Join us   

मेनोपॉजनंतर हार्टअटॅक? मेनोपॉजनंतर हदयविकाराचा धोका टाळा, त्यासाठी हे लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 2:09 PM

मासिक पाळी बंद झाली की महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरकं स्त्रवण्याचे थांबतात. खरंतर हे दोन हार्मोन्स महिलांचं आरोग्य जपण्याचं काम करतात. ते स्त्रवायचे थांबले की महिलांमधे हदयविकाराचा धोका निर्माण होतो.

ठळक मुद्दे  रजोनिवृत्तीच्या काळात किंवा त्यानंतर महिलांमधे शारीरिक कामं किंवा श्रम करण्याचा उत्साह राहात नाही. अनेक महिलांचं जास्त वेळ एका जागी बसून राहाण्याचं प्रमाण वाढतं. मेनोपॉजनंतर हदयविकाराच धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ्स महिलांना आपल्या जीवनशैलीमधे बदल करण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा सल्ला देतात.मेनोपॉजनंतर ताण न घेण्याचा सल्ला देतात. कारण ताणामुळे शरीरात दाह निर्माण होतो.

हदयविकाराबाबत एक गैरसमज आहे. तो असा की हदयविकार हा फक्त पुरुषांचा आजार आहे. महिलांना यापासून धोका नाही. पण हे चूक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पुरुषांइतकाच महिलांनाही हदयविकाराचा धोका असतो. पण जोपर्यंत महिलांना नियमित मासिक पाळी येते वयाच्या त्या टप्प्यापर्यंत महिलांना हदयविकाराचा इतका धोका नसतो. पण एकदा का मासिक पाळी बंद झाली तर पुढच्या दहा वर्षानंतर महिलांना हदयविकाराचा धोका असतो. आणि म्हणूनच रजोनिवृत्ती आल्यानंतर महिलांनी आपल्या हदयाची काळजी अधिक घ्यायला हवी. याबाबत आपल्या डॉक्टरांशी बोलून काय पथ्यं नियम पाळायला हवेत हे समजून घेवून त्याचा अवलंब करायला हवा.

मेनोपॉज आणि हदयविकार काय संबंध? महिलांमधे साधारणत: वयाच्या ४५ वर्षानंतर महिलांमधे मेनोपॉजची लक्षणं दिसायला सूरुवात होतात. वयाच्या पन्नाशीपर्यंत बहुतांश महिलांची पाळी जाते. तज्ज्ञ सांगतात की वयाच्या ४५ वर्षानंतर अंडाशयाची क्षमता कमी होत जाऊन ती एका टप्प्यावर संपते तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरकंही स्त्रवणाचे थांबतात . त्याचाच परिणाम म्हणजे मासिक पाळी थांबते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वय वाढण्यातला एक महत्त्वाचा टप्पा. पण या टप्प्यानंतर महिलांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बदलतात. आतापर्यंत ज्याचा धोका नव्हता अशा समस्या निर्माण होतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे हदयविकार. तज्ज्ञ म्हणतात की मासिक पाळी बंद झाली की महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरकं स्त्रवण्याचे थांबतात. खरंतर हे दोन हार्मोन्स महिलांचं आरोग्य जपण्याचं काम करतात. ते स्त्रवायचे थांबले की महिलांमधे हदयविकाराचा धोका निर्माण होतो.   इस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता निर्माण झाली की रक्तवाहिन्यांच्या आतला स्तर हा अधिकच पातळ होतो. तसेच रक्तातील चरबीचं प्रमाणवाढतं. रक्तदाब वाढतो, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील ट्रायग्लिसराइडस या स्निग्ध घटकाचं प्रमाण वाढतं, त्याचा परिणाम म्हणून हदयविकाराचा धोका वाढतो.तसेच ज्या महिलांची मासिक पाळी लवकर जाते किंवा ज्यांचं गर्भाशय शस्त्रक्रिया करुन काढून टाकल्यानं आलेला अनैसर्गिक मेनोपॉज यामुळे पन्नाशीच्या आतही महिलांना हदयविकाराच धोका वाढू शकतो. 

