Join us  

भाताचे तेच ते प्रकार करुन कंटाळलात? मग हा अस्सल साउथ इंडियन ‘तुप्पा अन्ना’ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 6:04 PM

तुप्पा अन्ना म्हणजे तूप भात किंवा घी राइस. हा भात तयार करण्यास सोपा आणि खाण्यास चविष्ट आणि पौष्टिकही. घरात उपलब्ध असलेल्य सामग्रीतून हा भात तयार करता येण्यासारखा असल्याने आता सूचला आणि लगेच केला या पठडीतला हा पदार्थ आहे.

ठळक मुद्दे भात शिजवला की तो आधी चांगला गार होवू द्यावा. आणि मग परतलेली सामग्री त्यात घालावी.या भातावर तळलेला तांदळाचा, पोह्याचा, नागलीचा किंवा उडदाचा पापड चुरुन टाकावा. आणि सोबत लोणचं खावं.तुप्पा अन्ना करताना तुपासाठी हात थोडा मोकळा सोडावा लागतो.

 रोज संध्याकाळी जेवणाला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. वरण भात, खिचडी, मसाले भात, सांबार भात, लेमन राइस, पुलाव, बिर्याणी हे सर्व प्रकार करुन झाले असतील आणि भाताचा एखादा नवा प्रकार करुन पाहायचा असेल तर दक्षिण भारतातला प्रसिध्द तुप्पा अन्ना हा प्रकार नक्कीच करुन पाहायला हवा. तुप्पा अन्ना म्हणजे तूप भात किंवा घी राइस. हा भात तयार करण्यास सोपा आणि खाण्यास चविष्ट आणि पौष्टिकही. घरात उपलब्ध असलेल्य सामग्रीतून हा भात तयार करता येण्यासारखा असल्याने आता सूचला आणि लगेच केला या पठडीतला हा पदार्थ आहे. फक्त तूप भात असल्यानं तुपासाठी हात थोडा मोकळा सोडावा लागतो.हा भात तयार करायला एक कप शिजवलेला भात, दोन चमचे गावराण तूप, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमच उडदाची डाळ, अर्धा चमचा हरभर्‍याची डाळ, 3 सुक्या लाल मिरच्या, कडीपत्ता, एक कप खोवलेलं नारळ, 8-9 काजू, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग एवढं जिन्नस लागतं.

 

 

तुप्पा अन्ना करण्यासाठी आधी तांदूळ जास्त पाण्यात मोकळा शिजवून घ्यावा. कढईत तूप करावं त्यात मोहरी, उडदाची डाळ, हरभर्‍याची डाळ, काजू टाकून दोन मिनिटं परतावेत.

 

 

तडका चांगला लालसर झाला की गॅस बंद करावा. दुसर्‍या एका कढईत थोडं तूप घेऊन त्यात कडी पत्ता, सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ आणि खोवलेलं खोबरं टाकावं. ही सर्व सामग्री तीन ते पाच मिनिटं परतावी.आता सर्व सामग्री शिजवलेल्या भातात घालून ती चांगली मिसळून घ्यावी. तीन ते चार मिनिट मंद आचेवर भात हलवत राहावा. हा तुप्पा अन्ना करताना एक बाब लक्षात ठेवावी की भात शिजवला की तो आधी चांगला गार होवू द्यावा. आणि मग परतलेली सामग्री त्यात घालावी. भात गरम असला की तो चिकट होतो आणि चव चांगली येत नाही. भात चांगला परतून झाल्यावर त्यावर एक चमचा तूप घालावं. यामुळे भाताला तुपाचा छान सुगंध येतो आणि स्वादही. या भातावर तळलेला तांदळाचा, पोह्याचा, नागलीचा किंवा उडदाचा पापड चुरुन टाकावा आणि सोबत लोणचं खावं.