Join us  

फुल और कांटे! आठवा, कधी तुम्ही शेवटचा मातीत हात घातला, किती झाडं ओळखता येतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 6:39 PM

बागकाम हेच जीम असं कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल, पण फिटनेस आणि क्रिएटिव्हिटीचं हे एक खास नवं रुप म्हणून स्वीकारता येईल!

ठळक मुद्देकेवळ तोंड देखलं निसर्ग प्रेम व्यक्त करण्यापेक्षा मातीत हात घालू या. आपापली बाग फुलवायला शिकू या. आपला हिरवा कोपरा आपणच घडवू या...

प्राची पाठक

लहानपणी आपल्याला झाडांवरची फुलं तोडून शिक्षकांना द्यायची हौस असते. नंतर हीच फुलं वेगवेगळ्या प्रकारच्या बुकेमध्ये बघून आपल्या व्हॅलेंटाइनला द्यायला आपल्याला फार भारी वाटत असतं. आपल्याला छान वाटणारी ही फुलं आपण स्वतः जरा मातीत हात घालून आपल्यापुरती का होईना लावावीत, असं आपल्याला वाटतं का? आपल्या बाल्कनीतून दिसणारी किती झाडं आपल्याला ओळखता येतात? किती फुलांची माहिती आपल्याला असते? त्यांच्यावर येणारे किती पक्षी, किती कीटक आपण ओळखू शकतो? आपण खातो त्या किती भाज्या, किती फळं आपण स्वतः लावून पाहिलेली असतात?सोसायटीत, अंगणात वृक्ष प्रेमाच्या नावाखाली कुठेही आणि कशीही झाडं लावून ठेवणं, जागा अडवणं, अंधारे, कोंदट आडोसे तयार करणं म्हणजे वृक्ष प्रेम का? अगदी रस्त्यावर सुद्धा आपली घराची, सोसायटीची हद्द मार्क करायची म्हणून इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने झाडं लावणं म्हणजे वृक्ष प्रेम का? अशी झाडं छाटावी लागली, तर हे कसे पर्यावरणद्वेषी असं असतं का? आपण झाडाफुलांविषयी, आजूबाजूच्या निसर्गाविषयी जरा सजग झालो, तर झाडं छाटणं म्हणजे झाडं तोडणं नव्हे, हे आपल्याला कळेल. कुठे, कशी, कोणती झाडं लावावीत, हे आपल्या लक्षात येईल. त्यातली देशी झाडं कोणती, विदेशी कोणती, त्यांचं निसर्गातलं स्थान काय, ते आपल्याला कळेल. स्थानिक झाडांची मजा समजून घेता येईल. 

पण हे सगळं केव्हा होईल?

जेव्हा तुम्ही स्वतः मातीत उतराल. एक व्यायाम प्रकार म्हणून सुद्धा आपण बागकामाकडे बघू शकतो. या व्यायामातून केवळ कॅलरीज जळणार नाहीत, तर काही तरी सुंदर घडवता देखील येईल. निसर्गाची गोडी लागेल. आज बी लावलं आणि उद्या फळ मिळालं, असं झट की पट निसर्गात काहीच घडत नसतं. यातून आपण संयम शिकू शकू. निसर्गातील अन्नसाखळी परिक्षेपुरती पाठ करायची गरज उरणार नाही. आजूबाजूच्या परिसराविषयी आपण अधिक सजग होऊ.

काय करता येईल?

१. आपल्याकडे थोडं फार अंगण असेल, तर उत्तमच. आपण अधिक चांगल्या प्रकारे तिथे बागकामाचा छंद जोपासू शकतो. २. बाग फुलवायला नर्सरीत जाऊन भसाभस रोपं विकत आणायची गरज नसते, ते आपल्याला कळेल. नर्सरीतून रोपं आणून, त्यावर रासायनिक फवारणी करून बाग तयार करण्याचं काम कोणीही करू शकतं. त्यात फार काही विशेष स्किल नाही. तशी बाग किती काळ तगेल, याची खात्री नाही. ३. आपल्याला नेमकी कोणती झाडं का हवी आहेत, आपली जागा किती आहे ह्याचा आधी विचार करायचा. तिथे केवळ झाडांचं गचपन करून ठेवण्यापेक्षा, कमी जागेत एकात एक खूप झाडं वेडीवाकडी लावून ठेवण्यापेक्षा आपण त्या झाडांची प्रकृती समजून घेऊन त्यानुसार बागकाम करायला शिकू. ४. झाडं लावतांना तिथेही ठरावीक अंतर पाळून मगच ती लावावीत, हे आपल्याला कळेल. सर्वच मोकळ्या जागेत वाटेल तशी झाडं लावून ठेवायची नसतात. जागा मोकळी सोडणं देखील तितकंच महत्वाचं असतं बागकामात. कारण, पावसाळ्यात झाडं वेडीवाकडी वाढतात. अनेक जीव त्याच्या आजूबाजूला येतात. आडोश्यात लपणारे काही जीव घातक असू शकतात. आपल्या सर्व परिसरात मोकळा सूर्यप्रकाश पोहोचणं तितकंच आवश्यक आहे, हे आपल्याला कळेल. 

