Join us   

वयात येताना पीसीओडीचा त्रास होतोय? त्यावर तातडीने उपाय नाही केला तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 6:58 PM

कुणाला हा आजार होऊ शकतो,  त्यांना वेळीच हेरुन आजार होऊ नये म्हणून काय करता येईल याचा विचार करणं त्या दृष्टिनं पावलं उचलणं आणि आजार समूळ नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची सर्वात जास्त गरज असते.

ठळक मुद्दे अंडाशयाचं काम आणि अँड्रोजिन हार्मोन्स त्यांच्यावरुन पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरचं निदान करता येतं.जितक्या लवकर उपचार सुरु होतील तितकी पुढची गुंतागुंत टाळता येऊ शकते.पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरमध्ये चयापचय, शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक बदल होतात. 

ज्या स्त्रिया/ मुली अंतर्गत स्त्रावाच्या समस्येनं त्रस्त असतात त्यांच्यात पॉलिसिस्टिक ओव्हरीन  डिसऑर्डर अनेकदा दिसून येतो. अर्थात मोठ्यामध्ये दिसणारा आजार आणि टिनेजर्समधील समस्या यात बराच फरक असतो. आजराच्या निदानापासून ते उपचारांपर्यंत पौगंडावस्थेतील पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरची हाताळणी पूर्णपणे निराळी असायला हवी.

टिनेजमध्ये गेल्यानंतर आपलं शरीर प्रजननासाठी तयार व्हायला लागतं. या वयात जर पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डर झाला तर ताबडतोब निदान आणि उपचारांची गरज असते. कुणाला हा आजार होऊ शकतो,  त्यांना वेळीच हेरुन आजार होऊ नये म्हणून काय करता येईल याचा विचार करणं त्या दृष्टिनं पावलं उचलणं आणि आजार समूळ नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची सर्वात जास्त गरज असते.

निदान कसे? मोठ्यांप्रमाणे पॉलि सिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डर झालेल्या टिनेजर्सना थेट शोधता येऊ शकत नाही. अंडाशयाचं काम  आणि अँड्रोजिन हार्मोन्स त्यांच्यावरुन पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरचं निदान करता येतं.

लक्षणं कोणती? १) मासिक पाळी सुरु झाल्यापासून ९० दिवसांपर्यंत नियमित पाळी न येणं २) मासिक पाळी एकतर २१ दिवसांच्या आधी येणं किंवा ४५ दिवसांपेक्षा जास्त लांबण आणि हे सतत दोन वर्ष सुरु असणं. ३) वयाच्या १५ व्या वर्षांनंतरही पाळी न येणं किंवा स्तनांचा आकार वाढल्यानंतरही दोन वर्ष पाळी न येणं ४) अँड्रोजेन हार्मोन्स वाढल्यानेही काही शारीरिक बदल दिसतात. जसे की, उपचारांनंतरही वेदना सुरु रहाणे ५) शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे केस प्रमाणाबाहेर वाढणे ६) टेस्टोस्टेरॉनचे रक्तातील प्रमाण वाढत राहणे यापैकी कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर ताबडतोब तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञाला दाखवा. आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरवर उपचार घ्या. जितक्या लवकर उपचार सुरु होतील तितकी पुढची गुंतागुंत टाळता येऊ शकते.

उपचार काय? १) सगळ्यात पहिला उपचार म्हणजे जीवनशैलीत मूलभूत बदल करणे. २) खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हार्मोनल असमतोल निर्माण  होतो. त्यामुळे आपण समतोल आहार घेतोय ना याकडे बारीक लक्ष हवं. ३) वजन अतिरिक्त वाढलेलं नाहीये ना याकडे लक्ष हवं. नियमित व्यायाम, सुयोग्य आहार, जंक फूड वरचेवर न खाणं, पुरेशी झोप घेणं या गोष्टी केल्या तर शरीरातला हार्मोनल असमतोल कमी होवू शकतो. ४) काहीवेळा मासिक पाळीचं नियमन करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी तोंडावाटे घ्यायच्या गर्भरोधक गोळ्या दिले जातात. पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरमध्ये चयापचय, शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक बदल होतात. ज्याचे व्यक्तीवर परिणाम होतातच.

जसजसं वय वाढतं लक्षणांमध्ये बदल होत जातात. जीवनशैलीतले बदल आणि लठ्ठपणा कमी झाला की हार्मोनल समतोल साधला जातो. आणि लक्षणं हळूहळू नाहीशी होत जातात. किंवा कमी होतात. या सगळ्या बदलांच्या काळात काहीवेळा मनावर ताण येऊ शकतो, नैराश्य, उदासिनता वाटू शकते अशावेळी समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे. पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसऑर्डरचं लहान वयात निदान झालं आणि त्वरित उपचार सुरु झाले तर या आजाराची गुंतागुंत वेळीच रोखता येते. विशेष आभार: डॉ. प्रज्ञा चांगेडे M.B.B.S, M.S. (Obstetrics And Gynecology), C.P.S, D.G.O, F.C.P.S, F.I.C.O.G, I.B.C.L.C.