 

रजोनिवृत्तीच्या काळात किंवा त्यानंतर महिलांमधे शारीरिक कामं किंवा श्रम करण्याचा उत्साह राहात नाही. अनेक महिलांचं जास्त वेळ एका जागी बसून राहाण्याचं प्रमाण वाढतं. एका अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो की महिला जितका जास्त काळ एकाच जागी बसून राहातील तितका त्यांना हदयविकाराचा धोका वाढतो. हा धोका टाळायचा असेल तर रजोनिवृत्तीनंतर शारीरिक हालचाली वाढवण्याची काळजी महिलांनी घ्यायला हवी असं तज्ज्ञ म्हणतात.

मेनोपॉजनंतर हदयविकार टाळण्यासाठी काय करायला हवं? मेनोपॉजनंतर हदयविकाराच धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ महिलांना आपल्या जीवनशैलीमधे बदल करण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा सल्ला देतात. शिवाय काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला सांगतात.

  • मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. याबाबत आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. आहारात तंतूमय घटक असलेल्या भाज्या-फळं, कडधान्यं, डाळी-साळी, फोलेटयूक्त अन्न घटक आणि हदयाचं आरोग्य सूरक्षित ठेवण्यासाठी लो सॅच्युरेटेड फॅट आणि लो ट्रान्स फॅट यूक्त पदार्थ आणि अन्न घटकांचा आहारात समावेश करावा. हे घटक आपल्या आहारात कसे समाविष्ट करावेत याबाबत आहार तज्ज्ञ किंवा डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावं.
  •  शारीरिक हालचाली मासिक पाळीनंतर मंदावून चालणार नाही. नियमित व्यायामाचा नियम पाळायला हवा. शारीरिक हालचाली जास्त असल्या की रक्तवाहिन्यांमधे गुठळ्या निर्माण होण्याचा धोका कमी होतो. शिवाय शारीरिक हालचाली उत्तम असल्यास रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रालची पातळीही वाढत नाही.
  •  मेनोपॉजच्या काळात मानसिक स्तरावरही खूप बदल होतात. रजोनिवृत्तीचे मानसिक परिणामही जाणवतात. त्याचाच परिणाम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा ताण वाटतो, विनाकारण काळजीचं आणि भीती वाटण्याचं प्रमाण वाढतं. पण याचा परिणाम परत शारीरिक आरोग्यावरच होतो. म्हणूनच तज्ज्ञ मेनोपॉजनंतर ताण न घेण्याचा सल्ला देतात. कारण ताणामुळे शरीरात दाह निर्माण होतो. या दाहामुळेच हदयविकाराचा धोका वाढतो. ताण घेण्याची सवय सोडण्यासाठी नियमितपणे व्यायामासोबतच ध्यानधारणा, प्राणायाम करायला हवा. ध्यानधारणेने तणाव कमी होतो.
  • धुम्रपान करण्याची सवय असेल तर ती मेनोपॉजनंतर आधी सोडून द्यावी. कारण धुम्रपानामुळे हदयाचे ठोके आणि लय यावर परिणाम होतो. शिवाय ह्दयाच्या रक्तवाहिन्याही संकूचित होतात. धुम्रपान केल्यानं हदय कमजोर होतं आणि रक्तदाबही वाढतो. हे सर्व टाळण्यासाठी धुम्रपान बंद करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
  •  चाळीशीनंतर महिलांनी नियमितपणे आपल्या अरोग्याची तपासणी करणं आवश्यक आहे. मेनोपॉजनंतर तर ही गरज खूपच वाढते. हदयासंबंधीचं आरोग्य जपण्यासोबतच नियमित तपासणी करत राहिल्यास काही अनपेक्षित घडत असल्याची त्याची माहिती लवकर मिळते. त्याचा परिणाम म्हणजे धोका टळण्यावर होतो.