Join us   

चिकनगुन्या बरा झाला तरी हातपाय प्रचंड दुखतात? 5 गोष्टी आहारात सांभाळा, पटकन बरे व्हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 5:42 PM

चिकनगुन्याच्या लक्षणांवर मात करुन तंदुरुस्त होण्यासाठी आहारातून पोषक तत्त्व मिळणं गरजेचं आहे. त्यासाठीच आरोग्यदायी आहाराला खूप महत्त्व आहे.

ठळक मुद्दे नारळ पाणी पिल्याने शरीरातील ओलवा तर टिकतोच शिवाय नारळ पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.आजारातून लवकर बाहेर येण्यासाठी पोष्टिक घरगुती सूप पिणं खूप गरजेचं असतं.आहारात हिरव्या पालेभाज्या असायला हव्यात. चिकनगुन्यात सांधे दुखी असते. यावर उपाय म्हणून हिरव्या पालेभाज्या मदत करतात.

 सध्या चिकनगुन्याची साथ मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. एडीज इजिप्टी नामक डासाच्या चावण्यातून हा आजार शरीरात पसरतो. या आजाराचा शरीरास लवकर संसर्ग होण्याचं कारण म्हणजे आहाराकडे दुर्लक्ष करणं हे देखील असतं असं आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. चिकनगुन्याकडे दुर्लक्ष करणं किंवा साधाच आहे आजार असं म्हणणं म्हणजे या आजाराची लक्षणं स्वत:साठी तीव्र करणं होय. चिकनगुन्या बरा झाल्यानंतरही थकवा, सांधेदुखी ही लक्षणं अनेक आठवडे राहातात. औषधांनी आजाराच्या संसर्गावर परिणाम होतो पण चिकनगुन्याची सर्व लक्षणं लवकर दूर होण्यासाठी आहाराकडेही लक्ष देण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. चिकनगुन्याच्या लक्षणांवर मात करुन तंदुरुस्त होण्यासाठी आहारातून पोषक तत्त्व मिळणं गरजेचं आहे. त्यासाठीच आरोग्यदायी आहाराला खूप महत्त्व आहे.

आहारात काय असणं गरजेचं?

छायाचित्रं- गुगल

1.  चिकनगुन्या झालेल्या रुग्णांसाठी शरीरातील पाण्याची पातळी योग्य असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा रुग्णांनी दिवसातून किमान दोन वेळा नारळ पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नारळ पाणी पिल्याने शरीरातील ओलवा तर टिकतोच शिवाय नारळ पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

छायाचित्रं- गुगल

2.  आहारात हिरव्या पालेभाज्या असायला हव्यात. चिकनगुन्यात सांधेदुखी असते. यावर उपाय म्हणून हिरव्या पालेभाज्या मदत करतात. या भाज्या पचायला सोप्या असतात आणि त्यात अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. शिवाय या भाज्यांमधे कॅलरीचं प्रमाणही कमी असतं.

छायाचित्रं- गुगल

3. आजारातून लवकर बाहेर येण्यासाठी पोष्टिक घरगुती सूप पिणं खूप गरजेचं असतं. गाजराच्या सूपमधून अ जीवनसत्त्व मिळतं तर टमाट्याच्या सूपमधून क जीवसत्त्व मिळतं. हे दोन्ही घटक आजारातून बरं होण्यासाठी खूप गरजेचे असतात. सूपद्वारे शरीराला आजारानं आलेला थकवा दूर होतो.

छायाचित्रं- गुगल

4.  पपईच्या पानांचा रस हा या आजारात रामबाण इलाज समजला जातो. चिकनगुन्यामधे रक्त पेशी बर्‍याच कमी झालेल्या असतात. पण पपईच्या पानांचा रस पिल्याने रक्त पेशींची संख्या पटकन वाढते.

छायाचित्रं- गुगल

5. चिकनगुन्या झालेल्यांच्या आहारपथ्यात शाकाहारी हलका आहार घेण्याचं पथ्य पाळण्याचा आग्रह धरला जातो. कारण या काळात जर मांसाहार केला तर लिव्हरवर भार पडून सूज येण्याचा धोका असतो. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ पौष्टिक शाकाहार घेण्याचा सल्ला देतात.