Join us   

लैंगिक छळ-छेडछाड झाली तर बोला, हे मुलांना कसं सांगाल? कसं बोलाल त्यांच्याशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 7:57 PM

लैंगिक छळापासून वाचण्यासाठी शारीरिक सुरक्षा याबद्दल मुलांशी  मोकळेपणानं पालकांना बोलता येत नाहीत. त्यांना संकोच वाटतो. पण हाच संकोच मुलांना धोकादायक परिस्थितीत नेऊन ठेऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे.

ठळक मुद्दे मुलांना अगदी लहान वयात स्वतःच्या शरीराची सुरक्षा शिकवणं आवश्यक आहे. लहान आणि पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये लैंगिक छळाच्या केसेस वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे याविषयी जवळच्या व्यक्तीशी न बोलता येणं.अजूनही शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलणं कितीही नकोसं वाटलं तरीही कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे.

शारीरिक सुरक्षा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून स्वतःचा लैंगिक छळापासून किंवा छेडछाडीपासून बचाव करणं आहे. किंवा इतरांनी आपल्या शरीराला अयोग्य पद्धतीनं हाताळण्यापासून स्वतःला वाचवणं. लहान मुलांना त्यांच्या खासगी अवयवांचं महत्वं शिकवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांना जर कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला किंवा त्यांच्या शरीराची हाताळणी हिंसक पद्धतीन केली तर ताबडतोब त्याबद्दल बोलण्यासाठीही त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे.

पण अनेकदा हे विषयी मोकळेपणाने पालकांना बोलता येत नाहीत. त्यांना संकोच वाटतो. पण हाच संकोच मुलांना धोकादायक परिस्थितीत नेऊन ठेऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. भविष्यतले धोके टाळायचे असतील तर त्यांना वेळीच काही गोष्टीची कल्पना देणं आणि त्यांच्याशी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे.

 

संकोच कसला ?  उपाय काय?  

माझं मूल अजून खूप लहान आहे. प्रत्येकालाच आपलं मूल अजून लहान आहे असं सतत वाटत असतं. पण त्याचे गोड गोड बोबडे बोल बोलता बोलता बाळ कधी मोठं होतं आपल्याही लक्षात येत नाही. मुलांना अगदी लहान वयात स्वतःच्या शरीराची सुरक्षा शिकवणं आवश्यक आहे. ज्या प्रमाणे आपण मुलांना त्यांचे डोळे, कान किंवा इतर अवयव ओळखायला शिकवतो त्याचप्रमाणे खासगी अवयवांची ओळख आणि सुरक्षाही शिकवली पाहिजे. त्यांना बाकी अवयव आणि खासगी अवयव यातला फरक समजावून सांगितला पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या खासगी अवयव झाकण्यापासून त्यांच्याशी जर कुणी चुकीचं वर्तन केलं तर ते लगेच त्याविषयी तुम्हाला येऊन सांगू शकतील.

माझं मूल याविषयी मोकळेपणाने बोलतच नाही. लहान आणि पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये लैंगिक छळाच्या केसेस वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे याविषयी जवळच्या व्यक्तीशी न बोलता येणं. घरी शाळेत बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी न मिळणं, किंवा तसं वातावरण न मिळणं. काहीवेळा मुलांना मोकळेपणानं सांगता येत नाही आणि पालकांनाही मुलांना नेमकं काय होतंय हे समजत नाही. अशावेळी गोष्टी अजूनच किचकट बनण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या मुलांशी मैत्रीच्या नात्यातून संवाद हा झालाच पाहिजे. आपण कुठल्याही विषयावर आईबाबांशी बोलू शकतो असा आत्मविश्वास मुलांना मिळाला पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना, शंकांना उत्तरं देताना प्रामाणिकपणे द्या. काहीही लपवून ठेऊ नका. त्यांना त्यांची सिक्रेट्स शेअर करायला सांगा. मुलांना विश्वास टाका, तो दिसू द्या, म्हणजे मूलही तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि मैत्रीचं नातं तयार होईल. तुम्ही मुलांचे शिक्षक, गुरु, मित्र आहात हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या चुकांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्याशी बोला. त्यांना बोलतं करा. त्यांच्याशी मोकळेपणानं निरनिराळ्या विषयांवर चर्चा करा.

माझं मूल खूप बुजरं आहे, फार साधं आहे. अजूनही शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलणं कितीही नकोसं वाटलं तरीही कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे. शारीरिक छळाचे मुद्दे काहीवेळा अगदी छोटे असतात. जसं की खूप जोरात मुलांना दुखेल असे गाल ओढणं, त्यांच्या लैंगिक अवयवांबद्दल बोलणं. मुलांशी या विषयावर बोललं गेलं तर ते स्वतःसाठी उभे राहू शकतील, विरोध करू शकतील. त्याचप्रमाणे या गोष्टी बोलल्यामुळे मुलांच्या वाढीच्या वयात जे प्रश्न तयार होतात त्यांचीही उत्तर त्यांना मिळतात आणि कुणालाही त्याच्या लिंगावरून, दिसण्यावरून कमी लेखू नये हा संस्कारही आपोआप मुलांवर होतो.

विशेष आभार: डॉ. पारुल टंक,

मनोविकारतज्ज्ञ आणि थेरपिस्ट