Join us   

वयात येणाऱ्या मुलांना हमखास  छळतात या 5 मानसिक समस्या; आणि आईबाबा राहतात गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 5:56 PM

अनेक टीनएजर्स आजूबाजूचा परिसर, कुटुंबतील ताण तणाव, कुटुंबातील सदस्यांकडून अभ्यास आणि करिअरसाठी टाकला जाणारा अनावश्यक दबाव, लैंगिक शोषण यामुळे अस्वस्थ असतात. त्यांच्यात मानसिक आजार निर्माण होतात. त्याकडे वेळीच लक्ष दिलं, त्यांचे मानसिक प्रश्न ओळखून समजुतीनं सोडवले तर टीनएजर्स सावरतात आणि या वयातल्या मोकळेपणाचा , आनंदी क्षणांचा, हसण्या बागडण्याचा मुक्त अनुभव घेऊ शकतात.

ठळक मुद्दे टीनएजर्समधेही मानसिक आजार निर्माण होतात आणि ते जर वेळीच हाताळले गेले नाहीत तर त्या टीनएजर्सना आयुष्यभर या समस्यांचा सामना करावा लागतो.मानसिक समस्येचा टीनएजर्सच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर वाईट परिणाम होतो. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विकृती निर्माण होते.व्यसन ही देखील मानसिक विकृती असते. मानसिक समस्यांमुळे टीनएजर्स  वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडतात.छायाचित्रं- गुगल

मुला-मुलींच्या आयुष्यातला 13 ते 19 हा वयाचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. या टप्प्यात टीनएजर्सच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत खूप गतीने बदल होतात. काही बदल हे नैसर्गिक असतात तर काही बदल टीनएजर्सच्या सभोवतालाचं वातावरण, परिसर यामुळे घडतात. हे बदल मुलामुलींमधे अनेक मानसिक समस्या निर्माण करतात. पण मुलांच्या, टीनएजर्सच्या मानसिक समस्यांविषयी आजही फारसं बोललं जात नाही. ‘ त्यांना काय होतंय ?’ हाच मोठ्यांचा समज. पण अनेक टीनएर्जस आजूबाजूचा परिसर, कुटुंबतील ताण तणाव, कुटुंबातील सदस्यांकडून अभ्यास आणि करिअरसाठी टाकला जाणारा अनावश्यक दबाव, लैंगिक शोषण यामुळे अस्वस्थ असतात. त्यांच्यात मानसिक आजार निर्माण होतात. त्याकडे वेळीच लक्ष दिलं, त्यांचे मानसिक प्रश्न ओळखून समजुतीनं सोडवले तर टीनएजर्स सावरतात आणि या वयातल्या मोकळेपणाचा , आनंदी क्षणांचा, हसण्या बागडण्याचा मुक्त अनुभव घेऊ शकतात.

मोठ्या माणसांमधे काही वर्तन समस्या निर्माण झाल्या की त्वरित मानसविकार तज्ज्ञांना गाठलं जातं. त्यांच्याकडे गेल्यानंतर कळतं की मोठेपणी ज्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतोय त्याची पाळंमुळं 13 ते 19 या वयाच्या टप्प्यात आहेत. टीनएजर्समधेही मानसिक आजार निर्माण होतात आणि ते जर वेळीच हाताळले गेले नाहीत तर त्या टीनएजर्सना आयुष्यभर या समस्यांचा सामना करावा लागतो. अभ्यासकांच्या मते ही खूप चिंताजनक बाब आहे. एका अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो की भारतात 5 कोटी टीनएजर्स हे मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. हा अभ्यास सांगतो की परिस्थिती अशी आहे की हा आकडा पुढेहे वाढत जाणारा आहे. भारतातल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाचा एक अहवाल सांगतो की वयाच्या 13 ते 19 या टप्प्यात 7.3 टक्के मुलं कुठल्या न कुठल्या मानसिक समस्येचा सामना करत आहेत. मोठ्यांनी वेळीच टीनएजर्सच्या मानसिक समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ आणि अभ्यासक सांगतात. मुलांच्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी त्या समस्यांची जाण असणंही आवश्यक आहे.

छायाचित्र- गुगल

टीनएजर्समध्ये निर्माण होणार्‍या मानसिक समस्या

1. इटिंग डिसऑर्डर- मानसिक समस्येचा टीनएजर्सच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर वाईट परिणाम होतो. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विकृती निर्माण होते. काही टीनएर्जस मानसिक ताण असल्यास खूप खातात तर काही खाणंपिणंच सोडून देतात. मुलांच्या तुलनेत मुलींमधे ही समस्या निर्माण झालेली अभ्यासकांना आढळून आलं आहे. टीनएजर मुलींमधे बॉडी इमेजसंबंधीच्या धारणा त्यांच्यात ही समस्या निर्माण करतात. आपलं दिसणं, वजन याबाबतीत या वयातल्या मुली संवेदनशील असतात. या वयात दिसण्यासंबंधीच्या काही अवास्तव कल्पना मुलींच्या मनाचा आणि विचारांचा ताबा घेतात आणि त्यांच्यात इटिंग डिसऑर्डर निर्माण होते. या विकारामुळे टीनएजर्सच्या शरीर मनावर वाईट परिणाम होतात आणि इतर मोठ्या समस्यांचं ते कारण बनतं.

