Join us

पावसाळी वातावरणात चहा तर हवाच. हे 7 प्रकार आपल्या आवडत्या चहाला चवदार आणि कडक करतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 14:31 IST

 पावसाळा म्हणजे चहाची आवड हक्कानं भागवून घेण्याचा काळ. तेव्हा फक्त आलं, गवती चहा किंवा चहा मसाला एवढ्याच चहाच्या चवींमधे का अडकून राहावं? पावसाळ्यात चहाची आवड चवीचवीनं साजरी करण्यासाठी सात प्रकारचे चहा करता येतात.

ठळक मुद्देगुळाच्या चहाची लज्जतच वेगळी. या चहाची चव, रंग सर्व एरवीच्या चहापेक्षा वेगळं असतं.सुलेमानी चहा हा ब्लॅक टी असून तो केरळमधील मालाबार भागात खूपच लोकप्रिय आहे.रौंगा साह हा चहा त्याच्या रंगानंच आपल्याला प्रेमात पाडतो.

पाऊस आणि चहा हे एक सुंदर समीकरण आहे. एरवीही चहा हवाच असतो. वेळ कोणतीही असो पण चहा म्हटलं की तो प्यावासच वाटतो. बाहेर पाऊस पडत असेल, मस्त पावसाळी हवा असेल तर अशा कुंद वातावरणात गरमगरम चहा प्यावासा वाटतोच. आल्याचा किंवा गवती चहा किंवा चहा मसाला टाकून आपण चहा पितो. पण पावसाळा म्हणजे चहाची आवड हक्कानं भागवून घेण्याचा काळ. तेव्हा फक्त आलं, गवती चहा किंवा चहा मसाला एवढ्याच चहाच्या चवींमधे का अडकून राहावं? पावसाळ्यात चहाची आवड चवीचवीनं साजरी करण्यासाठी सात प्रकारचे चहा करता येतात.हे चहा खास त्यांच्या चवींसाठी ओळखले जातात.

छायाचित्र:- गुगल 

1. गुळाचा चहा

गुळाच्या चहाची लज्जतच वेगळी. या चहाची चव, रंग सर्व एरवीच्या चहापेक्षा वेगळं असतं. हा चहा तयार करणं अतिशय सोपं आहे. साखरेऐवजी या चहात गुळ घालावा. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी. चहा दूध घालून उकळून झाल्यानंतर शेवटी गूळ घालावा. म्हणजे चहा फाटत नाही. गुळाची पावडर मिळते ती चहासाठी वापरल्यास चहा चवदार होतो. गूळ साखरेपेक्षा जास्त गोड असतो. त्यामुळे तो टाकताना चहा जास्त गुळमट होणार नाही याची काळजी घ्यावी. या गुळाच्या चहात पाणी, चहा पावडर, दूध आणि गूळ याशिवाय इतर काहीही लागत नाही. हा चहा केवळ चविष्ट लागतो असं नाही तर तो पौष्टिक असतो आणि पावसाळी हवेत छान औषधी गुणधर्माचाही असतो.

2. सुलेमानी चहा

या चहासाठी चहाच्या पाण्यात दीड इंच दालचिनी, पुदिन्याची पानं, 4-5 लवंगा आणि वेलची, एका कपासाठी एक चमचा साखर आणि अर्धा चमचा चहा पावडर घालावी. हे सर्व घालून चहा चांगला उकळु द्यावा. यात दूध घालू नये. हा ब्लॅक टी केरळमधील मालाबार भागात खूपच लोकप्रिय आहे.

3. रौंगा साह

हा चहा तयार करण्यासाठी आसामची चहा पावडर हवी. जी चहाच्या दुकानात सहज मिळते. हा लाल चहा बिना दुधाचा असतो. पाण्यात चहा पावडर घालून पाण्याला एक चांगली उकळी आली की त्यात साखर आणि तुळशीची पानं घालावीत. या चहाचा लाल रंगच पिणार्‍याला खूप आकर्षित करतो.

छायाचित्र:- गुगल 

4. हळदीचा चहा

हा चहा तसा सगळ्यांना माहिती आहे. पण हळदीचा उग्र वास चहात कसा लागेल या विचारानं तो पिण्यास टाळला जातो. खरंतर या चहाची हळदीमुळे चव वाढते. हा चहा करणं सोपं आहे. हा चहा ठेवतान दूध आणि चहा पावडर सोबत थोडी हळदही घालायची. या चहात साखरेऐवजी गुळ घालावा. हा चहा एकाच वेळी चविष्ट आणि आरोग्यदायी होतो. हा चहा पावसाळ्यात केवळ चवीसाठी म्हणून नाही तर आरोग्य राखण्यासाठी अवश्य प्यायला हवा.

5. तुळशीचा चहा

पावसाळी हवेत बर्‍याच जणांना सर्दी खोकला होतो. तेव्हा यावर चहाच्या माध्यमातून उपाय करायचा म्हटलं तर तुळशीचा चहा उत्तम असतो. तुळशीचा उग्र स्वाद सर्दी कमी करण्यास मदत करतो. फक्त चहा करताना तुळशीच्या पानांचा अतिरेक करु नये. औषधापुरती आवश्यक एवढीच पानं घालावीत.

छायाचित्र:- गुगल 

6. मसाला चहा

मसाला चहा म्हटलं की चहाची तल्लफ लागतेच. हा मसाला चहा वेगवेगळे मसाले घालून बनवला जातो. मसाल्यांमुळे हा चहा मस्त कडक गुणाचा आणि चविष्ट होतो. मसाला चहा तयार करण्यासाठी दुकानातून खास मसाला चहा अशी पावडर मिळते ती आणावी. किंवा बडिशोप, वेलची, लवंग,दालचिनी, आलं, मिरे हे सर्व चहा किती आहे या प्रमाणात घेऊन ते कुटून चहात टाकावेत. चहा चांगला उकळला की मग प्यावा. हा मसालेदार चहा म्हणजे मेजवानीच आहे.

7. लवंग -वेलची चहा

हा अतिशय लोकप्रिय चह आहे. इतर कोणते मसाले नसले तरी चालतात. पण लवंग आणि वेलची चहाला मसालेदार करतातच. पावसाळ्यात रोजचा चहा करताना चार लवंगा आणि एक वेलची कुटुन घालवी. ते अख्खे चहात टाकले तर त्याचा स्वाद नीट उतरत नाही म्हणून ते कुटून घालावेत.पावसाळ्यात रोज एक प्रकारचा चहा करुन सात दिवस वेगवेगळ्या चवीचा चहा पिण्याची ही चांगली संधी आहे. ती चहावर प्रेम असणार्‍यांनी तर अजिबातच दवडू नका. आपली आवडती गोष्ट वेगवेगळ्या रुपात आणि स्वादात चाखायला मिळाली तर त्यामुळे होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का?