Join us  

उन्हाळ्यात कुंडीतल्या झाडांना नेमकं कधी आणि किती पाणी घालायचं? उन्हानं झाडं सुकू नये म्हणून ६ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 6:21 PM

आपण जीवापाड जी झाडं जपतो ती उन्हामुळे सुकली तर वाईट वाटतेच, म्हणून हे खास उपाय

ठळक मुद्देईपने पाणी दिल्यास ते मातीत हळुवार मुरण्याऐवजी वेगाने कुंडीच्या तळाशी जाते आणि अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो.

उन्हाळ्यात एक महत्वाची काळजी म्हणजे गॅलरीतल्या छोट्या बागेतलं काय होणार? उन्हाने रोपं सुकतात. पाणी कधी घालावं किती घालावं कळत नाही, हिरवं नेट लावावं तर त्यांनं झाडांना काही त्रास होईल का हे लक्षात येत नाही. प्रश्न अनेक, पण काही गोष्टी समजून घेतल्या तर उन्हाळ्यात आपली बाग सुकणार नाही.सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊन आहे म्हणून जास्ती पाणी घालू नका. जास्त पाणीपण वनस्पतींना हानीकारक ठरते आणि  पाणी कमी पडले तर वनस्पतींची वाढ खुंटते. 

करायचं काय?१. झाडांची पाण्याची गरज प्रत्येक ऋतू प्रमाणे बदलत असते. प्रत्येक ऋतूत कुंड्यांमधील वनस्पतींना योग्य प्रमाणात पाणी देण्याबरोबरच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी इतर उपाय योजनाही कराव्या लागतात. २. सोपा नियम एकच साधारणतः कुंड्यांमधील मातीच्या आकारमानाच्या २५% पाणी कुंडीत कायम असावे. कुंड्यांना पाणी देताना खूप पाणी देऊ नये. त्यासाठी पाणी घातल्यावर कुंडीच्या तळातून अगदी थोडेसे पाणी बाहेर येईल एवढेच पाणी घालावे.

३. ऑक्टोबर हिट तसेच एप्रिल मेच्या उन्हाळ्यापासून पासून आपल्या संरक्षणाची आपण सर्वच जण काळजी घेतो. कुंड्या प्लास्टीकच्या असतील तर, त्यांना दुपारचे प्रत्यक्ष उन लागणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाने प्लास्टीक वातावरणातील तपमानापेक्षा जास्त गरम होते. परिणामी कुंडीतल मातीच्या ओलाव्याचे वेगाने बाष्पीभवन आणि कुंडीतील माती व कुंडीची कड यात छोटीशी भेग निर्माण होते. वनस्पतीच्या नवजात पांढरी केशामुळे कुंडीच्या याच कडांमध्ये वेगाने वाढत असतात. आणि मातीतील ओलाव्याचे होणारे बाष्पीभवन त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम करतात. वनस्पती मलूल दिसू लागतात.

(Image : google)

४. तुटलेल्या फारश्या, जुन्या साड्या, हिरवे शेड नेट याचा कल्पक वापर उपयोगी ठरतो. गच्चीवर येणाऱ्या उन्हाच्या दिशेचा अभ्यास करून कुंड्याची रचना बदलल्यास हा प्रश्न सुटू शकतो.५. कुंडीतील मातीच्या वरील भागात किमान एक दीड इंचाचे पूर्णपणे वळलेल्या पालापाचोळ्याचे आवरण (मल्चिंग) कुंडीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी करते.६. कुंड्यांना पाणी देताना पाईप ऐवजी हाताने पाणी घालणे कधीही चांगले. पाईपने पाणी दिल्यास ते मातीत हळुवार मुरण्याऐवजी वेगाने कुंडीच्या तळाशी जाते आणि अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो. 

टॅग्स :बागकाम टिप्ससमर स्पेशल