Join us   

गर्भाशय आणि बीजांडं वाहक नलिकेच्या कॅन्सरची लक्षणं लवकर दिसत नाहीत, त्यामुळे दुखणं अंगावर काढू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 2:33 PM

गर्भाशय आणि बीजांड नलिकेच्या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीच्या काळात स्पष्टपणे आढळत नसल्यामुळं स्त्रियांनी काही लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवून आपल्या तब्येतीकडं जागरूकपणे पाहायला हवं.

ठळक मुद्दे  संशोधन असं सांगतं की गर्भाशय आणि बीजांड नलिकेचा कॅन्सर जवळपास 70टक्के शेवटच्या टप्प्यात कळतो.मुळात कुठलीच लक्षणं नसण्यामुळं फार उशीरा हा कॅन्सर लक्षात येतो.रुग्णाचं वय आणि सर्वसाधारण तब्येत, ठळकपणानं जाणवणारी लक्षणं, विशिष्ट तर्‍हेच्या कॅन्सरच्या अस्तित्वाची शंका, पूर्वी केलेल्या तपासणींचे रिपोर्ट्स अशा सगळ्यांचा अभ्यास करून डॉक्टर विशिष्ट स्क्रीनिंग टेस्ट सुचवतात

माणसाच्या शरीराला असंख्य प्रकारचे कॅन्सर ग्रासतात. याची कारणं आणि लक्षणंही अनेक असतात . स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं तर बहुसंख्य स्त्रियांना गर्भाशय आणि बीजांडवाहक नलिकेचा (ओवेरियन व फॅलोपिअन ट्यूबचा) कॅन्सर सतावतो. या आजारात गर्भाशय आणि बीजांड वाहक नलिकेमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढतात.

ज्यांच्या आईला, बहिणीला अशा कॅन्सरचा किंवा स्तनाच्या कॅन्सरचा सामना करायला लागलाय त्यांच्या बाबतीत ही रिस्क जास्त असते. ज्या स्त्रियांच्या कुटुंबियांच्या बाबतीत कॅन्सरची हिस्ट्री आहे त्यांना आणि ज्यांना गर्भाशय, गुदाशय किंवा मोठ्या आतड्याचा कॅन्सर होऊन गेला आहे त्यांच्याबाबतीतही ओव्हेरियन कॅन्सरचा धोका अधिक असतो.

ज्या स्त्रियांना गर्भाशय आणि बीजांड नलिकेच्या कॅन्सरबाबत शंका येते त्यांनी ताबडतोब स्क्रीनिंग टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. या कॅन्सरची कुठलीही लक्षणं जाणवत नसतानाही ही तपासणी करून घेता येऊ शकते. संशोधन असं सांगतं की या तर्‍हेचा कॅन्सर जवळपास 70टक्के शेवटच्या टप्प्यात कळतो. त्यामुळेच नसता धोका पत्करण्याऐवजी स्त्रियांनी वेळेवर स्क्रीनिंग टेस्ट करून घेणं हिताचं आहे.

या दोन्ही प्रकारातल्या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीच्या काळात स्पष्टपणे आढळत नसल्यामुळं स्त्रियांनी काही लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवून आपल्या तब्येतीकडं जागरूकपणे पाहायला हवं.

फॅलोपिअन ट्यूबच्या कॅन्सरची लक्षणं - योनीमार्गातून पांढरा, गुलाबीसर किंवा पारदर्शक स्राव येणं. - ओटीपोटात दाब किंवा वेदना जाणवणं. - पोटाच्या खालच्या भागात सूज जाणवणं. - मासिक पाळीचा काळ नसतानाही रक्तस्राव होणं.

