Join us   

Fact Check: मासिक पाळी सुरु झाल्यानंतर मुलींची उंची वाढणं थांबतं, हे खरं की खोटं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:14 PM

पाळी आल्यानंतर मुलींची उंची खुंटते असा समज बहुतांश पालकांमधे असतो. पण तो खरंच असतो का? यामागे शास्त्रीय/वैद्यकीय काही कारण आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं डॉक्टरांनी जे उत्तर दिलेलं आहे ते मुलींची लवकर पाळी, उंची विषयीचे गैरसमज आणि उंची खुंटू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबाबतच्या शंका निरसन करतं.

ठळक मुद्दे अभ्यास सांगतो की, पाळी सुरु झालेल्या मुलींच्या आहारात जर जंक फूडचं प्रमाण जास्त असेल तर वजन वाढतं आणि वजन वाढल्यानेही इस्ट्रोजन या हार्मोनचं प्रमाण वाढतं. मुलींना पाळी सुरु झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षापर्यंत इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी उंचीवर परिणाम करेल इतकी वाढत नाही.मुलींची उंची वाढेल असा व्यायम, आहारातून पोषण याकडे लक्ष द्यायला हवं.

कमी वयात पाळी येण्याचं प्रमाण वाढलंय. ही बाब पालक आणि मुली यांच्यासाठी तणाव वाढवणारी ठरत आहे. मुलींमधे पाळी आल्यानंतर होणारे मानसिक बदल यामुळे निर्माण होणारा तणाव हा नैसर्गिक आहे. पण पालक विशेषत: आईचा ताण वाढण्याचं कारण म्हणजे आता पाळी आली आता मुलीची उंची वाढणार नाही. पाळी आल्यानंतर मुलींची उंची खुंटते असा समज बहुतांश पालकांमधे असतो. पण तो खरंच असतो का? यामागे शास्त्रीय/वैद्यकीय काही कारण आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं डॉक्टरांनी जे उत्तर दिलेलं आहे ते मुलींची लवकर पाळी, उंची विषयीचे गैरसमज आणि उंची खुंटू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबाबतच्या शंका निरसन करतं.

छायाचित्र:- गुगल  

लवकर पाळी आणि उंची याबाबत डॉक्टर काय म्हणतात?

मुलींना जेव्हा पहिल्यांदा पाळी येते त्याला वैद्यकीय भाषेत ‘मेनार्क’ म्हटलं जातं. ‘एनसीबीआई’चा एक अभ्यास सांगतो की मुलींना 13 किंवा त्याही एक ते सव्वा वर्ष आधी पाळी येण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पण पाळी आणि उंची याबाबत डॉक्टरांची वेगवेगळी मतं आहेत. डॉक्टर म्हणतात पाळी सुरु झाली की उंची वाढत नाही यात थोडं सत्य आहे पण ही बाब पूर्ण सत्य नाही. पाळी आल्यानंतर उंची वाढतच नाही ही बाब डॉक्टरांच्या मते पूर्ण चूक आहे. याला वेगवेगळे वैद्यकीय पैलू आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे.

छायाचित्र:- गुगल  

आग्रा येथील ‘सरोजनी नायडू मेडिकल कॉलेज’मधील प्रोफेसर डॉ.निधी म्हणतात की पाळी सुरु झाल्यानंतर उंचीबाबत शरीरशास्त्र जो तर्क लावते तो बरोबर आहे. या तर्क सांगतो की याला कारणीभूत मुलींच्या शरीरात तयार होणारं इस्ट्रोजेन हे हार्मोन आहे. आपल्या शरीरात लांब हाडांची जी टोकं असतात त्यांना कार्टिलेज म्हणतात . हे कार्टिलेज म्हणजे एक प्रकारच्या मऊ पेशी असतात. त्या खुंटलेल्या नसतात. पण इॅस्ट्रोजेनमुळे या मऊ पेशी खुंटतात. म्हणून पाळी आल्यानंतर उंचीवर परिणाम होतो तो असा. डॉ. निधी म्हणतात की शरीरशास्त्रानुसार इस्ट्रोजेनचा हा परिणाम आपण नाकारु शकत नाही. इस्ट्रोजेनमुळे उंचीवर थोडा परिणाम होऊन ती कमी वाढू शकते. पण हे लक्षत घेणंही आवश्यक आहे की मुलींच्या शरीरात पाळी सुरु झाल्यावर लगेच इॅस्ट्रोजेनची पातळी इतकी वाढत नाही की मुलींची उंची एकदमच खुंटेल. एक आहे की पाळी सुरु झाली की पालकांनी मुलींच्या उंचीबाबत थोडं जास्त जागरुक राहायला हवं. पण यात पालकांनी मुलींच्या उंचीबाबत खूप चिंता करण्याची किंवा घाबरुन जाण्याची गरज नाही. दिल्लीमधील ‘ लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज’च्या प्रोफेसर डॉ. मंजू पुरी म्हणतात की पाळी सुरु झाली की मुलींची उंची अजिबातच वाढणार नाही असं नाही. मुला-मुलींची उंची पालकांच्या उंचीवरही अवलंबून असते. हल्ली बदलेली जीवनशैली, चुकीची आहार पध्दती यामुळे मुलींना कमी वयात पाळी सुरु होण्याचं प्रमाण वाढलंय. म्हणूनच मुलींची पाळी सुरु झाल्यानंतर एकूणच वाढीच्याबाबत जास्त सजग राहाणं गरजेचं आहे. ही सजगता पाळी सुरु झाल्यानंतर मुलींच्या वाढीवर नकारात्म परिणाम होण्यापासून वाचवते.

