जीन्स घालणं पूर्वी फॅशनचा भाग होता किंवा स्टेटस सिम्बॉल होता. पण आता जीन्स वापरणं ही मुला मुलींसाठी , प्रौढ स्री पुरुषांसाठी देखील सोयीचा भाग झाली आहे. फॅशन म्हणून आलेली जीन्स सवयीचा आणि आवडीचा भाग होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तिच्यात एकदा गुंतवणूक केली की ती वर्षानुवर्ष टिकते. ती मळलेली पटकन दिसत नाही. त्यामुळे न धुता ती पाच ते सहा वेळा घालता येते. हे फायदे बघता जीन्स हा केवळ एक वस्त्रप्रकार न राहाता तो अनेकांच्या विशेषत: तरुण मुला-मुलींच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. आज अनेक आजारांचं मूळ आपल्या जीवनशैलीत, आपल्या आहार-विहार आणि पेहरावाच्या सवयीत दडलेलं आहे. जीन्स वापरताना फक्त त्याचे फायदेच दिसतात. पण वैद्यकशास्त्रातले तज्ज्ञ जीन्सच्या या अतिवापराचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करुन सांगत आहेत. आज स्त्री-पुरुषांमधलं वंध्यत्त्व, अनेक त्वचा विकार याचं मूळ जीन्स वापरात दडलेलं त्यांना आढळून आलं आहे.
नाशिकस्थित आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य राजश्री कुलकर्णी यांनी जीन्स वापराबाबत स्त्री आणि पुरुष या दोघांमधील समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. आपण जर जीन्सचे चाहते असू तर एकदा या जीन्सच्या नकारात्मक बाजूकडेही चिकित्सकपणे पाहायला हवं हेच ही माहिती सूचवते.
छायाचित्र- गुगल
जीन्स आणि समस्या
मुळात ही जीन्स असली तरी कपडा हा डेनिमचा आहे. या कपड्याचा पोत बघता हे खूप जाड प्रकाराचं कापड असतं. आणि आता फॅशन म्हणून स्कीन टाइट जीन्स, लोएस्ट जीन्स असे अनेक प्रकार आले आहेत. जीन्स वापरताना फॅशन आणि सोय एवढंच बघितलं जातं. पण त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तरुण पिढीकडून आणि प्रौढ महिला पुरुषांकडूनही दुर्लक्षिले जात आहेत हे वास्तव आहे. जीन्सच्या दुष्परिणामांचा विचार करताना फक्त मुली किंवा स्त्रिया असा करुन चालणार नाही. कारण या जीन्सचा परिणाम मुलं आणि मुली या दोघांच्याही आरोग्यावर होतो आहे. परिणाम वेगवेगळे असले तरी त्यांची तीव्रता दोघांच्याही बाबतीत सारखीच आहे.
* मुलांवर जे परिणाम होतात ते प्रामुख्यानं त्यांच्या जननेंद्रियांवर होतात.जीन्समुळे हे जननेंद्रियं आवळले जातात. गेल्या काही वर्षात पुरुषांमधील वंध्यत्त्वाचं प्रमाण वाढलं आहे त्याचं एक कारण जीन्स असल्याचं समोर येत आहे. पुरुषांची जननेंद्रियं शरीराच्या बाहेर असण्याचं कारण हे असतं की जास्त उष्णतेमुळे शुक्राणुंची संख्या वाढत नाही. पण जीन्स ही अगदी आवळून घातली जात असल्यानं या जननेंद्रियावर खूप दाब येतो, त्या भागात खूप उष्णता निर्माण होते. त्यामुळे शुक्राणूंची निर्मिती होत नाही हे प्रामुख्यानं आढळून आलं आहे. आपण विचारही कधी केला नसेल असे जीन्स वापरण्याचे परिणाम मुला-मुलींमधे दिसून येत आहे.
