी होतत. यासाठी रात्रभर मनुका आणि केशरची एखाद दुसरी काडी भिजत घालून सकाळी मनुक आणि केशर खायला हवं. यामुळे पाळीतील वेदना ,पोटात, कंबरेत चमका येणं कमी होतात.

छायाचित्र- गुगल

2. साजूक तूप

ऋजुता दिवेकर म्हणतात की, दोन्ही वेळच्या जेवणासोबत एक एक चमचा साजूक तूप खायला हवं. यामुळे मासिक पाळी सुलभ जाते. सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण यात एक एक चमचा तूप खाल्ल्यास मासिक पाळीत जाणवणार्‍या वेदना कमी होतात. मळमळ होणं, उलटी होणं हे त्रासही दूर होतात.

छायाचित्र- गुगल

3. दही भात

पोट बिघडल्यानंतर दही भात खाल्ला जातो. पण ऋजुता दिवेकर म्हणतात की पाळीत पोटात, कंबरेत, पायात वेदना होत असतील तर दुपारच्या जेवणात दही भात खावा. सोबत मुगाचा किंवा नागलीचा पापड भाजून खावा. या उपायानं मूड चांगला होतो आणि वेदनाही कमी जाणवतात.

छायाचित्र- गुगल

4. शेंगदाणे-गूळ

पाळीच्या चार दिवसात जाणवणार्‍या वेदनांवर उपाय म्हणून या चार दिवसात ऋजुता दिवेकर मूठभर शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात. पाळीच्या काळात मूड बदलणे, सतत खावंसं वाटणं यासारखे त्रास यामुळे नियंत्रणात राहातात. शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्यास पाळीच्या दिवसात ते जास्त फायदेशीर ठरतात.

छायाचित्र- गुगल

5. खिचडी किंवा नागली

पाळीमधील समस्यांवर उपाय म्हणून नागलीच्या पिठाचे डोसे किंवा भाकरी खाणं फायदेशीर ठरतं. त्यासोबतच हिरवे मूग किंवा मुगाची डाळ भिजवून त्याचे डोसे खाणंही उपयुक्त ठरतं. ऋजुता दिवेकर पाळीच्या चार दिवसात आहारात राजगिरा, शिंगाडा, कुट्टु यांचा समावेश करण्याचा, या दिवसात तांदळाची खिचडी, साबुदाण्याची खिचडी खाण्याचा सल्ला देतात.