Join us

योनीमार्गात कोरडेपणा आला आहे? या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांना भेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 15:41 IST

योनीमार्गातील कोरडेपणा हा आधी किरकोळ विषय वाटू शकतो, पण त्यातून भविष्यात निर्माण होणार्‍या अडचणी कितीतरी अवघड असू शकतात,  यातून स्त्रीच्या लैंगिक आयुष्यात बरीच गुंतागुंत यामुळं उभी राहू शकते.

ठळक मुद्दे योनीभागातील कोरडेपणामुळं स्त्रीच्या लैंगिक प्रेरणांवर नकारात्मक परिणाम होतो.इस्ट्रोजेनची पातळी खालावणं हे कोरडेपणावरचं सगळ्यांत जास्त आढळून येणारं कारण असल्यामुळं कधीकधी ट्रॉपिकल इस्ट्रोजेन थेरपी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.योनीभागातील त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचाराचा मार्ग ठरवावा आणि नियमाने त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं

शरीर आर्द्र राहाणं, भरपूर पाणी पिणं ही गोष्ट योनीमार्ग ओलसर राहाण्यासाठी अत्यावश्यक आहे. शरीराच्या अशा स्थितीत शुक्राणूंचा प्रवास होतो व ते टिकतातही. लैंगिक पुनरूत्पादनासाठी तिथलं अल्कलाइन वातावरण अतिशय पोषक असतं. हा भाग ओलसर, लवचिक आणि निरोगी राहाणं यात सगळ्यात जास्त वाटा असतो इस्ट्रोजेनचा. त्याचं प्रमाण घटण्यातूनच विचित्र अडचणी निर्माण होतात. इस्ट्रोजेनची मात्रा कमी होण्याची अनेक कारणं असू शकतात आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हे घडू शकतं. आधी हा किरकोळ विषय वाटू शकतो, पण त्यातून भविष्यात निर्माण होणार्‍या अडचणी कितीतरी अवघड असू शकतात, हे ध्यानात घेऊन स्त्रीनं आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तिच्या लैंगिक आयुष्यात बरीच गुंतागुंत यामुळं उभी राहू शकते.

योनीभागातील कोरडेपणाची कारणं - रजोनिवृत्ती हे योनीभागातील कोरडेपणामागील नेहमीचं कारण. - कधीकधी अपत्यजन्म, स्तनपान या कारणांमुळेही योनीभागातील कोरडेपण अनुभवास येतं. - एंडोमेट्रिऑसिस किंवा गर्भाशयातल्या गाठींवर उपचार करताना दिली जाणारी औषधं ‘अँटिइस्ट्रोजेन कॉम्पोजिशन’ असणारी असतात, त्यातून ही समस्या उद्भवते. - काही अँटिडिप्रेसंटचा परिणाम म्हणून योनीभागातील कोरडेपणा जाणवतो. - संभोगापूर्वी पुरेसा फोअरप्ले न होण्यातूनही कोरडेपण येते. - काही अ‍ॅलर्जीजचा हा परिणाम असू शकतो. - अति धूम्रपान - व्यायामाचा अतिरेक - इम्यून सिस्टीम डिसॉर्डर - अतिरेकी ताणतणाव - नैराश्य - किमोथेरपीची हिस्ट्री

योनीभागातील कोरडेपणामुळं स्त्रीच्या लैंगिक प्रेरणांवर नकारात्मक परिणाम होतोच, पण त्याशिवाय या भागात खाज सुटणं, आग होणं, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना होणं हे ही अनुभव  काही स्त्रियांना येतात. वारंवर असा त्रास जाणवत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही हिताचं. ते पेल्विकच्ं परीक्षण करून तक्रारींचं नेमकं निदान करू शकतात. कधीकधी मूत्रमार्गात झालेल्या संसर्गामुळेही वरील त्रास होतात, त्यामुळंच नेमकं कारण समजून उपचार वेळेवर होणं जरूरीचं असतं.

योनीभागातील कोरडेपणावर काय उपचार करावेत? इस्ट्रोजेनची पातळी खालावणं हे कोरडेपणावरचं सगळ्यांत जास्त आढळून येणारं कारण असल्यामुळं कधीकधी ट्रॉपिकल इस्ट्रोजेन थेरपी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शरीराचं काम पूर्ववत चालण्यासाठी आणि शरीरक्रियेच्या निरोगी प्रतिसादासाठी हार्मोन्सचा स्राव, पातळी नॉर्मल होणं, त्यांची निर्मिती होत असणं अत्यावश्यक आहे. योनीभाग आर्द्र, ओलसर राहाण्यासाठी म्हणून काही विशेष ल्युब्रिकंट्स असतात. त्यांच्या वापरानं फायदा होतो. योनीभागातील त्वचा अत्यंत नाजूक आणि  संवेदनशील असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचाराचा मार्ग ठरवावा आणि नियमाने त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं हे उत्तम.