Join us   

दुहेरी मास्क लावताय, कॉण्ट्रास्ट मॅचिंगही करताय, पण हे डबल मास्किंग तुम्ही चुकीचं तर करत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 8:38 PM

मास्क हा कोरोना विषाणूचा सामना करणारं आघाडीवरचं शस्त्र आहे. दुहेरी मास्क वापरण्याच्या सुचनेमुळे जर यात गोंधळ निर्माण होत असेल तर हा गोंधळ आधी सोडवायला हवा. दुहेरी मास्क का गरजेचा आहे हे समजून घेणं तर गरजेचं आहेच ,पण सोबत दुहेरी मास्क वापरताना काय काळजी घ्यावी, याची माहितीही असायला  हवी. 

ठळक मुद्दे संशोधनाच्या आधारे हे सिध्द झाले आहे की,दुहेरी मास्क लावल्यानं केवळ कोरोना विषाणूच्या संसर्गालाच प्रतिबंध होतो असं नाही तर इतर संसर्गजन्य आजारांचा धोकाही टळतो.सर्जिकल मास्क घालून त्यावर कापडी मास्क घातल्यानं चेहेरा आणि मास्क यातलं अंतर मिटतं.संशोधन सांगतं की दुहेरी मास्कमुळे हवा फिल्टर होवून श्वास नलिकेत जाते, दुहेरी मास्कमूळे अंतर आणि त्यातून विषाणू संसर्गाचा धोका टळतो.

 कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क घालणं हे आता अनिवार्य झालं आहे. सध्याच्या परिस्थितीत तर बाहेर जाताना दुहेरी मास्क करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. एक मास्क नीट घालण्याचा कंटाळा करणारे लोक दुहेरी मास्कच्या वापराबाबत गोंधळलेले आहेत. मास्क हा कोरोना विषाणूचा सामना करणारं आघाडीवरचं शस्त्र आहे. दुहेरी मास्क वापरण्याच्या सूचनेमुळे जर यात गोंधळ निर्माण होत असेल तर हा गोंधळ आधी सोडवायला हवा. त्यासाठी आधी दुहेरी मास्क का गरजेचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. संशोधनाच्या आधारे हे सिध्द झाले आहे की,दुहेरी मास्क लावल्यानं केवळ कोरोना विषाणूच्या संसर्गालाच प्रतिबंध होतो असं नाही तर इतर संसर्गजन्य आजारांचा धोकाही टळतो. एकावर एक मास्क घातल्यानं नाक आणि तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या किंवा आत येणाऱ्या द्रवबिंदूना चांगला अटकाव होतो. दुहेरी मास्क हे चेहेऱ्याला व्यवस्थित घट्ट बसतात. एक मास्क घालून चेहेरा आणि मास्क यात थोडं अंतर पडतं. हे अंतर विषाणूचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतो. हे अंतर दुहेरी मास्क घातल्यानं नष्ट होतं. आता केवळ मास्क नव्हे तर दुहेरी मास्क घालणं ही गरज झाली आहे. पण दुहेरी मास्क लावताना काळजी घेण्याची आणि चूका टाळण्याची गरज आहे.

दुहेरी मास्क लावताना काय काळजी घ्याल?

-सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुहेरी मास्क घातलं तरी हात धुण्यासारखी वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर हे नियमही काटेकोरपणे पाळायचे आहेत.दुहेरी मास्क घालण्याच्या दोन पध्दती आहेत. एक म्हणजे सर्जिकल मास्क घालून त्यावर कापडी मास्क घालावं. सर्जिकल मास्क घातल्यानंतर मास्क आणि चेहेरा यात अंतर राहातं . सर्जिकल मास्क घालून त्यावर कापडी मास्क घातल्यानं चेहेरा आणि मास्क यातलं अंतर मिटतं.

-दुसरी पध्दत म्हणजे सर्जिकल मास्क घालून त्याच्या अटकवण्याच्या लेसला गाठ मारावी आणि त्यावरुन रुमाल किंवा स्कार्फ सारखं कापड बांधावं. यापध्दतीनं दुहेरी मास्क घालताना आपल्याला व्यवस्थित श्वास घेता येतोय ना याची काळजी घ्यावी. मास्कद्वारे चेहेरा आणि नाकाकडचा सर्व भाग व्यवस्थित झाकलेला आहे ना याची काळजी घ्यावी.

-नोज वायर किंवा मास्क फिटरद्वारे मास्क चेहेऱ्यावर श्वास घेता येईल इतपत घट्ट करावा.

- कापडी मास्क हा रोज विशिष्ट कालावधीनंतर धुवावा. बदलावा.

- मास्कला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत.

- कानावरच्या पट्ट्यांना धरुन मास्क काढायला हवा. मास्क काढताना चेहेऱ्याच्या बाजूला हात लावून काढू नये.

दुहेरी मास्क लावताना हे टाळाच! याबाबतचं संशोधन सांगतं की दुहेरी मास्कमुळे हवी फिल्टर होवून श्वास नलिकेत जाते, दुहेरी मास्कमुळे अंतर आणि त्यातून विषाणू संसर्गाचा धोका टळतो. पण दुहेरी मास्क घालणं म्हणजे मास्कचा एकावर एक थर चढवणं नव्हे. दुहेरी मास्क लावताना काळजी घ्यावी लागते. - एकाच प्रकारचे दोन मास्क एकावर एक घालू नये. उदा. दोन कापडी मास्क किंवा दोन सर्जिकल मास्क एकावर एक घालू नये.

- एन ९५ हे मास्क हे सर्जिकल किंवा कापडी मास्कसोबत वापरु नये.

- मास्कची एकच जोडी सलग वापरु नये,

- मास्कवर कोणत्याही निर्जंतुकीकरणाचा उपयोग करु नये. त्याऐवजी मास्क धुणं हाच मास्क स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग असल्याचं संशोधकांचं मत आहे.

- मास्क फाटलं असेल किंवा मळलेलं असेल तर ते वापरु नये.

- कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी श्वास घेण्यासाठी म्हणून झडप ठेवलेले मास्क वापरु नये. यामुळे श्वास घेताना अशुध्द हवा आत जाण्याचा किंवा इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो.

- कापडी, सर्जिकल, एन ९५, के एन९५ सोडून इतर कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक स्वरुपाचे मास्क वापरु नये.

- लेअर मास्क हे कोरोना संसर्गाच्या काळात वापरणं सुरक्षित आहे.

दुहेरी मास्क का वापरावं याबाबत केवळ संशोधन झालं असं नाही तर दुहेरी मास्क वापरल्यानं काय घडतं याचा देखील सर्वेक्षणातून अभ्यास केला गेला आहे. हा अभ्यास सांगतो की दुहेरी मास्क हे कोरोना संसर्गाच्या काळात विषाणूंना अटकाव करण्यास प्रभावी उपाय ठरत आहेत. एक कापडी मास्क हे ५२ टक्के हवेतील द्रवबिंदू रोखतात. तर सर्जिकल मास्क वापरल्यास ७० टक्के हवेतील द्रवबिंदू श्वसननलिकेत जाण्यापासून आणि श्वसननलिकेतून बाहेरपडण्यापासून रोखले जातात . म्हणूनच कापडी आणि सर्जिकल मास्क यांची जोडी दुहेरी मास्कच्या रुपात वापरल्यास ८५ टक्के हवेतील द्रवबिंदू रोखले जातील असं अभ्यासक म्हणतात. त्यामुळे बाहेर जाताना दुहेरी मास्क वापरणं हे स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी उत्तम पर्याय आहे. फक्त दुहेरी मास्क वापरताना वर सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.