Join us   

हायपरथायरॉइड औषधांनी नियंत्रणात येत नाही, तर डाएट बदला! ही  पथ्यं पाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 1:43 PM

हायपरथायरॉइड औषधोपचार, व्यायाम याद्वारे उपाय केले जातात. पण आहार हे देखील औषधासारखंच काम करतं. त्यामुळे जर हायपरथायरॉइड असेल तर काय खावं आणि काय खाऊ नये हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. आहाराचे नियम पाळूनही हायपरथायरॉइडमुळे होणारे त्रास आपण कमी करु शकतो.

ठळक मुद्दे रोजच्या आहारात सुकामेवा, अनेक प्रकारच्या बिया, मशरुम हे पदार्थ खाणे आवश्यक आहे.थायरॉइडसंबंधी आजारात आलं, हळद, काळी मिरी, लवंग आणि पुदिना यांचा समावेश आहारात असायला हवा.थायरॉइडचा त्रास असणार्‍यांनी सकाळी चहा, कॉफी न घेता हर्बल चहा, पाणी किंवा अँपल व्हिनेगर टाकून पाणी प्यायला हवं.

 

पूर्वी थायरॉइड हा शब्द फार क्वचित ऐकायला यायचा असं वयानं जेष्ठ असलेल्या महिला म्हणतात. पण आता तर अनेक तरुण वयातल्या महिलांकडून ‘मला थायरॉइड’चा त्रास आहे असं ऐकायला येतं. थायरॉइडसंबंधी हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथारॉइडिझममध्ये थायरॉइड ग्रंथी आवश्यकतेपेक्षा अधिक थायरॉइड संप्रेरकाची निर्मिती करते. त्यामुळे झोप न येणे, हदयाचे ठोके कमी जास्त होणे, अशक्तपणा येणे, वजन घटणे, हातापायाला कंप सुटणे, जुलाब होणे हे त्रास होतात. आज या समस्येचा सामना अनेकजणी करत आहे. हायपरथायरॉइडवर औषधोपचार, व्यायाम याद्वारे उपाय केले जातात. पण आहार हे देखील औषधासारखंच काम करतं. त्यामुळे जर हायपरथायरॉइड असेल तर काय खावं आणि काय खाऊ नये हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. आहाराचे नियम पाळूनही हायपरथायरॉइडमुळे होणारे त्रास आपण कमी करु शकतो.

काय खायला हवं?

* पौष्टिक खाण्याला महत्त्व द्यायला हवं. असे पदार्थ ज्यात अनेक जीवनसत्त्वं, खनिजं आणि विकर असतील. यासाठी रोजच्या आहारात सुकामेवा, अनेक प्रकारच्या बिया, मशरुम हे पदार्थ खाणे आवश्यक आहे. या पदार्थात समाविष्ट असलेलं कॅल्शिअम, झिंक, लोह हे तत्त्वं हायपरथायरॉइडमुळे येणारी सूज रोखतात . या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडंही मजबूत होतात.

*  आहारात हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. थायरॉइड संबंधी त्रास असेल तर हिरव्या पालेभाज्या अधिक लाभदायक ठरतात. तसेच ब्रेसिसेकी या परिवारातल्या ब्रोकोली, सलगम सारख्या कंदमूळ वर्गीय  भाज्या खाणं आवश्यक आहे. या भाज्या शरीरातील लोहाचा उपयोग व्यवस्थित करुन घेतात.

*  आपला भारतीय स्वयंपाक मसाल्यांशिवाय होऊच शकत नाही. अनेक मसाल्यांमधे औषधी तत्त्वं असतात. थायरॉइडसंबंधी आजारात आलं, हळद, काळी मिरी, लवंग आणि पुदिना यांचा समावेश आहारात असायला हवा. या मसाल्यांमधे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. अँण्टिऑक्सिडण्टसमुळे थायरॉइडची लक्षणं कमी होतात.

काय खाणं टाळायला हवं?

योग्य आहार जसा आपल्या समस्यांवर उपाय असतो तसाच अयोग्य आहारामुळे असलेल्या समस्या आणखी मोठ्या होतात. त्यामुळेच हायपरथायरॉइडच्या बाबतीत काय खायला हवं हे जसं महत्त्वाचं तसंच काय खाऊ नये याबाबतची पथ्यं पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

*  थायरॉइडसंबंधित समस्यांमध्ये आयोडिन हा घटक खूप परिणामकारक आहे. त्यामुळे आयोडिनयुक्त पदार्थ कमी खावेत किंवा टाळावेत. आयोडिनयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे ग्रेव्ह्स डिसीज सारखा थायरॉइडसंबंधी आजार होतो जो हायपरथायरॉइडची लक्षणं आणखीनच वाढवतो. त्यामुळे, दूध, पनीर, बटर यासारखे पदार्थ अगदी कमी सेवन करावेत किंवा टाळावेत.

* ग्लुटेनयुक्त पदार्थांचं सेवन टाळायला हवं. कारण यामुळे शरीरास सूज येणं , वारंवार अँलर्जीचा त्रास होणं या समस्या निर्माण होतात. गहू, सातू आणि यिस्टसारख्या पदार्थांमधे ग्लूटेन असतं. त्यामुळे हे पदार्थ टाळायला हवेत.

* सोया या घटकाचं सेवनही थायरॉइड समस्येत टाळायला हवं. सोयाबिनमधे आयोडिन नसतं मात्र सोयाबिनपासून तयार होणार्‍या टोफूचा अभ्यास करण्यात आला तो अभ्यास सांगतो की सोयामुळे थायरॉइड समस्या गंभीर होते.

*  दिवसभरात खाणं कमी आणि चहा कॉफी पिणं , चॉकलेटस खाणं जास्त असं अनेकजणांच्या बाबतीत होतं. यामुळे तत्काळ ऊर्जा मिळत असली तरी यातील कॅफिन या घटकामुळे जीव घाबरणं, चिडचिड होणं, हदयाचे ठोके वाढणं हे त्रास होतात. यामुळे हायपरथायरॉइडचा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे थायरॉइडचा त्रास असणार्‍यांनी सकाळी चहा, कॉफी न घेता हर्बल चहा, पाणी किंवा अँपल व्हिनेगर टाकून पाणी प्यायला हवं.