Join us   

मध्यरात्री भूक लागते, टीव्ही पाहत वाट्टेल ते खाता? आवरा, नाइट मंचिंगची ही सवय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 4:41 PM

‘नाइट मंचिंग’ किंवा ‘नाइट क्रेव्हिंग’ असं देखील म्हटलं जातं. अशी मध्यरात्री भूक लागणं, भूक लागली म्हणून खाणं हे आरोग्यासाठी त्रासदायक आहे. पण ही भूक शमली नाही तर रात्री नीट झोपही लागत नाही. मग अशा भुकेचं काय करायचं असा प्रश्न पडतो. या घातक सवयीसाठी आरोग्यदायी पर्याय आहेत का?

ठळक मुद्दे नाइट मंचिंग यावर बिंज इटिंग ( काही विचार न करता एका मागोमाग एक पदार्थ खाणं) हा चुकीचा पर्याय आहे. नाइट मंचिंगचा आपल्या आरोग्यावर, वजनावर वाईट परिणाम होवू नये यासाठी स्मार्ट इंटिंग हा पर्याय योग्य. मध्यरात्री भूक लागण्याची सवय घालवण्यासाठी वेळेवर झोपणं, रात्री अकरापर्यंत झोपणं आवश्यक आहे.

अनेकजणांना रात्री उशिरा झोप येते, रात्री कामामुळे अनेकांना उशिरा झोपण्याची सवय असते. तर काहींना रात्री जाग आल्यावर भूक लागते. अशा वेळेस फास्ट फूडसारखे पदार्थ जसे मैद्याची बिस्किटं, वेफर्स, फ्रिजमधील गोड पदार्थ खाल्ले जातात. भूक भागल्याचा आनंद तर मिळतो पण त्याचा परिणाम म्हणून वजन वाढणं, ओटीपोट वाढणं या समस्या निर्माण होतात. या सवयीला ‘नाइट मंचिंग’ किंवा ‘नाइट क्रेव्हिंग’ असं देखील म्हटलं जातं. अशी मध्यरात्री भूक लागणं, भूक लागली म्हणून खाणं हे आरोग्यासाठी त्रासदायक आहे. पण ही भूक शमली नाही तर रात्री नीट झोपही लागत नाही. मग अशा भुकेचं काय करायचं असा प्रश्न पडतो.

Image: Google

मध्यरात्री लागणार्‍या भुकेवर काय उपाय असू शकतील याबाबत मिस इंडिया स्पर्धकांना ट्रेनिंग देणार्‍या आहार तज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी काही आरोग्यदायी पर्यायसांगितले आहेत. त्यांच्या मते नाइट मंचिंग यावर बिंज इटिंग ( काही विचार न करता एका मागोमाग एक पदार्थ खाणं) हा चुकीचा पर्याय आहे. नाइट मंचिंगचा आपल्या आरोग्यावर , वजनावर वाईट परिणाम होवू नये यासाठी स्मार्ट इंटिंग हा उत्तम पर्याय असल्याचं त्या सांगतात.

Image: Google

नाइट मंचिंग ..घातक सवय

रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा दोन तीन तासांनी भूक लागणं आणि खाणं वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. कारण अशा रात्रीच्या भुकेसाठी मीठ आणि साखर जास्त असलेले पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ खातांना एक गोष्ट लक्षात येत नाही की हे पदार्थ भूक भागवत असले तरी या पदार्थांमुळे शरीरात उष्मांक वाढतात. हे खाऊन आपण लगेच झोपतो त्यामुळे उष्मांक जळण्याचा काही प्रश्नच नाही. त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढण्यावर, ओटीपोट वाढण्यावर होतो. मध्यरात्री उशिरा खाणं हे आरोग्यासाठी वाईट असतं कारण या वेळेस काही खाल्लं तर मग ते पचण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम पचनावर आणि वजन वाढण्यावर होतो.

Image: Google

मध्यरात्री भूक लागली तर..

1. मध्यरात्री भूक लागली तर काय करावं यावर अंजली मुखर्जी हाय प्रोटिन स्नॅक्सचा पर्याय सूचवतात. कारण हे पदार्थ थोडे खाल्ले तरी लगेच पोट भरतं. म्हणून सुका मेव्यासारखे पदार्थ यावेळेस खाणं उत्तम.

2. फळं खाणं हाही एक चांगला पर्याय आहे. पण खूप गोड असलेले फळं खाऊ नये. पपईसारखे कमी गोड फळं खाणं योग्य. कारण मध्यरात्री गोड फळं खाल्ली तर गोड फळातील साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरते. हाय प्रोटिन असलेला सुकामेवा आणि कमी गोड फळं यासाठी विशेष कष्ट करण्याची गरज पडत नाही. आपली मध्यरात्री भूक लागण्याची सवय लक्षात घेऊन एका डब्यात सुकामेवा काढून ठेवावा. तसेच कमी गोड फळं घरात असू द्यावीत.

Image: Google

3. रात्रीची भूक भागवण्यासाठी सूप करुन पिणं हा देखील उत्तम पर्याय आहे. सूपची तयारी झोपण्यापूर्वीच करुन ठेवलीतर भूक लागेल तेव्हा सूप करणं सोपं जातं. रात्री सूप पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक नसून फायदेशीर आहे.

4. घरात नाचणीचं सत्त्व ( साखर न मिसळलेलं) ठेवावं. थोडं तूप घेऊन त्यात जिर्‍याची फोडणी घालावी. नागली सत्त्वं/ पीठ तुपावर भाजून त्यात पाणी घालावं. चवीपुरतं मीठ घालून त्याला उकळी आणावी.ही सुपासारखी नागलीची गरम पेज रात्रीची भूक भागवण्यास उत्तम आहे.

5. रात्रीच्या जेवणात पुरेसे प्रथिनं नसतील तर मध्यरात्री भूक लागू शकते. म्हणून रात्रीचा आहार हा प्रथिनंयुक्त असावा. यामुळे पोट भरतं. मधेच भूक लागत नाही. 

6. मध्यरात्री भूक लागू नये यासाठी झोपेची वेळ पाळणं अतिशय आवश्यक आहे. उशिरापर्यंत गप्पा मारणं, सिनेमे बघणं यामुळे उशिरा झोपलं जातं. पण मग त्याचा दुष्परिणाम म्हणजे जेवणाला दोन तीन तास उलटून गेल्यानं भूक लागते. मग बिस्किटं, चिप्स, चिवडा असं काहीबाही खाल्लं जातं, नाहीतर चहा/ कॉफी प्यायली जाते जे अत्यंत चुकीचं ठरतं. उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे नाइट क्रेव्हिंग्ज होतं. मध्यरात्री खाणं ही एकदम चुकीची बाब असल्यानं या भुकेची सवय मोडण्यासाठी रात्री लवकर आणि वेळेवर झोपणं हा उत्तम पर्याय आहे. अथात शारीरिक मानसिक व्याधीमुळे रात्री लवकर झोप येत नसेल तर आधी डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.