Join us   

आयोडिनयुक्त मीठ ऐकलंय, पण आहारात आयोडिन? तब्येतीचा तोल सांभाळणाऱ्या आयोडिनविषयी 5 गोष्टी माहीत आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 4:57 PM

तज्ज्ञ म्हणतात की आयोडिनबद्दल सविस्तर माहिती असली तरच आहारात आयोडिनचा विचार करुन पदार्थांचा समावेश केला जाईल. आरोग्य सांभाळायचं असेल तर आयोडिनबद्दलचं शहाणपण प्रत्येकात येणं गरजेचं आहे.

ठळक मुद्दे आयोडिन हे मिठातून मिळत असलं तरी शरीराला फक्त मिठातून मिळणार्‍या आयोडिनची गरज नसते. किंवा मीठातलं आयोडिन शरीरासाठी पुरेसं नसतं.आपण स्वयंपाकात वापरतो ते मीठ प्रमाणातच वापरायला हवं.आरोग्यासाठी काळं मीठ उत्तम मानलं जातं.

 स्वयंपाकात मीठ किती आवश्यक असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जरा काही अळणी लागलं की, कितीही आवडीचा पदार्थ असू दे तो बाजूला ठेवून दिला जातो. जितकं महत्त्वं मिठाचं स्वयंपाकात तितकंच महत्त्वं मिठामधे असलेल्या आयोडिन या घटकाचं आपल्या आरोग्याच्या बाबतीत आहे. शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण झाल्यास अनेक आजार उद्भवतात. नुकताच जागतिक आयोडिन कमतरता दिवस साजरा झाला. त्यानिमित्तानं जगभरात आपल्या शरीरासाठी आयोडिनच्या आवश्यकतेची , आयोडिनच्या स्त्रोतांची , आयोडिनच्या कमतरतेतून निर्माण होणार्‍या आरोग्यविषयक समस्यांची चर्चा झाली.

आयोडिन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते फक्त मीठ. आपल्या शरीराला आयोडिन कशातून मिळतं तर मिठातून एवढं सोपं उत्तर दिलं जातं. पण आरोग्य तज्ज्ञ म्हणतात हे अर्धसत्य सांगणारं उत्तर असून ते अपूर्ण देखील आहे. कारण मीठ हा शरीराला आयोडिन मिळवून देण्याचा एक स्त्रोत असून इतर अनेक मार्गांनी शरीराला आयोडिन मिळतं. पण त्याकडे दुर्लक्ष होतं. आयोडिनसाठी म्हणून आहारात मिठाचा जास्त उपयोग केल्यास त्याचा आरोग्यास तोटाच होतो. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की आयोडिनबद्दल सविस्तर माहिती असली तरच आहारात आयोडिनचा विचार करुन पदार्थांचा समावेश केला जाईल. आरोग्य सांभाळायचं असेल तर आयोडिनबद्दलचं शहाणपण प्रत्येकात येणं गरजेचं आहे.

Image: Google

आरोग्यासाठी आयोडिन का?

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, आपल्या शरीरासाठी आयोडीन म्हणजे पोषक घटक आहे. शरीरात थायरोक्सिनची निर्मितीसाठी आयोडिनची गरज असते. थायरोक्सिन हे हदयाच्या कार्यापासून पचन, बुध्दी आणि शरीराच्या विकासावर परिणाम करतं. त्यामुळे शरीरात थायरोक्सिन या घटकाचं प्रमाण सामान्य असणं आवश्यक आहे. हे प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी म्हणूनच आयोडिनची शरीराला गरज असते.

पुरेसं आयोडिन मिळालं नाही तर?

आहारातून आपल्या शरीरात पुरेसं आयोडिन गेलं नाही तर चेहर्‍यावर सूज येते, उंची खुंटते, दिसण्या, ऐकण्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, त्यात अडचणी निर्माण होतात, स्नायू जखडतात, नैराश्य, उदासिनता, भीती यासारखे मानसिक विकार उद्भवतात, थायरॉइड ग्रंथी वाढते आणि सुजते, गर्भपात होतो, मेंदू नीट काम करत नाही, कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं, आईच्या शरीरात पुरेसं आयोडिन नसेल तर नवजात अर्भकाचं वजन कमी भरतं, मुलांची वाढ नीट होत नाही.

Image: Google

आयोडिन हे फक्त मिठातच असतं का?

आयोडिन हे मिठातून मिळत असलं तरी शरीराला फक्त मिठातून मिळणार्‍या आयोडिनची गरज नसते. किंवा मीठातलं आयोडिन शरीरासाठी पुरेसं नसतं. आहारात आयोडिनयुक्त घटकांचा समावेश केल्यास शरीराची आयोडिनची गरज पूर्ण होते. आहारतज्ज्ञ म्हणतात, शरीराला पुरेशा प्रमाणात आयोडिन मिळण्यासाठी आहारात प्रमाणात मीठ असणं आवश्यक आहे, पण आयोडिनसाठी केवळ मिठावर अवलंबून राहूनही चालत नाही. यासाठी जेवणात मुळे, शतावरी, गाजर- टमाटे- काकडी यांचं सलाड, कांदा, केळी, स्ट्रॉबेरी, दूध, पनीर आणि कॉर्ड लिवर तेल यांचा समावेश सायला हवा. बटाटे, दूध, मनुके, दही, ब्राउन राइस, लसूण, मशरूम  यांचा समावेश असायला हवा. कारण यातही आयोडिन मोठ्या प्रमाणात असतं.

Image: Google

काळं मीठ उत्तम

काळं मीठ यालाच सेंद्रिय मीठ किंवा रॉक सॉल्ट असंही म्हटलं जातं. या मिठावर शुध्दीकरणाची प्रक्रिया केली जात नाही. सामान्यपणे ज्या मीठाचा वापर केला जातो त्याच्या तुलनेत काळ्या मिठात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण थोडं जास्तच असतं. आरोग्यासाठी काळं मीठ म्हणूनच उत्तम मानलं जातं.

Image: Google

आयोडिन हवं प्रमाणातच

आपण स्वयंपाकात वापरतो ते मीठ प्रमाणातच वापरायला हवं. पदार्थातील जास्त मीठ आणि इतर आयोडिनयुक्त पदार्थांचं अति सेवन यातून शरीरातील आयोडिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराला गरजेपेक्षा जास्त आयोडिन मिळून त्याचा थेट परिणाम हाडं ठिसूळ होण्यावर होतो.