Join us

Health Tips: औषधाच्या गोळीवर मधोमध रेघ का असते? ८० टक्के लोकांना माहीत नाही खरे कारण... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 16:36 IST

Health Tips: आपण सगळ्यांनीच कोणत्या ना कोणत्या आजाराच्या निमित्ताने औषधाची गोळी खाल्ली असेल, पण तिच्यावर असणाऱ्या रेघेचा विचार कधी केला का?

डोकेदुखीपासून ते तापापर्यंतची औषधे बहुतेक घरांमध्ये उपलब्ध असतात ज्यामुळे एखाद्याची तब्येत अचानक बिघडली तर त्यावर प्राथमिक उपचार करता येतात. तर काही घरांमध्ये वृद्धांना नियमितपणे औषधे दिली जातात. त्यामुळे औषधांच्या गोळ्यांचे विविध आकार, रंग तुमच्याही पाहण्यात आले असतील. या औषधांच्या रंगावरून केमिस्ट सांगू शकतात की कोणते औषध कोणत्या वेळी घ्यावे किंवा खायला द्यावे. अशा गोळ्यांमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मध्यभागी सरळ रेषा असते; पण का? याबद्दल अनेकांना माहिती नसते, चला त्याबद्दल जाणून घेऊ. 

प्रत्येक गोष्टीच्या रचनेमागे, निर्मितीमागे विशिष्ट कारण असते. औषधांच्या बाबतीतही त्यांचे रंग, रूप, आकार आणि त्यावरील रेघ या सगळ्यांचा अभ्यासकांच्या नजरेतून बारकाईने विचार केला जातो. तूर्तास आपण गोळीवरील रेघेचे वैशिष्ट्य जाणून घेऊ. 

गोळ्या सहज तोडण्यासाठी

गोळीवरील रेषेचा मुख्य उद्देश टॅब्लेटला अर्ध्या किंवा लहान भागांमध्ये विभाजित करणे आहे, जेणेकरून ती सहजपणे तोडणे शक्य होते. हे विशेषतः जेव्हा रुग्णाला संपूर्ण गोळी ऐवजी अर्धी किंवा चतुर्थांश गोळी घ्यावी लागते, जसे की एखाद्याला डोस कमी करण्याची आवश्यकता असते तेव्हा उपयुक्त ठरते. तसेच लहान मुलांना गोळीचा पूर्ण डोस न देता अर्धी गोळी द्यायची असेल तर ही रेघ गोळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरते. 

औषधाची मात्रा ठरवण्यासाठी 

वैद्यकीय सल्ल्यानुसार गोळीचे योग्य आणि समान भागांमध्ये विभाजन केल्याने, औषधाचा डोस अचूक राहतो. जर टॅब्लेट स्कोअर न करता तुटला असेल, तर तो असमानपणे तुटू शकतो, परिणामी चुकीचा डोस होऊ शकतो.

पचनासाठी आरामदायक

काही गोळ्या मोठ्या असतात आणि त्यांना गिळणे कठीण असते. रेघेवर जोर देऊन तोडल्याने गोळीचे समान भाग होऊन ती टॅब्लेट रुग्णाला सहजपणे  गिळता येते. घशात अडकत नाही. 

औषधाच्या परिणामात बदल नाही

जेव्हा एखादी औषधाची गोळी घेतली जाते, तेव्हा तुटलेली गोळी असूनही त्याची परिणामकारकता आणि गुणवत्ता अबाधित राहते याची खात्री केली जाते. म्हणजेच अर्धी गोळी संपूर्ण भागाइतकीच प्रभावी ठरते. त्याचा परिणाम औषधाच्या डोसवर होत नाही. 

सर्व औषधांच्या गोळ्यांमध्ये रेघ असते का?

नाही! ज्या गोळ्यांवर रेघ नसते त्या गोळ्या तोडून उपयोग नसतो. ती पूर्ण घेणे अपेक्षित असते. ती अर्धवट घेतली तर त्याचा परिणाम बदलू शकतो. म्हणून काही टॅब्लेट अखंड असतात आणि ज्यांच्यावर रेघा असतात, त्याही गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच घेतल्या पाहिजेत.