Join us   

हिवाळ्यात झोप पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही, सकाळी लवकर उठावंसं वाटत नाही, असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 8:28 PM

थंडीच्या दिवसात झोप पूर्ण होत नाही, खूप झोप येते, झोपून राहावसं वाटतं असा नेहमीचा अनुभव. पण असं का होतं माहित आहे का? यामागे आहे खास थंडी स्पेशल कारणं.

ठळक मुद्दे थंडीत आपल्या शरीरातील जैविक घड्याळ आक्रसते.झोपण्यासाठी शरीराला थंडाव्याची गरज असते. तो असला की जास्त झोपावसं वाटतं.थंडीच्या दिवसात अपुर्‍या सूर्यप्रकाशामुळे शरीरात झोपेशी निगडित मेलाटोनिन हे हार्मोन जास्त स्त्रवतं.

हिवाळ्यात सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो सकाळी लवकर उठण्याचा. सकाळी लवकर उठणं तर दूरच पण उशिरा उठलं तरी झोप पुरेशी झालेली वाटत नाही. रात्री लवकर झोपून सकाळी उशिरा उठलं तरी आणखी झोपावसं वाटतं. थंडीच्या दिवसात उशिरा जाग येण्याने संपूर्ण दिनक्रमावर त्याचा परिणाम होतो. व्यायाम चुकतो, घाईगडबडीत नाश्ता करायचा राहातो. याचा आरोग्यावरही परिणाम होतो. थंडी हा तब्येत कमावण्याचा ऋतू ,पण उशिरा जाग येण्यानं थंडीतल्या या उद्देशावर पांघरुण पडतं त्याचं काय? थंडीच्या दिवसात झोप पूर्ण होत नाही, खूप झोप येते, झोपून राहावसं वाटतं असा नेहमीचा अनुभव. पण असं का होतं माहित आहे का? यामागे आहे खास थंडी स्पेशल कारणं. ती कोणती?

Image: Google

थंडी आणि झोप काय संबंध?

1. थंडीत दिवस छोटा रात्र मोठी असते. साहजिकच सूर्योदय उशिरा आणि सूर्यास्त लवकर होतो. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो. यामुळे आपल्या शरीरातील जैविक घड्याळ आक्रसते. शरीरात मेलाटोनिन हे झोपेशी निगडित हार्मोन जास्त स्त्रवतं. यामुळे थंडीच्या दिवसात थकल्यासारखं होतं आणि खूप झोप येते.

2. सूर्य प्रकाश हा ड जीवनसत्त्वाचा मुख्य स्त्रोत आहे. पण थंडीत सूर्य प्रकाश कमी मिळतो. शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली की शरीरातील ऊर्जा कमी होते. थकवा येतो, डोळे जड होतात आणि झोप पूर्ण झाली नाही असं वाटतं.

Image: Google

3. तज्ज्ञांच्या मते थंडीत सर्वात जास्त मूड स्वींग होतात. जास्त थंडीत थोडं उदास वाटणं, मनात चिंता येणं, निराश वाटणं हे त्रास होतात. यालाच सीजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हटलं जातं. मूड बदलत असल्यानेही त्याचा झोपेवर परिणाम होवून जास्त झोपावसं वाटतं.

4. झोपण्यासाठी शरीराला थंडाव्याची गरज असते. थंड वातावरणानं छान झोप लागते. चांगली झोप लागण्यासाठी उपयुक्त तापमान 18 अंश सेल्सिअस असतं. थंडीच्या दिवसात असं तापमान अनेकदा सकाळी असल्यामुळे हिवाळ्यात सकाळी लवकर उठवलं जात नाही आणि झोपून राहावसं वाटतं.