Join us  

हॉटेलात जेवायला गेल्यावर तुम्ही काय ऑर्डर करता? बाहेरुन काय मागवता पार्सल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 3:58 PM

बाहेर जेवायला जायचं किंवा पार्सल मागवायचं तर चायनिज ऑर्डर करु म्हणता, पण आपण खातो ते चायनिज कुठून आलं?

ठळक मुद्देतेच तेच चायनीज हो,जिथं मिळणारा सेझवान राईस खाताना तोंड नव्हे तर हात पण लालमलाल होतात

शुभा प्रभू साटम

हॉटेलात गेल्यावर काय मागवता? असा प्रश्न जर शाकाहारी माणसाला विचारला, तर निम्याहून अधिकजणे चायनीजचं नाव घेतील..गंमत म्हणजे आहारविषयक नियम, निर्बंध आवर्जून पाळणारे अनेकजण चायनिज मात्र आवडीने खातात, इतकं की साऊथ इस्ट आशिया किंवा परदेशात गेल्यावर तिथलं चायनिज बघून पहिली प्रतिक्रिया असते,...हे काय, यांच्याकडे पनीर चिली, गोभी मंचुरीयन नाही? हे कसलं चायनीज? हॉंगकॉंग मध्ये अश्या एका मैत्रिणीला, आपण खातो ते अस्सल चायनीज नाही..असं समजवताना शर्थ करावी लागली होती, इतकं हे इंडो चायनीज आपल्या अंगवळणी पडलेय..भारताइतकाच प्राचीन इतिहास असणारा हा चीन..इसवीसन १७७०च्या आधीमधी चिनी लोक कोलकात्यात उतरले आणि पुढील इतिहास ठाऊक आहेच..भारतात चायनीज जेवण आणलं ते यांनी..आणि मग पुढे ते भारतभर पसरलं.तमाम शाकाहारी आणि मांसाहारी भारतीय जनतेला आता चायनीज आवडतं. आणि फक्त मोठी शहरे,महानगरे इथंच नव्हे तर दरभंगाच्या गल्लीपासून ते पार दुर्गम भागातही आता चायनीज मिळत नाही असं ठिकाण नाही, उगाच नाही आपल्या लग्नाच्या जेवणात बटाटयाच्या भाजीसोबत पनीर चिली आणि मसालेभातासोबत फ्राईड राईस मिरवतो!भारतात कुठल्याही गोष्टीला तद्दन देशी बनवण्याची एक अदभूत कला आहे,म्हणून इथं वॉशिंग मशीनमध्ये लस्सी होते आणि तंदुरी मोमो मिळतात..

Image : Google

सुरुवातीला ज्या भारतीयाने चायनीज खाल्लं, त्याच्या तिखट खायला चटावलेल्या जिभेला त्यात काहीतरी कमी वाटलं,परत आहार निर्बन्ध, त्यामुळं मग सुक्या चिकन चिलीची ग्रेव्ही झाली,(भातात आमटी दाल कालवून खायची सवय,दुसरं काय),चिकनएवजी पनीर आलं आणि फ्राईस राईसमध्ये फ्लॉवर ..पनीर चिली फ्राय हा पदार्थ निव्वळ भारतीय आणि फ्राईड राईसमध्ये काजू घालून किंमत वाढवणे पण ओन्ली इंडियन!!आता हे रूपांतर एका फटक्यात झालं नाही,सुरुवातीला फक्त कोलकात्यात मिळणारे चायनीज १९६०च्या सुमारास मुंबईत अवतरले.. पण अगदी तुरळक प्रमाणात..पंचतारांकित ठिकाणी,तेव्हाच्या उच्च वर्गाच्या आवडीचे हे चायनीज बघता बघता सामान्य जनतेच्या जिव्हेवर राज्य करू लागले..एकूणच चायनीज पदार्थाला वाटप घाटप लागत नाही,खोलगट वॊक मध्ये,कमीतकमी साहित्यात बोलबोल म्हणताना होते, हे बघून मग ते किफायतशीर पडते हे लक्षात आलं ,आणि चायनीज ठेल्याची संख्या फोफावली.,मुंबईत १९८०पासून वडापाव आणि भुर्जी पावच्या जोडीने चायनीज गाड्या लागू लागल्या ..१किलो तांदुळात १००ग्राम भाज्या घालून भागते, वरून मस्त चिली सॉस मारला की खाणारा पण खुष, हे अर्थकारण कळल्यावर मग ठेचेठेचेवर चैनीज गाड्या दिसू लागल्या.आज परिस्थिती अशी आहे की इंडो चायनीज अशी एक स्वतंत्र शाखा आहे..म्हणजे स्वयंपाकपद्धती.. मला सांगा चीनमध्ये   कुठून आलं पनिर मंचुरीयन , गोभी गार्लिक ,आणि व्हेज हॉट सौर सूप? ही आपली भारतीय करामत हो,बाकी काही नाही..त्या म्याकडोनाल्ड काकाला जिथं आलु टीक्की बर्गर आणायला भाग पाडले आणि व्हेज सुशी प्रसिद्ध केली आपण, तिथं यांची काय बात!

Image : Google

सांगायचा मुद्दा हा की भारतात जे चायनीज मिळते ते भारतीय वळणाचे,भारतीय जिभेला भावणारे आहे..विषय सम्पला..आजही अनेकांचे कम्फर्ट फूड म्हणजे जीवाला सुखावणारे अन्न चायनीज असते ,विशेषतः १९९५च्या पुढची पिढी तर वीकेंड ला चायनीज हा नेम नियम कसोशीने पाळत आलीय..अरे दूर का जाता? सेझवान चटणी आलीय बाजारात!!कनफ्युशीयस चा आत्मा थडग्यात थडथड उडत असेल,किंवा बापडा उडून उडून थकला असेल,हम नही सुधरेगे!!परदेशातून आल्यावर माझे अनेक स्नेही जिभेची तांब काढायला गाडीवर मिळणारे चायनीज खायला पळतात,तेच तेच चायनीज हो,जिथं मिळणारा सेझवान राईस खाताना तोंड नव्हे तर हात पण लालमलाल होतात आणि चीकन लॉलीपॉप विथ ग्रेव्ही असा अदभूत फ्युजन पदार्थ जिथं कुकच्या हातून सिद्ध होतो तिथंच!!त्यामुळंआमची ऑर्डर हीच असणारपनीर चिली फ्राय विथ ग्रेव्हीगोभी मंचुरीयनव्हेज हॉट सौर सूपपनीर लॉलीपॉपव्हेज सेझवान फ्राईड राईस..पनिर घालूनहिंमत असेल तर बदलून दाखवा!!

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्न