Join us   

महिलांसाठी आवश्यक 8 हेल्थ टेस्ट आहे, बघा त्याचे रिपोर्ट काय सांगतात, तुम्ही फिट की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:01 PM

तिशीनंतर बाईनं स्वत:च्या आरोग्याबाबत दक्ष रहाणं हे बरोबर आहे. पण दक्ष रहाणं, जागरुक रहाणं म्हणजे काय? याचा अर्थ अनेक महिलांना माहिती नसतो. याबाबत स्त्री रोग तज्ज्ञ सांगतात की तिशीनंतर बाईनं स्वत:च्या आरोग्याबाबत जागरुक राहाणं म्हणजे नियमित काही आरोग्यविषयक चाचण्या करुन घेणे. कोणत्या चाचण्या आहेत गरजेच्या?

ठळक मुद्दे तिशी पार केल्यानंतर महिलांनी ड जीवनसत्त्वाची टेस्ट करुन घेणे महत्त्वाचं आहे.सध्याच्या काळात तिशीनंतर महिलांनी थायरॉइड टेस्ट अवश्य करुन घ्यावी.तिशीतल्या प्रत्येक महिलेने पॅप स्मिअर टेस्ट ही गर्भाशयाशी संबंधित तपासणी करुन घ्यायला हवी.

 स्वत:चं आरोग्य हा महिलांसाठी कायम दुय्यम मुद्दा असतो. कुटुंब, कुटुंबाप्रती आपल्या जबाबदार्‍या एवढंच स्त्रियांना महत्त्वाचं वाटतं. छोट्या छोट्या आरोग्यविषयक कुरबुरींकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो ना इच्छा. आपल्याला काय होतंय? असा समज बहुतांश स्त्रिया स्वत:च्या आरोग्याबाबत करुन घेतात. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महिलांना महागात पडू शकतं. आजारानं गंभीर स्वरुप धारण केलं की महिला डॉक्टरांकडे येतात असा अनुभव अनेक स्त्री रोग तज्ज्ञांचा आहे. म्हणूनच स्त्री रोग तज्ज्ञ सांगतात की वयानं तिशी ओलांडली की बाईनं स्वत:च्या आरोग्याकडे सजगपणे पहायला हवं. स्वत:च्या आरोग्याबाबत जागरुक आणि दक्ष रहायला हवं.

तिशीनंतर बाईनं स्वत:च्या आरोग्याबाबत दक्ष रहाणं हे बरोबर आहे. पण दक्ष रहाणं, जागरुक रहाणं म्हणजे काय? याचा अर्थ अनेक महिलांना माहिती नसतो. याबाबत स्त्री रोग तज्ज्ञ सांगतात की तिशीनंतर बाईनं स्वत:च्या आरोग्याबाबत जागरुक राहाणं म्हणजे नियमित काही आरोग्यविषयक चाचण्या करुन घेणे. कारण या चाचण्यांमुळे आरोग्यासंबंधी काही तक्रार शरीरात डोकं वर काढत असेल तर तो आजार अगदी प्राथमिक स्वरुपात लक्षात येतो. वेळेवर औषधोपचार सुरु होतात. पुढची सर्व स्तरावरची आणीबाणी, धावपळ, तगमग, मनस्ताप टाळता येतो. तिशीनंतर प्रत्येक बाईनं स्वत:च आरोग्य स्वत:साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी महत्त्वाचं असतं हे लक्षात ठेवावं. कारण तिचं आरोग्य चांगलं असेल तरच कुटुंबाबाबतच्या जबाबदार्‍या तिला पार पाडता येतात. तिशी पार केलेल्या महिलांसाठी आठ प्रकारच्या टेस्ट महत्त्वाच्या असतात.

 तिशीनंतर 8 टेस्ट महत्त्वाच्या!

 

 

1. ड जीवनसत्त्व

तिशी पार केल्यानंतर महिलांनी ड जीवनसत्त्वाची टेस्ट करुन घेणे महत्त्वाचं आहे. ड जीवनसत्त्व म्हणजे मेदात विरघळणारं एक प्रो हाम्रोन्सचा एक गट आहे. तो आतड्यातील कॅल्शियम शोषून हाडांपर्यंत पोहोचवतं. शरीरात जर ड जीवनसत्त्वं कमी असेल तर हाडं कमजोर होतात.

2. थायरॉइड टेस्ट

सध्याच्या काळात तिशीनंतर महिलांनी थायरॉइड टेस्ट अवश्य करुन घ्यावी. जर कारण नसताना खूप थकवा जाणवत असेल, स्नायू सतत दुखत असतील, भूक वाढली किंवा घटल्यासारखी वाटत असेल तर थायरॉइड संबंधी आजार असण्याची शक्यता असते. यासाठी रक्त चाचणीद्वारे टी 3 , टी 4 आणि टीएसएच यांचं प्रमाण बघितलं जातं.

