Join us   

अँनेमियाचा धोका टाळा, खा ही 6 फळं! हिमोग्लोबिन वाढवायचं तर सोपा आणि तातडीचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 7:20 PM

हिमोग्लोबिन आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. 5 फळांचा जाणीवपूर्वक आपल्या आहारात समावेश केल्यास रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य राहाते आणि अँनेमियाचा धोका टळतो.

ठळक मुद्दे पिकलेला पेरु नियमित खाल्ल्यास रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होत नाही.सफरचंदात लोह हा घटक भरपूर प्रमाणात असतो. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी डाळिंब खाणं फायदेशीर ठरतं.

आपल्याला अँनेमिया आहे हे अनेक महिलांना माहित देखील नसतं. अनेक महिलांची हिमोग्लोबिनची पातळी अतिशय कमी असते. ही पातळी वाढवण्यासाठी त्या केवळ औषधांवर अवलंबून राहातात. डॉक्टर त्यांना हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहाराचे नियम सांगतात, पण त्याकडे त्या पूर्ण दुर्लक्ष करतात. पण हिमोग्लोबिनचं प्रमाण आवश्यक पातळीपेक्षा खाली गेल्यास अँनेमिया होण्याची शक्यता असते. हिमोग्लोबिन आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. रक्तात हिमोग्लोबिन जर कमी असेल तर शरीरातील ऑक्सिजनचं वहन पूर्ण क्षमतेनं होत नाही. प्रामुख्याने महिलांमधे अँनेमियाची समस्या निर्माण होते. त्याचे परिणाम म्हणून हाता-पायावर सूज येणे, लवकर थकायला होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं, खूप घाम येणं या समस्या जाणवायला लागतात. हे सर्व टाळण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सांभाळणं आवश्यक आहे. ते सांभाळण्यासाठी काही फळांचा आपल्या आहारात जाणीवपूर्वक समावेश केला तरी अँनेमियाचा धोका टळतो असं डॉक्टर्स सांगतात.

हिमोग्लोबिन वाढवणारी फळं

Image: Google

1. पेरु: पेरुमधे सोडियम, पोटॅशियम आणि लोह हे घटक भरपूर प्रमाणात असतात. पेरु खाल्ल्यानं जर अँनेमिया असेल तर ही समस्या कमी होण्यास मदत होते. पेरु जितका जास्त पिकलेला तितका तो पौष्टिक असतो. पिकलेला पेरु नियमित खाल्ल्यास रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होत नाही.

Image: Google

2. डाळिंब: हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी डाळिंब खाणं फायदेशीर ठरतं. डाळिंबात लोह तर भरपूर प्रमाणात असतंच. सोबतच मॅग्नेशियम, कॅल्शियम, क जीवनसत्त्व हे घटकही असतात. नुसते डाळिंबाचे दाणे खाणं जेवढं फायदेशीर तितकंच एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे डाळिंबाचे पावडर घालून ती दुधात मिसळून पिल्यानेही रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य राहाते. डाळिंबाची पावडर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते.

Image: Google

3. सफरचंद: रोज सफरचंद खाणं हे आरोग्यासाठी लाभदायकच असतं. अनेक आजारांवरच एक औषध म्हणून या फळाकडे बघितलं जातं. अँनेमियासारख्या समस्येत रोज सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं. सफरचंद खाल्ल्याने हिमोग्लोबिनचा स्तर योग्य राहातो. सफरचंदात लोह हा घटक भरपूर प्रमाणात असतो. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. तसेच पोटाच्या आरोग्यासाठीही सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं.

Image: Google

4. अंजीर: ओलं-सुकं अंजीर म्हणजे गुणांचा खजिना होय. अंजीरमधे कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम, अ, ब1, ब2 ही जीवनसत्त्वं, क्लोरीन हे घटक असतात. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रोज रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवावेत आणि सकाळी तोंड धुतल्यानंतर अंजीराचं पाणी पिण्याचा आणि भिजलेलं अंजीर खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नुसतं अंजीर खाल्लं तरी त्याचा हिमोग्लोबिन वाढीसाठी फायदा होतो. तसेच चार ते पाच अंजीर दुधात उकळून खाल्ले तर अँनेमियाच्या समस्येत त्याचा फायदा होतो.

Image: Google

5. द्राक्षं: द्राक्षात भरपूर प्रमाणात लोह असतं. शरीरातील रक्ताची कमतरता द्राक्षं खाल्ल्यानं भरुन निघते. द्राक्ष खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची निर्मिती होते. त्यामुळेच द्राक्षं खाल्ल्यानं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. द्राक्षामधील क जीवनसत्त्वं एजिंगची गती कमी करतं आणि पोटाचं आरोग्यही चांगलं ठेवतं. त्यामुळे द्राक्षांच्या हंगामात अवश्य द्राक्षं खावीत.

Image: Google

6. आंबा: आंब्यामधे लोहासोबतच अ, क जीवनसत्त्वं असतात. आंब्याच्या हंगामात नियमित आंबा खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरुन निघते. आंब्याच्या सेवनामुळे शरीरात रक्त निर्मिती होते. यामुळे अँनेमियासारख्या समस्यांचा धोका टळतो.