Join us   

वयात येताना आपल्या बदलत्या शरीराचीच भीती वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 3:18 PM

पौगंडावस्था हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यात शरीरात आणि भावनांमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. हा अनुभव तुमच्यासाठी नवा असला तरी हे बदल मोठं होणाऱ्या प्रत्येकात होतात.

ठळक मुद्दे सर्वसाधारणपणे पौगंडावस्था वयाच्या ८ ते १३ या वयदरम्यान कधीतरी सुरु होते. पण शरीरातले ठळक बदल साधारण वयाच्या दहाव्या नाहीतर अकराव्या वर्षी दिसायला लागतात.शरीरात आणि मनात बदल घडून येतात कारण तुमच्या शरीरातल्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो.अँस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन महत्त्वाची हार्मोन्स याच टप्प्यात स्त्रवायला सुरुवात होते. 

टीनएजर म्हणून आपण काहीतरी भलतंच वागतो, बोलतो असं वाटतं का  तुम्हाला?  शरीरात होणाऱ्या बदलांमुळे स्वतःची लाज वाटते का ?   तर सर्वात आधी रिलॅक्स व्हा! टेन्शन न घेता हे का होतं हे समजून घ्या.  जे काही सध्या तुमचं होतंय ते एकदम नॉर्मल आहे.  या वयात सगळ्यांचं असंच होतं. वयात येताना , अँडोलसन्स अर्थात पौंगडावस्था या टप्प्यात तुमच्या शरीरात, शारीरिक आणि मानसिक असे अनेक बदल घडतात.  तुमच्या मानत आणि शरीरात जे काही बदल होतायेत ते अगदी नैसर्गिक आहेत आणि सामान्य  आहेत. आणि या वयात सगळ्यांमध्ये असे बदल होतात. पौगंडावस्था हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यात शरीरात आणि भावनांमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. हा अनुभव तुमच्यासाठी नवा असला तरी हे बदल मोठं होणाऱ्या प्रत्येकात होतात.

बदल  का घडून येतात? 

शरीरात आणि मनात बदल घडून येतात कारण तुमच्या शरीरातल्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो. वाढीच्या वयात शरीरातल्या हार्मोन्समध्ये झपाट्याने बदल होतात आणि तुमचं शरीर पूर्वीपेक्षा वेगळं दिसायला लागतं. सर्वसाधारणपणे पौगंडावस्था वयाच्या ८ ते १३ या वयदरम्यान कधीतरी सुरु होते. पण शरीरातले ठळक बदल साधारण वयाच्या दहाव्या नाहीतर अकराव्या वर्षी दिसायला लागतात. पौगंडावस्थेत तुमच्या शरीरातील अंडाशयाची म्हणजे ओव्हरीजची वाढ होते. शिवाय शरीरात दोन महत्वाची हार्मोन्स स्रवायला लागतात. एक अँस्ट्रोजेन  आणि दुसरं प्रोजेस्टेरॉन.

पौगंडावस्थेत शरीरात  कोणते बदल होतात?

- चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. - खूप घाम येतो. काखेत सतत घाम येतो.

- मासिक पाळी सुरु होते. - उंची वाढते. तुमची . -स्तनांचा आकार वाढतो. - काखेत, पायांवर, जांघेत केस येतात.

हार्मोन्सचा लैंगिक अवयवांवर होणारा परिणाम या हार्मोनल बदलांमुळे स्तनांचा आकार वाढतो. स्तनाग्रे किंवा निपल्स उठावदार होतात. याच हार्मोन्समुळे योनी मार्ग, गर्भाशय आणि अंड नलिका (फॅलोपिअन ट्यूब) विकसित होतात. त्याचप्रमाणे म्युकोसल स्रावात वाढ झाल्याने व्हजायनल डिस्चार्जलाही सुरुवात होते. त्यापाठोपाठ मासिक पाळी सुरु होते आणि याच हार्मोन्समुळे तुमच्या मासिक पाळीचं चक्र निश्चित होतं.

हार्मोनल बदलांमुळे शरीरात काय घडतं?

तुमच्या शरीरातही अनेक बदल झालेले तुमच्या लक्षात येतील. तुमची उंची वाढेल. हे हार्मोन्स तुमच्या शरीरात चरबी कुठे साचून राहील हे ठरवतात. कंबर, मांड्या, कुल्ले याठिकाणी  चरबी साठायला सुरुवात होते आणि हे अवयव उठावदार दिसायला लागतात. तुमची ताकद आणि वजनही वाढतं. सेबेशीयस ग्रंथीमधून तेल अधिक प्रमाणात स्रवायला लागतं. त्यामुळे चेहरा आणि त्वचा तेलकट होते. या ग्रंथीमुळेच चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ येते.  जास्तच घाम यायला लागतो. गुप्तांगाच्या आजूबाजूला केस यायला लागतात. सुरुवातीला हे केस लहान आणि मऊ असतात. पण कालांतरानं वयानुसार ते अधिक दाट होत जातात. फक्त गुप्तांगांवरच नाही तर काखेत, पायांवर, हातांवरही केस येतात. काहीवेळ पोटावरही केस येतात.पण या सर्व घडामोडी होत असल्या तरी हे सर्व सामान्य आहे.  

भावनिक बदल काय होतात? हार्मोनल बदलांमुळे तुमच्या मूड्समध्ये अचानक बदल व्हायला लागतात. मूड स्विंग्ज म्हणजे क्षणात आनंद आणि क्षणात राग, दुःख, उदासी असे भावनिक हेलकावे तुम्हाला अनुभवयाला मिळतात. त्याचप्रमाणे तुमच्या लैंगिक भावनेतही अनैच्छिक वाढ होते. हे सगळे बदल अत्यंत नैसर्गिक असतात हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. हार्मोनल बदलांमुळे ते होतात. त्यामुळे या सगळ्या बदलांची लाज वाटून घेऊन नका. आपल्यात काहीतरी भलतंच घडतंय असं वाटून घाबरून जाऊ नका किंवा स्वतःविषयी चुकीचा विचारही करू नका. गरज वाटलीच तर तुमच्या विश्वासातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोला. म्हणजे हे बदल नेमके कसे हाताळायचे याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल.

तज्ज्ञ सल्ल्यासाठी विशेष आभार: डॉ. सुप्रिया अरवारी

(एमडी डिजिओ)