ओव्हेरियन कॅन्सरची लक्षणं - पोटाच्या भागात जाणवण्याइतपत वाढलेला मांसल घट्टपणा जाणवणं. - पोटात जडपणा वाटणं. - अपचन, मलावरोध, मळमळ, उलटी अशी लक्षणं जाणवणं. अनेकदा डॉक्टरांना तपासणीनंतर वेगळी लक्षणं जाणवतात, तेव्हा ते अधिक सखोल तपासणी करायला सांगतात. स्त्रियांमध्ये या दोन्ही प्रकारचा कॅन्सर आहे का हे तपासण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध आहेत. रुग्णाचं वय आणि सर्वसाधारण तब्येत, ठळकपणानं जाणवणारी लक्षणं, विशिष्ट तर्‍हेच्या कॅन्सरच्या अस्तित्वाची शंका, पूर्वी केलेल्या तपासणींचे रिपोर्ट्स अशा सगळ्यांचा अभ्यास करून डॉक्टर विशिष्ट स्क्रीनिंग टेस्ट सुचवतात. त्यावेळी वेळ मुळीच न दवडता ताबडतोब संबंधित तपासण्या करवून घ्याव्यात. त्यातून गर्भाशय अथवा बीजांड नलिकेचा कॅन्सर आहे किंवा नाही याचं निदान करता येतं.. कधीकधी स्क्रीनिंग टेस्टही या निदानासाठी अपुर्‍या ठरतात. मुळात कुठलीच लक्षणं नसण्यामुळं फार उशीरा हा कॅन्सर लक्षात येतो.

  आजार निश्चित करणाऱ्या प्राथमिक तपासण्या कोणत्या?

1. ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड : अल्ट्रासाऊंडच्या प्रोबच्या सहाय्यानं योनीमार्गातून ओव्हरीज व गर्भाशय यांचे भाग तपासले जातात. उच्च वारंवारितेच्या ध्वनी लहरी ही चाचणी करताना वापरल्या जातात, जेणेकरून आतल्या अवयवांचं चित्र उमटू शकेल. संबंधित अवयवांमध्ये कुठल्याही तर्‍हेचा कॅन्सर उपस्थित आहे का हे त्या इमेजवरून ठरवता येतं. 2. सीए 125 रक्तचाचणी : सीए 125 हा विशिष्ट घटक रक्तात आढळला तर ट्यूमर असण्याची खूण पटते. गर्भाशय नि ओव्हरीजचा कॅन्सर असणार्‍या स्त्रियांच्या रक्तात हा घटक तयार होतोच. एंडोमेट्रिऑसिस, इन्फ्लेमेशन, युटेरिन फायब्रॉइड असणार्‍या स्त्रियांच्या रक्तामध्ये सीए 125 हा घटक प्रचंड तयार होतो. त्यामुळेच ही तपासणी या प्रकारच्या कॅन्सरच्या निदानासाठी अगदी नेमकी ठरणारी असते. 3. रेक्टोव्हजायनल पेल्व्हिक एक्झॅम : पेल्व्हिक रिजनमध्ये म्हणजे ओटीपोटाच्या भागात कॅन्सर आहे का याचे निदान होण्यासाठी ही चाचणी अत्यवश्यक असते. या तपासणीत डॉक्टर योनीमार्गात व गुदाशयात बोट घालून आत कुठे गाठ जाणवते का हे बघतात. त्यामुळं कुठल्याही प्रकारची विचित्र वाढ अथवा गाठ या भागात असली तर ताबडतोब कळते. ही चाचणी जरा विचित्र व वेदनादायी वाटू शकते, मात्र त्यामुळं डॉक्टरना गुदद्वार नि योनीमार्गात जर गाठ असलीच तर केवढी व कसल्या तर्‍हेची आहे याचा नेमका अंदाज येऊ शकतो. जर तसं आढळलं तर कॅन्सर असण्यावर शिक्कामोर्तब होतं.

पुढे काय? दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारचा कॅन्सर आहे हे सिद्ध झालं की शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी असे उपचार जरूरीप्रमाणे चालू करणं आवश्यक असतं. या भागातील विशिष्ट वाढ निपटून काढणं आणि पुढची वाढ रोखणं हा शस्त्रक्रियेमागचा हेतू. समजा शस्त्रक्रियेद्वारे कॅन्सरच्या गाठी काढता येण्याजोग्या नसेल व कॅन्सरने पुढचा टप्पा गाठला असेल तर डॉक्टर किमोथेरपीचा सल्ला देतात. एक लक्षात ठेवायला हवं, कॅन्सर झाला म्हणून घाबरण्याचं कारण नाही. लक्षणांवर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य उपचार केले तर हा आजार आटोक्यात आणता येतो, बरा करता येतो.