Join us  

Gardening Tips : घरात कुंडीतच लावा 3 बहुगुणी औषधी वनस्पती; उत्तम घरगुती औषध, डॉक्टरकडे जाण्यापूर्वीचा प्रथमोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2022 1:23 PM

Gardening Tips : डॉक्टरांकडे जाण्याआधी घरच्या घरीच काही आजारांवर आपल्याला उपचार करता येतात, पाहूया या वनस्पती कोणत्या...

ठळक मुद्देपावसाळा सुरू झाला की घरोघरी सर्दी-खोकला, ताप या तक्रारीच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे आतापासूनच तयारी केल्यास आजारपण घरगुती उपचारांनी बरे होईल आणि खूप गोळ्या-औषधे खाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. 

पूर्वी घराच्या आजूबाजूला, परसबागेत किंवा अंगणात अनेक वनस्पती बहरलेल्या असायच्या; पण हळूहळू फ्लॅट संस्कृती आल्याने आता शहरात आजूबाजूला जागाच राहिली नाही. त्यामुळे आता कुंड्यांमध्ये रोपे लावावी लागतात (Gardening Tips). पण कुंडीतही आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी रोपे नक्की लावू शकतो. घरात काही औषधी वनस्पती असतील तर डॉक्टरांकडे जाण्याआधी घरच्या घरीच काही आजारांवर आपल्याला उपचार करता येतात. आता आपल्या देशात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि तब्येतीच्या तक्रारींवर उपयुक्त असणाऱ्या कोणत्या तीन वनस्पती आपण घरात लावू शकतो याविषयी...

(Image : Google)

तुळस

तुळशीची पानं ही सर्दी, खोकल्यावर गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो. याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणाऱ्या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, मूळव्याध इत्यादींकरिता घेतात. या बिया दूध किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. उष्णतेचा जास्त त्रास असेल तर २० ते ३० बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एकावेळी घ्याव्यात, असे दिवसातून तीन-चार वेळा करावं. यामुळे उष्णतेपासून आराम मिळण्यास मदत होते.   

(Image : Google)

कोरफड

कोरफड ही काटेरी वनस्पती असली तरी त्याचा गर अतिशय उपयुक्त असतो. आयुर्वेदातही कोरफडीचे बरेच महत्त्व सांगितले आहे. जखमेवर लावण्यासाठी कोरफडीचा उपयोग होतो. जखम धुऊन त्यावर कोरफडीच्या गराची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे. कोरफडीचा गर त्वचेच्या, केसांच्या तक्रारीसाठीही अतिशय उपयुक्त असतो. कोरफड एकदा लावली की त्याकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही, ती सहज वाढत असल्याने आपण कुंडीत नक्की लावू शकतो. 

(Image : Google)

अडुळसा

खोकला बरा होण्यासाठी अडुळसा वापरतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. ५०-६० अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास २० मिली काढा दिवसातून २ ते ३ वेळा या प्रमाणात ३ दिवस द्यावा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा काढा उपयुक्त ठरतो. पावसाळा सुरू झाला की घरोघरी सर्दी-खोकला, ताप या तक्रारीच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे आतापासूनच तयारी केल्यास आजारपण घरगुती उपचारांनी बरे होईल आणि खूप गोळ्या-औषधे खाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सघरगुती उपाय