3. बॉडी मास इंडेक्स टेस्ट  

महिलांनी बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्स नियमित तपासून घेणं आवश्यक आहे. बीएमआय टेस्ट मुळे आपल्या शरीराचं वजन आपल्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे ना हे कळतं. बीएमआय म्हणजे वजन आणि उंचीचं गुणोत्तर. महिलांच्या बाबतीत त्यांचा बीएमआय हा 22 पर्यंत असणं योग्य असतं. यापेक्षा जास्त बीएमआय असेल तर स्थूलता वाढते आणि स्नायू मात्र कमजोर होतात.

 

 

4. रक्तदाब तपासणी

हल्ली तिशीनंतर महिलांमधे रक्तदाबासंबंधी तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महिन्यातून किमान एक वेळा महिलांनी आपला रक्तदाब तपासून घ्यावा. रक्तदाब जर उच्च असेल आणि त्याकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा परिणाम किडनी, हदय आणि मेंदूवर होतो. गंभीर धोक्यापासून वाचण्यासाठी नियमित रक्तदाब तपासणं हे केव्हाही चांगलं असं स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतात.

5. हीमोग्लोबिन

थकवा येणं, चक्कर येणं, किंवा डोकं दुखणं या तक्रारींकडे महिला हमखास दुर्लक्ष करतात. होत असेल असंच म्हणून काळजी घेत नाही. किंवा आपल्या मनानं काहीबाही औषध घेऊन, डोक्याल एखादा बाम वगैरे लावून मोकळ्या होतात. पण हा काही या समस्यांवरचा कायमस्वरुपी इलाज नाही. अश औषधांनी तात्पुरतं बरं वाटत असलं तरी या तक्रारी कायम जाणवतत. हे जर सतत जाणवत असेल तर मग त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. ही लक्षणं रक्तातील हीमोग्लोबिन कमी असण्याची आहे. हीमोगोग्लोबीन कमी असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरुपाचा अँनेमिया हा रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा आजार होवू शकतो. हीमोग्लोबिन टेस्ट केल्यानं आपल्याला रक्तातील हीमोग्लोबिनची पातळी कळते. ती जर कमी असेल तर डॉक्टर औषधं देतात सोबत योग्य आहाराचा सल्लाही देतात.

6. मधुमेह तपासणी

आपण जर वयाची तिशी गाठले असेल , आपलं वजन जास्त असेल,किंवा कुटुंबात कोणाला मधुमेहब असेल किंवा गरोदर असताना स्वत:ला मधुमेह झालेला असल्यास महिलांनी वर्षातून एकदा ही मधुमेह तपासणी करुन घ्यायला हवी. यासाठी रक्ताची उपाशीपोटी आणि जेवणानंतर अशा दोन चाचण्या कळतात. रक्तातील साखर वाढली असल्यास मधुमेह होतो. तो सुरुवातीच्या टप्प्यात अशा चाचणीद्वारे रोखता येतो किंवा त्यावर नियंत्रण मिळवता येतं.

 

7. पॅप स्मिअर टेस्ट

तिशीतल्या प्रत्येक महिलेने गर्भाशयाशी संबंधित ही तपासणी करुन घ्यायला हवी. गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान करण्यासाठी ही तपासणी केली जाते. हा आजार जर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आला तर योग्य उपचारांनी ती महिला पूर्ण बरी होवू शकते. यासाठी ही पॅप स्मिअर टेस्ट आवश्यक आहे.

8. नैराश्य चाचणी

तिशीतल्य महिलेकडे बघितलं तर ती सतत कामात गढलेलीच दिसते. ऑफिस आणि घर यांचा ताळ्मेळ घालताना तिची अशक्य धावपळ होत असते. या धावपळीतील ताणाचा, दमणुकीचा, धावपळीमुळे खाण्या पिण्याकडे होणार्‍या दुर्लक्षाचा परिणाम तिच्या शरीरासोबतच मानसिक आरोग्यावरही होतो. याकारणामुळे अनेक स्त्रिया नैराश्यात येतात पण त्यांना आपल्याला असं काही झालेलं असू शकतं याची जाणीवच नसते. डिप्रेशन प्राथमिक अवस्थेत असताना ओळखून त्यावर योग्य उपचार होणं, आवश्यकता वाटल्यास त्या स्रीला समुपदेशन मिळणं आवश्यक आहे. यासाठीच डिप्रेशन टेस्ट असते. डिप्रेशन हा आजार ओळखून त्यावर योग्य औषधोपचारांसाठी डिप्रेशन स्क्रीनिंग टेस्ट करुन घेणं आवश्यक आहे.