Join us   

गर्भाशयातल्या गाठी हा आजार किती गंभीर असतो? त्यावर उपचार आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 5:24 PM

गर्भाशयातल्या गाठींवर उपचार आहेत, लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

ठळक मुद्दे फाय ब्रॉइड्सची स्थिती उद्भवण्यानं भिण्याचं कारण नाही. त्यासाठी योग्य औषधोपचार नि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. करायचं ते इतकंच की लक्षणांवर लक्ष ठेवायचं नि योग्य वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यायचा!

 वयाच्या पन्नाशीला पोहोचेपर्यंत युटेरियन फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयात गाठी होणार्‍या स्त्रियांचं प्रमाण मोठं आहे.. प्रसुतीच्या काळात गर्भाशयामध्ये विशिष्ट तर्‍हेची स्नायूंची गाठ किंवा गाठी होतात त्याला फ्रायब्रॉइड किंवा लियोमायोमस/ मायोमस असंही म्हणतात. अशी प्रत्येक गाठ कॅन्सरकडे मार्गक्रमण करतेच असं नाही. एखाद्या लहानशा बी प्रमाणे आढळणारा फायब्रॉइड वाढत जात जात अनेकदा खूप मोठा होतो नि गर्भाशयाचा फुगवटा वाढतो. नुसतं पाहून त्याची वाढ सहसा जाणवत नाही. कधी कधी गर्भाशयात अशी एखादी गाठ असते, पण बर्‍याच केसेसमध्ये त्यांचं रूपांतर अनेक लहानमोठ्या गाठींमध्ये होऊन वजन वाढतं, सर्व्हिक्स प्रसरण पावतं. ही वाढ छातीच्या पिंजर्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता अगदी नगण्य असते.

युटेरिन फायब्रॉइड्सची स्थिती का उद्भवते?

फायब्रॉइड्स होण्याची नेमकी कारणं अजून कुणीच ठामपणानं सांगितलेली नाहीत, मात्र खालील स्थितीमध्ये फायब्रॉईड तयार होण्याची शक्यता वाढते असं संशोधकांचं म्हणणं आहे.

- संप्रेरकांमधील बदल (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण)

- वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ, उदा. इन्सुलिनचं प्रमाण

- अनुवांशिकता

- इसीएम (एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स)

मघाशी म्हटलं त्याप्रमाणे, या गाठी गर्भाशयात का वाढतात, का संकुचित होतात याची कुठलीच नेमकी कारणं देता येत नसली तरी त्यांच्या निर्मितीचं मुख्य कारण संप्रेरकांमध्ये होणारा बदल हे आहे. गर्भधारणेच्या काळात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनसारख्या संप्रेरकांचं प्रमाण प्रचंड वाढतं, त्यासाठी दिल्या जाणार्‍या अँटिहार्मोनल औषधांमुळं ती आक्रसतात. रजोनिवृत्तीच्या दरम्यानही हेच घडतं. मूलपेशी म्हणजे स्टेम सेल्स हे फायब्रॉइड्समागचं दुसरं कारण असू शकतं. गर्भाशयाच्या मांसल भागात मूलपेशी असतात. या पेशी जलद विघटित होतात व पेशींभोवती गुळगुळित आवरण बनून राहातात. त्यातून आजार वाढत जातो.

लक्षणं?

गाठी कुठं नि किती आहेत, त्यांचा आकार केवढा आहे यावर लक्षणं अवलंबून आहेत. काही स्त्रियांमध्ये तर लक्षणं आढळतंच नाहीत. तरीही बहुसंख्य स्त्रियांना जी लक्षणं जाणवतात ती अशी..

1. मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव व प्रचंड वेदना

2. कंबरदुखी नि पायांमध्ये वेदना

3. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वाढ

4. बद्धकोष्ठता

5. ओटीपोटात भरून येणं

6. वंध्यत्व

उपलब्ध उपचार?

 

युटेरिन फायब्रॉइड्सच्या बाबतीत आता खूप उपचारांची सोय आहे, पण खालील उपाय सर्वसाधारणपणे वापरले जातात. इब्युप्रोफेन, अ‍ॅसेटामिनोफेन सारखी काही विशिष्ट औषधे गर्भाशयातील गाठींबाबतीत वापरली जातात. ल्युप्रॉन सारखी औषधं सहसा इंजेक्शनद्वारे दिली जातात. त्यामुळं गाठी आकुंचन पावतात.

शस्त्रक्रिया

1. मायोमेक्टमी : निरोगी पेशींना धक्का न लावता फायब्रॉइड्स काढून टाकण्याची ही शस्त्रक्रिया.

2. हिस्टरेक्टमी : गाठी खूपच मोठ्या असतील तर थेट गर्भाशय काढून टाकण्याची ही शस्त्रक्रिया.

3. मायोलेसिस : इलेक्ट्रिक करंट किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे गाठीत सुई टोचून त्या नाहीशा करण्याची शस्त्रक्रिया

4. एन्डोमेट्रियल अ‍ॅब्लेशन : लेसर, वायर लूप, मायक्रोवेव्ह, गरम पाणी वा अन्य पद्धती वापरून गाठी काढल्या जातात. शस्त्रक्रिया करताना रक्तस्राव होऊ नये म्हणून गर्भाशयाची लायनिंग काढली जाते.

फाय ब्रॉइड्सची स्थिती उद्भवण्यानं भिण्याचं कारण नाही. त्यासाठी योग्य औषधोपचार नि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. करायचं ते इतकंच की लक्षणांवर लक्ष ठेवायचं नि योग्य वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यायचा!