Join us  

संकष्टी चतुर्थी स्पेशल : करा फक्त १० मिनिटांत होणारे साबुदाण्याचे मोदक, पौष्टिक आणि पचायलाही हलके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 8:00 AM

संकष्टी चतुर्थी स्पेशल : मोदक आवडतात ना, मग हा मोदकांचा प्रकार नक्की करा.

साबूदाणा भिजवला का? संकष्टी चतुर्थी असली की हा प्रश्न विचारला जातोच. उपवास म्हंटलं की साबुदा‌णा खिचडी तर हवीच. आणि सोबत हवे रात्री नैवैद्याला मोदक. मात्र आपल्या कामाच्या व्यापात उकडीचे काय आणि तळणीचे काय मोदक करणं शक्य होतंच असं नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण तात्पुरते पेढ्याचे मोदक आणतो आणि नैवैद्य दाखवतो. काजू बदामाचेही ते. पण अगदी १० मिनिटांत मस्त मऊ आणि वेगळ्या चवीचे पण पौष्टिक मोदक करता येतात असं सांगितलं तर?आणि ते ही साबुदाण्याचे मोदक.

(Image :google)

 

कसे करतात साबुदाण्याचे मोदक?

खरंतर अगदी सोपे आहेत. साबुदाणा भिजवायला नको की शिजवायला नको. साबुदाणा, साखर, तूप फक्त हवं. आणि हाताशी १० मिनिटांचा वेळ.साहित्यही सोपं : १ वाटी साबुदाणा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप (गरजेनुसार), १ मोठा चमचा वेलदोडा पूड. 

मोदक करताना.. कढई मध्ये २ चमचा तूप घालून त्यावर साबुदाणा मंद गॅसवर गुलाबी होइपर्यंत भाजून घ्यावा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. त्यामध्ये साखर दळून घालावी, वेलदोडा पूड घालून पीठ मिक्स करून घ्यावे. छोट्या कढई मध्ये तूप गरम करून ते पिठात घालावे. मोदक बांधण्याइतके पीठ मऊ झाले की मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावून त्यात हे पीठ गच्च भरून मोदक तयार करावे. झाले झटपट मोदक तयार. अगदी रात्री खाल्ले तरीही ते सहज पचतात.

 

टॅग्स :संकष्ट चतुर्थीअन्न