छायाचित्र:- गुगल  

पाळी सुरु झालेल्या मुलींची काळजी घेताना.

* सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाळी सुरु झाली की मुलींच्या आहाराकडे जास्त जागरुकतेनं पाहायला हवं. मुलींच्या शरीरात आहाराच्या माध्यमातून प्रथिनं आणि कॅल्शियम योग्य प्रमाणात जायाला जावं. याकाळात एकूणच वाढीसाठी जीवनसत्त्वं, प्रथिनं,कर्बोदकं , खनिजं, झिंक, मॅग्नेशियम हे घटक खूप महत्त्वाचे असतात. तसेच मुलींकडून नियमित व्यायाम करुन घेणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंग, पोहोणं हे व्यायाम वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. फिट राहाणं किती गरजेचं आहे याबाबत मुलींना समजावून सांगणं, पटवून देणं, त्यासाठी आपण मार्गदर्शन करणं किंवा तसं मार्गदर्शन मुलींना उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. वयात येणार्‍या मुलींनाच नाही तर मुलांनाही जंक फूड खूप आवडतं. पण या पदार्थांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: याबाबत झालेला अभ्यास सांगतो की, पाळी सुरु झालेल्या मुलींच्या आहारात जर जंक फूडचं प्रमाण जास्त असेल तर वजन वाढतं आणि वजन वाढल्यानेही इस्ट्रोजन या हार्मोनचं प्रमाण वाढतं.

* डॉ. मंजू पुरी म्हणतात की, अनेक अभ्यासाचे अहवाल सांगतात की मुलींना पाळी सुरु झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षापर्यंत इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी उंचीवर परिणाम करेल इतकी वाढत नाही. त्यामुळे प्रयत्न असाच हवा की पाळी सुरु झाली की आरोग्याबाबत अधिक सतर्क राहायला हवं. मुलींची उंची वाढेल असा व्यायम, आहारातून पोषण याकडे लक्ष द्यायला हवं.

* मुलींच्या शरीराची सर्वांगिण वाढ होण्यासाठी संपूर्ण शरीरात आतून ओलावा असणं म्हणजेच शरीरात पाण्याचं पातळी योग्य राखणं खूप महत्त्वाचं असतं. मुलींना पाळी आली की घरातले मोठे वेगवेगळ्या सूचना देतात, नियम बंधनं जास्त घालतात. यामुळे मुलींना ताण येतो. त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होतो. त्यामुळे या टप्प्यातील मुलींना ताण येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. उंचीबाबत आणि हाडांच्या आरोग्याबाबत ड जीवनसत्त्व खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुलींच्या शरीरातील ड जीवंसत्त्वाच्या पातळीकडे लक्ष देणं, ती कमी असेल तर त्यासाठीच औषधोपचार करणं आवश्यक आहे.

* इस्ट्रोजन या हार्मोनचा परिणाम म्हणून मुलींची उंची वाढत नाही म्हणून चिंतीत पालक कोणाच्या तरी सांगण्यातून इस्ट्रोजन पातळी कमी होण्याची औषधं मुलींना देतात. या अशा उपचारांमुळे मुलींच्या शरीरातील हार्मोनच्या संतुलनात बिघाड होतो त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पाळी येणं म्हणजे मुलींची उंची खुंटणं हा गैरसमज आणि भीती आधी डोक्यातून काढून टाकूण मुलींच्या आहार विहार व्यायामाकडे विशेष लक्ष देणं हेच योग्य असं डॉक्टर सांगतात.