Join us   

तळलेले पदार्थ आवडतात पण पचन बिघडतं? 5 घरगुती उपाय, पचन झटपट, पोट शांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 7:25 PM

खाताना मजा येणारे तळलेले पदार्थ पोटात गेल्यानंतर मात्र त्यांचे गुण दाखवतातच. जळजळ, अँसिडिटी होणे, पचनाचे विकार अशा तळलेल्या पदार्थांच्या सेवनानं निर्माण होतात. हे पदार्थ टाळणं योग्य पण नाहीच टाळता आले तर त्रासाची तीव्रता टाळण्यासाठी सोपे घरगुती उपाय आहेच.

ठळक मुद्दे तळलेल्या पदार्थात ट्रान्स फॅटस आणि सॅच्युरेटेड फॅटस असतात. तळलेले , पचनास जड असे तेलकट पदार्थ खाण्यात आले तर कोमट किंवा त्यापेक्षा थोडं जास्त गरम पाणी प्यावं.अति प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर पुढचे चोवीस तास आपल्या पचनसंस्थेल ताण येणार नाही असे हलके पदार्थ खावेत.

तळणीचे पदार्थ जड असले तरी खायला आवडतातच. कधी कार्यक्रमानिमित्त , तर कधी बाहेर पार्टी म्हणून तळलेले पदार्थ वरचेवर खाण्यात येतातच. खाताना मजा येणारे हे पदार्थ पोटात गेल्यानंतर मात्र त्यांचे गुण दाखवतातच. जळजळ, अँसिडिटी होणे, पचनाचे विकार अशा तळलेल्या पदार्थांच्या सेवनानं निर्माण होतात. म्हणूनच आवड म्हणून तर कधी अपरिहार्यता म्हणून तळणाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात आले तर पुढील त्रासापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

Image: Google

तळलेले पदार्थ खाल्ल्यानं काय होतं?

तळलेल्या पदार्थात ट्रान्स फॅटस आणि सॅच्युरेटेड फॅटस असतात. हे घटक वजन वाढण्यास कारणीभूत तर ठरतातच पण इतर आजारांचा धोकाही निर्माण होतात. तळलेले पदार्थ खाल्ल्याने अपचन, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणं, मधुमेह तसेच हदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळेच तळलेले पदार्थ आपल्या नियमित आहारात असणार नाही, ते जितके टाळता येतील तितके टाळणं ही काळजी घेणं गरजेचं आहे.पण तळलेले पदार्थ जर खाण्यात आलेच तर किमान त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी पुढील उपाय करावेत.

Image: Google

तेलकट खाल्ल्यानंतर काय करावं?

1. तळलेले , पचनास जड असे तेलकट पदार्थ खाण्यात आले तर कोमट किंवा त्यापेक्षा थोडं जास्त गरम पाणी प्यावं. यामुळे पचनाच्या क्रियेचा वेग वाढतो. हे पदार्थ पचण्यास सोपे जातात आणि जे घटक पचले नाहीत ते शरीराबाहेर टाकण्यास या पाण्याची मदत होते.

2. तळलेले पदार्थ खाऊन झाल्यावर त्याचे अपाय टाळण्यासाठी ग्रीन टी / भाज्यांचं सूप, लिंबू पाणी ( साखर न घातलेलं) संत्र्याचा रस ( साखर न घातलेला) यापैकी कोणतंही एक पेय घ्यावं. हे सर्व पेयं डीटॉक्स ड्रिंक्स म्हणूनच ओळखले जातात.

3. अति प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर पुढचे चोवीस तास आपल्या पचनसंस्थेल ताण येणार नाही असे हलके पदार्थ खावेत. यात मुगाची साधी खिचडी, डाळीचं सूप त्यासोबत एखादा फुलका असे पदार्थ खाल्ले तर उत्तम.

4. तळलेल्या पदार्थांच्या सेवनानंतर एकाच जागी बसून राहिलं तर या पदार्थांनी शरीरात निर्माण होणारे उष्मांकाचं ज्वलन होणार नाही. ते उष्मांक जाळण्यासाठी किमान अर्धा तास चालणं गरजेचं आहे. यामुळे पचनास सुलभता येईल.

Image: Google

5. तेलकट पदार्थांच्या पचनास मदत करण्यासाठी प्रोबायोटिक घटक आवश्यक असतात. याचा उत्तम मार्ग म्हणजे घरगुती ताजं दही किंवा ताक. सकाळच्या वेळेस तेलकट पदार्थ खाण्यात आले असतील तर थोडं दही खावं किंवा रात्री खाण्यात आले तर घरगुती साधं ताक प्यावं. दही/ ताकाच्या सेवनानं तेलकट पदार्थांच्या सेवनानं होणारं नुकसान टळू शकतं.