Join us   

मेनोपॉजनंतर ऑस्टियोपोरोसिस अर्थात हाडं ठिसूळ होण्याचा धोका... तो का वाढतो, टाळणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 2:01 PM

मेनोपॉजनंतर ज्या अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे ऑस्टियोपोरोसिस ही आहे. मेनोपॉजनंतर आपल्या शरीरात काय घडतंय, आपल्या शरीराला काय हवंय हे नीट न समजून घेतल्यानं सगळं गणित बिघडतं आणि हाडांचं आरोग्य धोक्यात येतं. हाडांच्या दुखण्याकडे, कुरकुरण्याकडे पाळीनंतर होतंच असं म्हणून दुर्लक्ष केल्यास ऑस्टियोपोरोसिस चा धोका वाढतोच.

ठळक मुद्दे मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी कमी होते. इस्ट्रोजन हे संप्रेरकच हाडांना नैसर्गिकरित्या मजबूत करतो. मेनोपॉजनंतर अनेक महिलांना हाडांसंबंधीची दुखणी लागतात. हाडं दुखतात म्हणून महिला स्वत:च्या हालचालींवर मर्यादा घालून घेतात.ऑस्टिपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी ड जीवनसत्त्वच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला हवं.

मेनोपॉजनंतर जणू काही आयुष्याला ब्रेक लागला आहे अशा पध्दतीनं महिला थबकतात. हबकून जातात. आता झालं वय... यापुढे काय म्हातारपणच असा नकारात्मक विचार करतात. पाळी येणं हे जसं नैसर्गिक असतं तितकंच नैसर्गिक असतं पाळी जाणं. शरीर आणि संप्रेरकांच्या बदलातून घडणारी मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तज्ज्ञ म्हणतात की या प्रक्रियेकडे सहजपणे पाहायला शिकायला हवं. जागरुकतेनं शरीर आणि मनातील बदल अनुभवायला हवेत. ही सहजता आणि जागरुकता असेल तर मेनोपॉजनंतरच्या अनेक समस्यांना, आरोग्यविषयक धोक्यांना वेळीच रोखता येतं. मेनोपॉजनंतरच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरील बदलांना सामोरं जाता येतं. शरीरात कोणतीही मोठी घडामोड झाली की त्याचे चांगले वाईट परिणाम होतातच. काही समस्यांचा धोकाही निर्माण होतो. पण त्यानं निराश होण्याचं कारण नाही असं तज्ज्ञ म्हणतात. त्यापेक्षा आपल्या सवयीत, जीवनशैलीत त्यानुसार आवश्यक बदल करावेत. मेनोपॉजनंतर ज्या अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे ऑस्टिपोरोसिस ही आहे. हा एक हाडांसंबधीचा आजार आहे. याबाबत आधीच सावधगिरी बाळगली तर हा धोका कमी होतो.

मेनोपॉजमधे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या लैंगिक संप्रेरकांचं काम कमी होतं . ज्याचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रेरॉन या संप्रेरकांचं काम मंदावल्यामुळे त्याचा परिणाम हाडांच्या आरोग्यावर होतो. त्यातूनच ऑस्टिपोरोसिस हा हाडासंबंधीच्या आजाराचा धोका वाढतो. या आजारात हाडांची ताकद कमी होते. शिवाय हाडांची घनता कमी होते. ड जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडातील खनिज द्रव्यं कमी होतं आणि हाडं भुसभुशीत व्हायला लागतात. मेनोपॉजनंतर या आजाराचा धोका महिलांमधे मोठ्या प्रमाणात वाढतो. कारण मेनोपॉजनंतर शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवायला लागते. या कॅल्शिअमकडे जर दुर्लक्ष केलं तर ऑस्टिपोरोसिसचा धोका वाढतो. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेच हाडातील खनिज द्रव्यं कमी होतात.

मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी कमी होते. इस्ट्रोजन हे संप्रेरकच हाडांना नैसर्गिकरित्या मजबूत करतो. या संप्रेरकामुळे आतड्यातून हाडं कॅल्शिअम शोषून घेऊ शकतात. आणि या संप्रेरकामुळेच किडनीच्याद्वारे कॅल्शिअम बाहेर टाकण्यावर मर्यादा येतात. पण मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन या संप्रेरकाचं काम थंडावल्यानं हाडं आतड्यातून कॅल्शिअम शोषून घेण्यास कमी पडतात. आणि किडनीद्वारे कॅल्शिअम जास्त प्रमाणात बाहेर पडतं. अशा प्रकारे हाडांच्या मजबूतीला आवश्यक असणारं कॅल्शिअम मिळत नाही. म्हणूनच मेनोपॉजनंतर अनेक महिलांना हाडांसंबंधीची दुखणी लागतात. हाडंकाडं दुखतात म्हणून महिला स्वत:च्या हालचालींवर मर्यादा घालून घेतात. शरीराची हालचाल योग्य प्रमाणात झाली की हाडंही सुरक्षित आणि सक्रीय राहातात. पण मेनोपॉजनंतर आपल्या शरीरात काय घडतंय, आपल्या शरीराला काय हवंय हे नीट न समजून घेतल्यानं सगळं गणित बिघडतं आणि हाडांचं आरोग्य धोक्यात येतं. हाडांच्या दुखण्याकडे, कुरकुरण्याकडे पाळीनंतर होतंच असं म्हणून दुर्लक्ष केल्यास ऑस्टिपोरोसिसचा धोका वाढतोच.

ऑस्टिपोरोसिसचा धोका टाळता येऊ शकतो! ऑस्टिपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी ड जीवनसत्त्वच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला हवं. हाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम ड जीवनसत्त्व् करतं. शरीराला जर पुरेसं ड जीवनसत्त्वं मिळालं नाही तर हाडं आतड्यातून कॅल्शिअम शोषून घेऊ शकत नाही. ड जीवनसत्त्व शरीराला पुरेसं मिळण्यासाठी कोवळ्या उन्हात फिरायला किंवा बसायला हवं. दूध, धान्यं यांच्या सेवनानंही ड जीवनसत्त्वं शरीरास मिळतं. ड जीवनसत्त्वयुक्त भाज्या, फळं, धान्यं यांचा आहारात समावेश करणं हा त्यावरचा उत्तम उपाय. मेनोपॉजनंतर फिट राहाण्याची गरज पूर्वीपेक्षा वाढते. आणि नेमकं याच काळात मेनोपॉज नंतरच्या शरीराच्या दुखण्यांचा बाऊ करुन व्यायामाकडे दुर्लक्ष केलं जातं. आपली हाडं आणि शरीर सक्रीय राहाण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. आहार-विहार, व्यायाम याकडे नीट लक्ष दिल्यास मेनोपॉजनंतरही आपली हाडं नक्कीच सुरक्षित राहू शकतील. फक्त यासाठी आपण आपल्या शरीराचं काय आणि किती ऐकतो हे महत्त्वाचं.

टॅग्स : महिला