Join us  

इडली ढोकळा हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? नावाइतकाच चवीला भन्नाट, फ्यूजन इडली ढोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 2:54 PM

इडली करु की ढोकळा असा पेच सुटत नसेल तर सरळ ट्राय करा एक भन्नाट फ्यूजन रेसिपी. इडली ढोकळा. तोंडाला पाणी सुटण्यासाठी बस नाम ही काफी आहे. कसा करायचा हा पदार्थ?

ठळक मुद्देइडली ढोकळा या आगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य म्हणजे वेटलॉससाठी हा पदार्थ उपयुक्त आहे, कारण यात कमी कॅलरीज असतात. या पदार्थाची तयारी करायला अजिबात वेळ लागत नाही. जेव्हा बनवायचं तेव्हाच तयारीला लागायचं अशी सूट हा पदार्थ देतो. वाफवलेल्या इडल्यांना ढोकळ्यासाठीचा तडका लावला की इडल्या ओलसर होवून इडली ढोकळ्याला मसत आंबट गोड चव येते.Images: Google

 रविवार किंवा सुटीचा दिवस, आता येणारी दिवाळी सुटी म्हणजे सर्व निवांत मामला. निवांतपणे उठणं, आवरणं, आवडीचं काहीतरी करुन खाणं आणि आराम. अनेकजणी नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करण्यासाठी राखून ठेवतात. मग ती अवघड असू दे की सोपी, झटपट होणारी असू दे की तासनतास लागणारी असू देत,  काहीतरी हटके खावंसं वाटतंच. आणि नाहीच जमलं वेगळं काही करायला तर बर्‍याच दिवसात  इडली ढोकळ्यला पसंती दिली जाते. मनात इडली करु की ढोकळा असा पेच असेल तर दोघांपैकी कोणालाच न डावलता एक चविष्ट पदार्थ करता येतो. इडली ढोकळा . ही एक फ्यूजन रेसिपी आहे. ऐकूनच उत्सुकता निर्माण करणारा हा पदार्थ करायला फार वेळ लागत नाही आणि कष्टही पडत नाही. एका फ्यूजन रेसिपीने रविवार साजरा करायचा असल्यास इडली ढोकळा करुन पहाच.

Image: Google

इडली ढोकळा करताना बेसन, रवा, काही मसाले, फ्रूट सॉल्ट एवढ्याच सामग्रीची गरज असते. इडली ढोकळा या आगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य म्हणजे वेटलॉससाठी हा पदार्थ उपयुक्त आहे, कारण यात कमी कॅलरीज असतात. हलका फुलका, टेस्टी आणि आगळा वेगळा नाश्ता म्हणून इडली ढोकळा हे फ्यूजन मजा आणतं, भूक भागवतं, सुट्टीच्या दिवशी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा पूर्ण करतं आणि नवीन काही तरी केल्याचं समाधानही देतं.

कसा करणार इडली ढोकळा?

इडली ढोकळा करण्यासाठी तयारीत निम्मा उत्साह अजिबात गायब होत नाही. कारण या पदार्थाची तयारी करायलाअजिबात वेळ लागत नाही. जेव्हा बनवायचं तेव्हाच तयारीला लागायचं अशी सूट हा पदार्थ देतो. इडली ढोकळा करण्यासाठी अर्धा कप बेसन, अर्धा कप रवा, अर्धा कप दही, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा मोहरी, किसलेलं ओलं नारळ, फ्रूट सॉल्ट, थोडं तेल, पाणी, मीठ एवढंच साहित्य लागतं.

Image: Google

इडली ढोकळा करताना एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, किसलेलं आलं, दही, हिंग, तेल, मीठ, चिरलेली हिरवी मिरची घ्यावी. पाणी घालून ढोकळा करण्या इतकं मिश्रण पातळं करावं. नंतर यात थोडं फ्रूट सॉल्ट घालावं आणि हे मिश्रण फेटून घ्यावं. मिश्रण फेटतानाच इडलीच्या कुकरमधे पाणी उकळायला ठेवावं. मिश्रण फेटूऩ झालं की इडली पात्रात हे मिश्रण घालून ते वाफवायला ठेवावं. इडलीला जितका वेळ वाफवतात तितका वेळ वाफवावं. नंतर तडका करण्यासाठी छोट्या कढईत थोडं तेल घ्यावं. तेल तापलं की त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात पाणी घालावं. पाणी उकळलं की त्यात मीठ आणि साखर घालावी. वाफवलेल्या इडल्या काढून घ्याव्यात. आणि त्यावर हा तडका घालून भिजवाव्या. थोड्या वेळानं तयार इडली ढोकळ्यावर बारीक किसलेलं ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास तडक्यामधे बारीक चिरुन कढीपत्ता घालावा. सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स म्हणून इडली ढोकळा हा फ्यूजन पदार्थ मजा आणतो.