Join us   

पिरीएड्स प्रॉब्लेम; ‘मड थेरपी’ करा असं तज्ज्ञ सांगतात, काय या थेरपीचे फायदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 4:00 PM

मासिक पाळीत तीव्र वेदना होणं, पाळीत जास्त रक्तस्त्राव होणं, पाळी अनियमित होणं यासारख्या समस्यांना महिलांना सामोरं जावं लागत आहे. यावर उपचार म्हणून मड थेरपी खूप प्रभावी मानली जाते.

ठळक मुद्दे  मड थेरपी म्हणजे शरीरावर मातीच्या पट्ट्या ठेवून उपचार करणं.मड थेरपी करण्यासाठी अतिशय स्वच्छ मातीचा उपयोग केला जातो.मड थेरपीत पाळीत कंबर, पोट, हात पाय, स्तन यात वेदना होत असतील तर या वेदनांवर आराम म्हणून तिथे गरम मातीच्या पट्या ठेवल्या जातात .

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतोय. कमी वयात आजारांना सामोरं तर जावं लागतंच आहे शिवाय मासिक पाळीच्या निगडित अनेक समस्या तीव्र स्वरुपात जाणवू लागल्या आहेत. धावपळीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे मासिक पाळीत तीव्र वेदना होणं, पाळीत जास्त रक्तस्त्राव होणं, पाळी अनियमित होणं यासारख्या समस्यांना महिलांना सामोरं जावं लागत आहे. यावर उपचार म्हणून मड थेरपी खूप प्रभावी मानली जाते.

नॅचरोथेरपी अर्थात निसर्गोपचारात हा उपचार केला जातो. निसर्गोपचारात उपचारांसाठी पंचतत्त्वांचा अर्थात आकाश, अग्नी, पाणी, वायू आणि पृथ्वी यांचा आधार घेतला जातो. निसर्गोपचारात आठ प्रकारच्या थेरेपी सांगितल्या आहेत त्यातली ही एक मड थेरपी असून तिचा उपयोग विविध आजार बरे करण्यासाठी होतो.

Image: Google

मड थेरपी म्हणजे?

मड थेरपी म्हणजे शरीरावर मातीच्या पट्ट्या ठेवून उपचार करणं. या उपचारात आजाराप्रमाणे मातीचा लेप शरीराच्या एका विशिष्ट भागावर किंवा पूर्ण शरीरावर लावला जातो. समस्या त्वचा रोगाची असू देत किंवा विषारी किटक चावल्यानंतर होणार्‍या त्रासाची , पण मड थेरपी केल्यानं आजार आणि त्रास बरे होतात.

 निसर्गोपचार तज्ज्ञ अरविंद धाकड सांगतात की, अनियमित पाळीमुळे महिलांना गर्भाशयात वेदना, हात-पाय, कंबर आणि स्तनांमधे वेदना होणं, भूक कमी लागणं, थकवा येणं, वजन वाढणं, बध्दकोष्ठतेचा त्रास होणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. पण या सर्व त्रासांवर मड थेरपी ही फायदेशीर आणि परिणामकारक ठरते. पाळीत कंबर, पोट, हात पाय, स्तन यात वेदना होत असतील तर या वेदनांवर आराम म्हणून तिथे गरम मातीच्या पट्या ठेवल्या जातात . तर पाळीत ज्यांना जास्त रक्तस्त्राव होतो त्यांच्या पोटाच्या खालच्या भागावर ओल्या मातीच्या पट्टा ठेवल्या जातात. पाळी अनियमित असेल तर मड बाथ हा उत्तम उपचार आहे.

Image: Google

तज्ज्ञ म्हणतात की, मड थेरपी करण्यासाठी अतिशय स्वच्छ मातीचा उपयोग केला जातो. ही माती जमिनीच्या चार पाच फूट आतून काढली जाते. उपचार म्हणून या मातीच्या पट्या ठेवल्या जातात किंवा या मातीनं आंघोळ घातली जाते. ही मड थेरपी तज्ज्ञांकडूनच घ्यावी लागते.