Join us  

गुलाबाच्या झाडावर किड पडली, फुलं फार कमी येतात? हे उपाय करा, गुलाबाचे झाड छान बहरेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 6:03 PM

बागेतला गुलाब सुकला असेल किंवा त्याला फुलंच येत नसतील, तर काही गोष्टी चुकत आहेत. त्या कोणत्या, हे जाणून घ्या.

ठळक मुद्देनुसती काळी मातीही गुलाबाचे रोप लावण्यासाठी कधीच वापरू नये.

गुलाबाची छान टपोरी, टवटवीत फुलं आपल्या बागेत बघितली तरी मन फ्रेश होऊन जातं. केशरी, गुलाबी, अबोली, पांढरा, पिवळा असे अनेक रंगाचे गुलाब मन मोहून घेतात. गावरान गुलाबांना तर देखणं रूप असतंच, पण सोबतच त्यांचा सुवासही अत्यंत आल्हाददायी असतो. जर काही गोष्टींची थोडीफार काळजी घेतली, तर गुलाबाची रोपं बागेत वाढवणं तसं काही फार अवघड काम नाही. कधी- कधी काहीतरी आपल्याकडून नकळतपणे होऊन जातात आणि मग बागेतले गुलाब सुकून जातात. म्हणूनच गुलाबाच्या झाडांची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.

 

१. गुलाबाच्या रोपाची माती तपासाकोणतेही झाड आणि विशेषत: गुलाबाचे झाड तेव्हाच चांगले टिकते, जेव्हा त्याची माती चांगली असते. म्हणूनच गुलाबाच्या कुंडीत असणाऱ्या मातीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गुलाबाचे झाड लावण्यासाठी कडक माती कधीच वापरू नका. भुसभुशीत माती निवडा. नुसती काळी मातीही गुलाबाचे रोप लावण्यासाठी कधीच वापरू नये. या मातीत थोडे कोकोपीट आणि अगदी थोडी वाळूदेखील टाकावी. गुलाबाचे रोप लावल्यानंतर सुरूवातीचे दोन- तीन दिवस ते कधीच कडक उन्हात ठेवू नका. जर तुम्ही नर्सरीतून गुलाबाचे रोप आणले असेल, तर ते त्याच पिशवीमध्ये न ठेवता लगेच कुंडीत लावावे. 

 

२. शेणाचा उपयोगजर गुलाबाला चांगली फुले येत नसतील, तर त्याची माती सगळ्यात आधी बदलून टाका. नवी माती टाकताना कुंडीत सगळ्यात खाली थोडी वाळू टाका. त्यानंतर माती टाका. या मातीत थोडे शेणदेखील टाकावे. गुलाबाच्या रोपांसाठी शेण हे सगळ्यात चांगले खत समजण्यात येते. कुंडीतली माती कडक होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. माती कडक झाली आहे, असे वाटले तर ती हलक्या हाताने उकरून भुसभुशीत करून घ्या. 

 

३. गुलाबासाठी असे बनवा खतगुलाबाच्या रोपांसाठी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने खत बनविता येते. वाळलेले शेण आणि संत्री, लिंबू, मोसंबी अशा फळांची साले एक बादली पाण्यात दोन ते तीन दिवस राहू द्या. यानंतर या पाण्यात अर्धा बादली चांगले पाणी टाका आणि हे पाणी गुलाबाच्या झाडांना द्या. पानांवर देखील हे पाणी शिंपडा. हा प्रयोग आठवड्यातून एकदा केला तर तुमचे गुलाबाचे झाड नेहमीच आकर्षक फुलांनी बहरलेले असेल. 

 

४. डाळ- तांदूळाचे पाणी टाकाकुकर लावताना जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ धुतो तेव्हा ते पाणी सरळ सिंकमध्ये टाकून देतो. हे पाणी तुम्ही झाडांना द्या. बटाटे उकडलेले पाणीही थंड झाल्यावर गुलाबाच्या झाडाला टाकावे. या पाण्यातून झाडांना अनेक पोषणमुल्ये मिळतात, ती त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. 

५. कडक उन्हात ठेवू नकागुलाबाचे रोपटे कधीच कडक उन्हात ठेवू नका. अनेक झाडांच्या वाढीसाठी ऊन लाभदायी असते. पण गुलाबासाठी अगदी कडक उन चांगले नाही. त्यामुळे तुमच्या गुलाबाच्या कुंडीवर जर थेट कडक ऊन येत असेल, तर त्याची जागा बदला. या झाडाला दिवसातला काही काळ ऊन मिळाले तरी ते पुरेसे ठरते.  

टॅग्स :बागकाम टिप्स