Join us   

रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला 10 मिनिट करा मॉलिश, 6 दुखणी होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 7:18 PM

पायांची योग्य काळजी घेणं म्हणजे पायांच्या तळव्यांची तेलानं मालिश करणं. पायाच्या तळव्यांची मालिश केल्याचा फायदा फक्त पायांना आराम मिळण्यापुरताच मर्यादित नसतो तर आरोग्यशी संबंधित अनेक समस्या पायाच्या तळव्यांची मालिश केल्यानं बर्‍या होतात.

ठळक मुद्दे रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना तेलानं मालिश केल्यास डोकेदुखी थांबते, शांत झोप लागते.रोज रात्री झोपताना पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश केल्यास मनावरचा ताण, भीती, नैराश्य यासारखे मानसिक आजार कमी होण्यास मदत होते.काही मिनिटं पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश केल्यास पाळीत होणार्‍या विविध त्रासांवर आराम मिळतो.

आपल्या शरीराचा कोणता अवयव सर्वात जास्त काम करतो? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर असेल? आपले पाय हे दिवसभर कामात असतात आणि सर्वात जास्त दुर्लक्ष आपलं पायांकडेच होतं. पायांची काळजी घेणं म्हणजे केवळ पेडिक्युअर करणं नव्हे. कारण पेडिक्युअरमुळे पायाची वरची त्वचा स्वच्छ होते, पाय सुंदर दिसतात. पण पाय सुंदर दिसणं म्हणजे पायांची काळजी घेणं नव्हे . पायांची योग्य काळजी घेणं म्हणजे पायांच्या तळव्यांची तेलानं मालिश करणं. पायाच्या तळव्यांची मालिश केल्याचा फायदा फक्त पायांना आराम मिळण्यापुरताच मर्यादित नसतो तर आरोग्यशी संबंधित अनेक समस्या पायाच्या तळव्यांची मालिश केल्यानं बर्‍या होतात. रोज झोपताना 10 मिनिटं पायाच्या तळव्यांची मालिश केल्यास शरीराच्या आजारासोबतच मानसिक समस्यांवरही आराम मिळतो.

Image: Google

पायांच्या तळव्यांना मालिश केल्याने..

1. डोकेदुखी थांबते

रोजची धावपळ, मायग्रेन, प्रदूषण, अँलर्जी , थकवा या अनेक कारणांमुळे डोकं दुखतं. पण केवळ रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना तेलानं मालिश केल्यास डोकेदुखी थांबते, शांत झोप लागते. मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखीही नियमितपणे पायांच्या तळव्यांना तेलानं मालिश केल्यास कमी होते.

2. सपाट तळव्यांच्या दुखण्यावर उपाय

अनेकांचे तळपाय सपाट असतात. त्यांना अजिबात कर्व्ह नसतो. अनेकांच्या बाबतीत ही समस्या जन्मजात असते तर अनेकांच्या बाबतीत वजन वाढल्याने, गरोदरपणात, संधिवातामुळे किंवा जखम झाल्यानं पायाचे तळवे सपाट होतात. पण यामुळे पाय दुखतात. सपाट तळव्यांमुळे होणारी पायदुखी थांबण्यासाठी पायाच्या तळव्यांची तेलानं नियमित मालिश केल्याचा फायदा होतो.

Image: Google

3. पायांवरची सूज होते कमी

गरोदरपणात महिलांच्या संपूर्ण शरीरात बदल होतात. गरोदरपणामुळे पायांवर सूज येते. यामुळे टाच आणि घोटे दुखतात. अशा परिस्थितीत पायाच्या तळव्यानं तेलानं मालिश केल्यास सूज कमी होण्यास मदत होते. कारण मालिश केल्यानं रक्त प्रवाह सुधारतो. पायाकडचा रक्तप्रवाह सुधारला की सूज कमी होते.

4. रक्तदाबाशी निगडित समस्यांवर आराम

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही रक्तदाबाची समस्या भेडसावते. रक्तदाब असलेल्यांनी रोज झोपतांना पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश केल्यास रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते आणि हदय रोगाचा धोकाही कमी होतो. मालिश केल्यानं रक्त प्रवाह सुधारतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते. रक्तदाबाची औषधं घेण्यासोबतच पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश करणं याचा या आजारात चांगला फायदा होतो.

Image: Google

5. नैराश्य आणि भीतीवर उपाय

पाय आणि मेंदू शरीराची दोन टोकं. पण या दोघांमधेही कनेक्शन असतं. या दोघांमधला हा संबंध संपूर्ण आरोग्यावर प्रभाव टाकतो. याविषयीचे अनेक अभ्यास सांगतात की रोज रात्री झोपताना पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश केल्यास मनावरचा ताण, भीती, नैराश्य यासारखे मानसिक आजार कमी होण्यास मदत होते. कारण जेव्हा आपण पायाच्या तळव्यांची मालिश करतो तेव्हा शरीरात एंडोर्फिन नावाचं संप्रेरकं जास्त प्रमाणात स्त्रवतं. हे संप्रेरक आपल्याला आनंदी ठेवण्यास, आराम देण्यास मदत करतं.

6. पाळीत होणारा त्रास होतो कमी

पाळीच्या काळात अनेकींना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. पाळीमुळे मूड स्विंग्ज होणं, भीती वाटणं, चिडचिड होणं, झोप उडणं, थकवा येणं, डोकेदुखी , उदास वाटणं यासारख्या समस्या भेडसावतात. पण काही मिनिटं पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश केल्यास ही लक्षणं कमी होतात, तसेच पाळीत होणार्‍या वेदन कमी होतात. तसेच मेनोपॉजच्या काळातील लक्षणं कमी करण्यासही पायांच्या तळव्यांची मालिश करण्याचा फायदा होतो.