Join us   

कमी झोप त्रासदायक पण जास्त झोप? 8 तासांपेक्षा जास्त झोपणं जीवावर बेतण्याचा धोका! रिसर्चचा दावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 5:08 PM

 अभ्यासक म्हणतात की, 6 ते 8 तासांपेक्षा कमी झोपू नका आणि आठ तासंपेक्षा जास्तही झोपू नका. कमी झोप शरीरासाठी जेवढी घातक तितकीच जास्त झोपही आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. 

ठळक मुद्दे रोज जास्त झोपल्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.   जगभरातले डॉक्टर म्हणतात, जास्त झोपणं ही झोपेशी निगडित समस्या असून ती अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकते.अती झोपेची समस्या ही आपल्या जीवनशैलीशी निगडित असल्याने त्यात काही आरोग्यदायी बदल केल्यास ही समस्या कमी होते.

चांगल्या आरोग्यासाठी आहार, व्यायाम यासोबतच आराम महत्त्वाचा असतो. आराम म्हणजेच रात्रीची चांगली झोप. सध्या झोप न लागण्याची समस्या सर्वच वयोगटातल्यांना छळते आहे तिथे खूप वेळ झोपण्याची सवय ही आरोग्यविषयक समस्यांना आमंत्रण देणारी आहे. म्हणूनच अभ्यासक म्हणतात की 6 ते 8 तासांपेक्षा कमी झोपू नका आणि आठ तासंपेक्षा जास्तही झोपू नका. कमी झोप शरीरासाठी जेवढी घातक तितकीच जास्त झोपही आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. ओव्हरस्लीपिंगचा दुष्परिणाम यावर झालेला अभ्यास सांगतो की अति झोपल्यामुळे मेंदूचा स्ट्रोक येण्याची, लवकर मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

थकवा जाणवतोय म्हणून, सुटी आहे म्हणून एखाद्या दिवशी उशिरापर्यंत झोपणं वेगळी गोष्ट पण रोजच नऊ ते दहा तास झोप घेणं ही गंभीर बाब असल्याचं अभ्यासक म्हणतात. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजी’ने केलेल्या अभ्यासातून जास्त झोपण्याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.

Image: Google

अभ्यास काय सांगतो?

1. रोज जास्त झोपल्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूत रक्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो किंवा कमी रक्तप्रवाह होतो. तसेच हालचालविरहित संथ जीवनशैलीमुळेही 25 वर्षांच्या कमी वयोगटातल्यांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो.

2. 8 तासांपेक्षा जास्त झोपण्याची सवय असणार्‍यांमधे स्ट्रोकचा धोका नऊ तासांपेक्षा कमी झोपणार्‍यांच्या तुलनेत 23 टक्क्यांनी जास्त असल्याचं या अध्ययनात आढळून आलं आहे. इतकंच नाही तर दुपारच्या जेवणानंतर छोटी डुलकीच्या नावाखाली तास दिडतास झोप काढतात त्यांच्यात दुपारी अध्र्या तासापेक्षा कमी झोपणार्‍यांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो.

3. जे जास्त झोपतात आणि ज्यांना नीट झोपही लागत नाही ही गंभीर समस्या असून त्यांना ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता 82 टक्के एवढी जास्त असते. अशा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतरही झोपेची समस्या छळतेच.

Image: Google

जास्त झोपल्यावर ब्रेन स्ट्रोक का?

 8 तासांपेक्षा जास्त झोपल्यास ब्रेन स्ट्रोक येतो हे अभ्यास सांगतो पण का याबाबत अजूनही विशेष स्पष्टता नसली तरी अभ्यासक म्हणतात की जास्त झोपल्यानं कोलेस्ट्रेरॉलची पातळी वाढते. यामुळे पुढे जावून वजन वाढतं आणि ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका निर्माण होतो.

Image: Google

या अभ्यासावर मत व्यक्त करताना जगभरातले डॉक्टर म्हणतात, जास्त झोपणं ही झोपेशी निगडित समस्या असून ती अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकते. अती झोपेची समस्या ही आपल्या जीवनशैलीशी निगडित असल्याने त्यात काही आरोग्यदायी बदल केल्यास ही समस्या कमी होते. डॉक्टरांच्या मते फास्ट फूड, जंक फूड खाणं टाळावं, एका जागी खूप वेळ बसून राहाणं टाळावं. संतुलित आहार तोही वेळेवर घेणे, पुरेसा व्यायाम करणे , धूम्रपान आणि मद्यपान टाळल्याने जास्त झोपत असल्यास झोपेचा अवधी कमी करणं सोपं जातं. तसेच योग्य जीवनशैलीने झोपेच्या समस्या दूर होतात आणि ब्रेन स्ट्रोकचा धोकाही 80 टक्क्यांनी कमी होतो. जास्त झोपची समस्या सोडवताना रक्तदाब, साखर, वजन या तीन गोष्टींवर नजर ठेवणं आवश्यक असल्याचंही अभ्यासक सांगतात.