Join us  

प्रिटी झिंटाच्या अंगणातल्या लेकुरवाळ्या केळीचा घड व्हायरल; अंगणात-छोट्या जागेत लावावी का केळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 5:08 PM

घरच्या घरी आपणही लावू शकतो केळीची झाडं, आपण लावलेली फळं खाण्याची मजाच न्यारी

ठळक मुद्देघराच्या आजुबाजूला थोडी जागा असेल आणि तुम्हालाही केळी लावायची असतील तर काय करावे याविषयी...आरोग्यासाठी उपयुक्त असणारी केळी घरच्या घरी पिकवणे शक्य आहे...

केळ्याचं झा़ड तुम्ही घरात लावू शकता आणि त्याला भरपूर केळ्याचे घड लागतात असं कोणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा हिने तिच्या घराच्या अंगणात केळ्याची रोपे लावली आहेत. इतकेच नाही तर या रोपांची काही दिवसांतच मोठी झाडे झाली असून त्यांना केळ्याचे घडच्या घड लगडल्याचे दिसते. प्रितीने या झाडाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. इतकेच नाही तर या झाडाविषयी आणि केळ्यांविषयी ती भरभरुन बोलताना एका व्हिडियोमध्ये दिसत आहे. प्रिती म्हणते  तीन वर्षांपूर्वी आम्ही केळीचे रोप लावले, त्याला आता फळे येत आहेत. हे सांगताना प्रितीच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला व्हिडियोमध्ये दिसत आहे. काही दिवसांपासून आम्ही मुलांबरोबर घरी होतो. त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या योजना, प्रवास, कार्यक्रम पुढे ढकलले. या झाडांना वाढवताना, मोठं होताना पाहणं यासारखा दुसरा आनंद नाही असंही प्रितीने या पोस्टमध्ये लिहीलेले आहे. तिच्या या कामाचे नेटीझन्सनी भरभरुन कौतुक केले आहे. 

तिच्या घराच्या अंगणात आलेल्या केळ्याचा घड दाखवत प्रिती सांगते तुम्ही रोपे लावली आणि त्यांची प्रेमाने काळजी घेतली तर ती तुम्हाला गोड गोड फळे देतात. हेल्दी आणि ऑरगॅनिक फळे लागतात, या केळ्याच्या झाडाचा मला अभिमान वाटत आहे असेही प्रिती सांगते. एकदा केळ्याच्या झाडाला केळी आली की ते झाड मूळापासून कापले जाते, मग पुन्हा ते झाड येते आणि त्याला केळी लागतात. ही माझी घरची शेती आहे आणि आता या केळ्यांचा मी बनाना मिल्कशेक आणि आणखी काय काय करणार असल्याचे प्रिती सांगते. अवघ्या ५ दिवसांत प्रितीने केलेल्या या पोस्टला ७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याआधीही प्रितीने तिच्या घरच्या शेतीत सिमला मिर्ची, टोमॅटो यांसारख्या कित्येक गोष्टी पिकवल्या आहेत.

केळी आपल्याकडे प्रामुख्याने खाल्ले जाणारे फळ आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे हे फळ घरच्या घरी पिकवले तर आपण त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. केळ्याच्या फळात आरोग्यासाठी उपयुक्त असणारे असंख्य घटक असल्याने केळी आवर्जून खायला हवीत. शुभ कार्यासाठीही आपल्याकडे केळीच्या पानांना विशेष महत्त्व असल्याने तुमच्याकडे थोडी जागा असेल तर तुम्हीही केळ्याची रोपे लावून घरच्या घरी केळी पिकवू शकता. आपण शेतीच्या इतके जवळ जाऊ असे आपल्याला कधी वाटले नव्हते असे प्रिती म्हणते. आपण आपल्या आईकडून हे शेतीकाम शिकलो असेही प्रिती सांगते. मागच्याच महिन्यात जय आणि जिया या दोघांची आई अशी प्रितीची नवीन ओळख निर्माण झाली आहे. सरोगसीच्या माध्यमातून या दोघांची आई झाल्यानंतर प्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर केली होती. ५ वर्षांपूर्वी जेन गुडइनफसोबत लग्न केल्यानंतर प्रिती अमेरीकेत स्थायिक झाली आहे. 

कशी कराल घरच्या घरी केळ्याची शेती

१. तुमच्या घराच्या पुढे किंवा मागे छोटे अंगण असेल किंवा तुमच्या इमारतीत थोडी जागा असेल तरी तुम्ही सहज केळ्याचे झाड त्याठिकाणी लावू शकता. 

२. केळ्याचे झाड लावण्यासाठी इतर झाडांप्रमाणे बी ची आवश्यकता नसते. तर केळ्याचे रोप मिळते.

३. इतर झाडांप्रमाणे केळ्याच्या झाडाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. त्यामुळे ही झाडे सावलीत लावावी लागतात. 

४. केळी लावताना त्याची दिशा वगैरे बरेच नियम असतात, ते लक्षात घेऊन केळीची लागवड करायला हवी. 

५. केळी येण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने एकावेळी जास्त रोपे लावल्यास त्याचा फायदा होतो. 

६. केळ्यासाठी चांगल्या प्रतीची काळी माती आवश्यक असून, ती सुपीक असल्यास केळी चांगली वाढते.     

 

टॅग्स :बागकाम टिप्स