५. झाडांच्या अंधाऱ्या गचपनापेक्षा मोकळीढाकळी, हवेशीर, प्रकाशमान बाग फुलवणे एक वेगळीच कला आहे. असलेलं अंगण किंवा बाल्कनी झाडांनी पूर्ण भरून ठेवणं, झाकोळून टाकणं ह्यात काही मजा नाही.६. आपल्याला ज्या भाज्या आवडतात, जी फळं आवडतात, त्यांची बाजारपेठ कोणती? कुठून येतात ती झाडं -फुलं- फळं? हे आपण शोधू शकतो. कितीतरी ऑनलाइन सपोर्ट ग्रुप्स असतात, ते जॉईन करू शकतो. ही फळं, भाज्या, फुलं आपल्याला आपल्या उपलब्ध जागेत कशी आणि कुठे लावता येतील, ह्यांची माहिती घेऊ शकतो. ७. उरला प्रश्न ही झाडं कशात लावायची? त्यांची माती कुठून आणायची? सुरवातीला लगेच उठून बाजारात जाऊन डझनभर कुंड्या विकत आणायची काहीच गरज नाही. आपल्या घरातले जुने, गळके माठ, जुन्या बादल्या, तेलाचे, श्रीखंडाचे, आईस्क्रीमचे लहान मोठे डबे आपण कुंडीसारखे वापरला शिकू शकतो. त्यासाठी हे नाही, ते नाही करत अडून बसावं लागत नाही. मग आपल्या अंगणातच असलेली जशी असेल तशी माती आपण वापरून बघू शकतो. त्यातून मातीचा पोत आपल्याला कळू लागेल. कुंडी कशी भरायची ते आपण शिकू. आपल्या परिसरात, रस्त्याच्या कडेला वगैरे असलेली मातीच बादलीभर उचलून आणून आपण बागकामाला सुरुवात करू शकतो. लगेच लाल माती विकत घ्यायला जायची गरज नसते.८. आपण खातो, त्या भाज्यांमधूनच काही बी मिळतं का, ते आपण बघू शकतो. कारले, गिलके, टोमॅटो, वांगी, भेंडी, शेवगा, वगैरे ह्यांची रोपं घरीच बनवायला शिकू शकतो. काय पेरलं तर कोथिंबीर येते, हे समजून घेऊ शकतो. स्वयंपाक घरात लागणाऱ्या काही गोष्टी जसं की कढीपत्ता, लिंब, गवती चहा, अडुळसा, पुदिना, तुळस हे आपण लावून बघू शकतो. ही कोणतीही रोपं विकत न आणता आपल्या परिसरात कोणाकडे रोपं असतील, तर ती मागून घेता येतील. पुदिन्याची एखादी काडी सुद्धा सहज लागून जाते. कढीपत्त्याच्या झाडाखाली इतर भरपूर लहान रोपं असतात जी सतत कमी करावी लागतात. त्यातून एखादं रोप आपल्याला सहज मिळून जाईल. काही झाडांच्या केवळ काड्या सुद्धा लागून जातात. ती आपल्याला आणता येतील. ९. झाडं आणि झुडपं ह्यातला फरक कळू लागेल. घराजवळ, दाटीवाटीच्या ठिकाणी मोठाली झाडं लावून घराला नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा तिथे नीट आकार देता येणारी, आटोक्यात राहणारी लहान झुडुपं लावणं योग्य, हे कळू लागेल.१०. एखाद्या श्रमातून पुढे किती सुंदर फळं मिळू शकतात, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बागकाम. ते करून बघितल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही. केवळ तोंड देखलं निसर्ग प्रेम व्यक्त करण्यापेक्षा मातीत हात घालू या. आपापली बाग फुलवायला शिकू या. आपला हिरवा कोपरा आपणच घडवू या...

(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्रासह मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :बागकाम टिप्स