* मुलींच्या बाबतीत जीन्सच्या वापराचा परिणाम बघितला तर मुलांप्रमाणेच मुलींच्याही जननेंद्रियांवर अति दाब जीन्स वापरल्यामुळे निर्माण होतो. मुलींमधे पाळीसंदर्भातल्या समस्या या जीन्सच्या वापरामुळे निर्माण होत असल्याचं दिसत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या शरीरात उष्णता जास्त असते. मुलींना पाळी येणं, अंड तयार होणं या उष्णतेशी निगडित प्रक्रिया आहेत. या प्रक्रियेसाठी आवश्यक उष्णता मुलींच्या शरीरात असते. त्यामुळे पाळी येणं, अंडं निर्मिती हे नैसर्गिकपणे होतं. पण जीन्स घातल्यानं ओटीपोट, आतमधील गर्भाशय मोठ्या प्रमाणात दाबलं जातं. ज्यांचं वजन जास्त असतं किंवा ज्यांचं पोट सुटलेलं असतं अशा मुली कमी साइझच्या जीन्स वापरतात. त्यामुळे ओटीपोट आणखी आवळलं जातं. यामुळे जी उष्णता निर्माण होते ती गरजेपेक्षा जास्त असते. त्यामुळे पाळीमधे खूप रक्तस्त्राव होणं यासारख्या समस्या मुलींमधे दिसून येतात.
छायाचित्र- गुगल
* मुलं असो की मुली जीन्स वापरल्यानं दोघांमध्ये आढळून येणारी आणखी एक समान समस्या आहे. लघवीला झाल्यानंतर तिथे जो सामान्य ओलावा असतो तो साध्या कपड्यांमधे सुती कपड्यांमधे हवेचा संचार सहज होत असल्यानं वाळून जातो. या ओलाव्यानं त्रास होत नाही. पण जीन्स इतकी घट्ट असते की हवेच्या संचाराला जागाच उरत नाही. त्यामुळे लघवीनंतरचा ओलसरपणा लवकर सुकत नाही . त्यामुळे मुलींमधे अंगावरुन पांढरं जाणं, योनीमार्गात संसर्ग होणं, खाज येणं, आग होणं अशा तक्रारी निर्माण होतात. तसेच मुली आणि मुलांमधे जीन्स वापरल्यानं बुरशी संसर्ग दिसून येतो. जांघेत हा बुरशी संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे तिथे एक प्रकारचा त्वचा विकार होतो. तिथे खूप खाज येते, पुरळ येते,संसर्ग कुठल्या प्रकारचा आहे त्यावरुन तिथल्या त्वचेचा रंग एकदम पांढरा होतो किंवा एकदम काळा होतो. यामुळे तिथल्या भागात दुर्गंध येणं, खाज येणं, ताप येणं असे त्रासही होतात.
* दीर्घ काळ जीन्स घातल्यानं, स्कीन फिट जीन्स घातल्यानं त्वचेवरची रंध्र असतात त्यांना श्वास घ्यायला जागाच राहात नाही. शिवाय या रंध्रातून घामाद्वारे शरीरातील जे विषारी घटक बाहेर पडतात ती प्रक्रिया जीन्समुळे , त्याच्या जाड कापडामुळे रोखली जाते. त्यामुळे मग शरीरातून बाहेर न पडलेल्या विषारी घटकांचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे डोकं वर काढतात.
छायाचित्र- गुगल
जीन्स वापरताना..
* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठ दहा तास बाहेर राहाणार असाल तर रोज जीन्स वापरु नये हा उत्तम पर्याय आहे. ट्राऊझर वापरणार असाल तर त्यातही अनेक प्रकार आहेत. अशा परिस्थितीत आरोग्यदायी पर्याय निवडावेत.
* जीन्स वापरायच्या असतील तर अगदी स्कीन फीट न वापरता थोड्याशा ढगळ म्हणजे ज्यात दाटल्यासारखं वाटणार नाही अशा वापराव्यात. ओटीपोटावर किंवा जननेंद्रियावर खूप दाब येणार नाही याची काळजी घ्यावी.
* जीन्स वापरताना कोरडेपणा राखला जाईल याची काळजी घ्यायला हवी. जेव्हा जेव्हा लघवीला जाल तेव्हा तो भाग कोरडा करुन मगच जीन्स घालावी.
* जीन्स घालून आठ दहा तास बाहेर असाल तर घरी आल्यानंतर आंघोळ करायला हवी.
* मुख्य म्हणजे दीर्घकाळ जीन्स घालत असाल तर त्या जीन्सच्या आतल्या बाजूला घाम लागलेला असतो. अशा वेळेला जीन्स वेळच्या वेळी धुणंही गरजेचं आहे. मुख्य म्हणजे जीन्स घालताना ती पूर्ण कडकडीत सुकलेली असायला हवी. कारण ओलसर जीन्स घातली तर त्याचं त्वचेवर घर्षण होतं आणि त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.