2. पर्सनॅलिटी डिसऑर्डर- मानसिक समस्यांमुळे टीनएजर्सच्या व्यक्तीमत्त्वातही खूप बदल दिसतात. खूप राग येणं, सतत भांडणं तंटा करणं, आक्रस्ताळेपणा करणं, मारामारी करणं यासारखे बदल दिसतात. हे बदल म्हणजेच मानसिक समस्यांमुळे निर्माण झालेली विकृती असते.

3. मूड डिसऑर्डर- ही विकृती खूप लहानपणापासून मुला मुलींना मानसिक ताणाचा सामना करावा लागलेला असेल तर पुढे टीनएजर्समधे सतत मूड बदलण्याची विकृती निर्माण होते. कधी ते खूपच उदास असतात, तर कधी हायपर अँक्टिव्ह असतात. मानसिक समस्यांमुळे टीनएजर्समधे ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. या वयात वागतात मुलं अशी म्हणत त्यांच्याकडे मोठे सहसा दुर्लक्ष करतात. अभ्यासकांच्या आणि डॉक्टरांच्या मते हीच मोठी चूक असते.

4. एंक्झायटी डिसऑर्डर- अनेक टीनएजर्समधे समाज जीवनात वावरताना भीती असते. त्यांना चारचौघात मिसळायला आवडत नाही, जमत नाही, त्यांना त्याची भीती वाटते. ही भीती पटकन लक्षात येत नाही.पण पुढे अभ्यास आणि करिअरच्या बाबतीत च्या मनातली ही भीती स्पष्टपणे जाणवायला लागते.

5. व्यसन- व्यसन ही देखील मानसिक विकृती असते. मानसिक समस्यांमुळे टीनएर्जस वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडतात. मानसिक समस्यांच्या दबावमुळे त्यांची विचार करण्याची, काही समजून घेण्याची क्षमता विकसित होत नाही आणि म्हणूनच या टप्प्यात मानसिक समस्यांनी गस्त टीनएजर्स  व्यसनांच्या आहारी जातात. मोठे याला संगतीचा परिणाम म्हणण्याची चूक करतात.

छायाचित्र- गुगल

टीनएजर्समधल्या मानसिक समस्या कशा ओळखाव्या?

* आपली मुलं खूप थकणं, थकलेली दिसणं. * कमी झोपणं किंवा अजिबातच झोप न लागणं. * भूक न लागणं किंवा प्रमाणापेक्षा जास्त आणि सतत खात रहाणं. * सतत उदास असणं. * अभ्यासात आणि कामात एकाग्रता नसणं. * सतत अपराधी वाटत असणं. * आत्महत्येचे विचार मनात येणं. * उदास किंवा सतत घाबरलेली असणं.  * यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसत असली तर ती मुलं/मुली मानसिक समस्यांनी ग्रस्त असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे हे ओळखावं.

छायाचित्र- गुगल

आई बाबा काय करु शकतात?

* मुळात मुलांमधे मानसिक समस्या निर्माण होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं. घरातलं वातावरण आनंदी ठेवणं, मुलां-मुलींना प्रत्येक टप्प्यावर समजून घेणं, मुलांना प्रेम आणि आपलेपणा देणं ही जबाबदारी आई बाबांची, मुलांच्या कुटुंबाची असते. यामुळे मुलांना आव्हानांना/ अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळते.

* मुलांवर अभ्यासाचं, परीक्षेचं, मार्कांचं दडपण टाकू नये. मुलांवर विश्वास ठेवला तर मुलं पुढे काही करु शकतात. अनावश्यक आणि अवास्तव पालकांनी टाकलेल्या दबावामुळे मुलं/मुली जे करु शकतात ते करण्यासही असमर्थ  ठरतात. अपयशी होतात. आणि त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो, आत्मविश्वास कमी होतो. मुलांच्या क्षमतांना समजून घेणं, त्याचा आदर ठेवणं या मार्गानं पालक मुलांना उत्तजेन देऊ शकतात असं तज्ज्ञ सांगतात.

*  मुलांना घरात सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. घरात जर तणाव असेल, भांडण तंटे असतील, असमजुतीचं वातावरण असेल तर मुलांना घर सुरक्षित वाटत नाही. मुलं दबल्यासारखी राहतात. घरातल्यांविषयी त्यांना विश्वास वाटत नाही. ती मोकळी होत नाही.

* मानसिक विकृतीसंबंधीचं कोणतंही लक्षण मुलांमधे दिसलं तर लगेच तज्ज्ञांशी / डॉक्टरांशी/ समुपदेशकांशी संपर्क साधणं. तसेच मुला मुलींन ‘तू नक्की बरा/बरी होशील’ असा विश्वास आई वडिलांकडून मिळणं आवश्यक आहे.