साबुदाणा सगळ्यांना आवडतो. मग त्याचे पापड असू देत की चिवडा, खीर असू देत की थालिपीठ. साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याचे वडे हे म्हणजे सर्वांचेच आवडते पदार्थ. साबुदाण्याचे पदार्थ खायचे म्हणजे सोबतीला उपवास हवा. पण एक पदार्थ असा आहे जो एरवीही खाता येईल आणि तोही साबुदाण्याचा. पोहे हा तर सगळ्यांचा आवडाता पदार्थ. पण साबुदाणा आणि पोह्यांचा काय संबंध?
साबुदाणा पोहे हा एक नाश्त्यासाठीचा एक भन्नाट पदार्थ आहे. उपवास सोडून साबुदाणा खायचा असेल आणि तोही वेगळ्या चवीचा तर मग साबुदाणा पोहे करा. मस्त लागतात. यात आपले नेहेमीचे पोहे नसतात. पण साबुदाणा पोहे हे आपल्या आवडीच्या पोह्यांच्या तोडीस तोड होतात. रोज काय पोहे असं वाटलं तर सरळ साबुदाणा पोहे करावेत.
साबुदाणा पोहे करण्यासाठी आपला नेहेमीचा मोठा साबुदाणा घेऊ नये. बारीक साबुदाणा घ्यावा. सोबत टमाटा, हिरवी मिरची, शेंगदाणे, उकडलेले बटाटे (कुस्करुन) , सैंधव मीठ किंवा साधं मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर ,कढीपत्ता, आवडत असल्यास पुदिन्याची पान जीरे, मोहरी आणि तूप
साबुदाणा पोहे करताना..
साबुदाणा पोहे करताना आधी बारीक साबुदाणा धुवून नऊ ते दहा तास भिजवावा. भिजवलेला साबुदाणा चाळणीत घालून पाण्यानं धुवावा. कढईत तूप गरम करावं. त्यात मोहरी आणि जिरे घालावेत. ते तडतडले की कढीपत्ता घालावा, बारीक चिरलेला टमाटा घालावा. त्यानंतर मीठ घालून टमाटा चांगला मऊसर परतून घ्यावा. तो परतत असतानाच हिरवी मिरची घालावी. मिरची परतून घेतली की साबुदाणा आणि उकडून कुस्करलेला बटाटा घालावा. चांगलं पाच ते दहा मिनिटं हे छान परतून घ्यावं. नंतर दोन मिनिटं कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढावी. गॅस बंद केल्यावर त्यावर चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि भाजून ठेवलेले शेंगदाणे घालावेत. हवे तर ते आधी तुपात तळून बाजूला ठेवून नंतरही पोह्यांवर घालता येतात.पुदिन्याची पानं बारीक चिरुन वरुन् टाकल्यास साबुदाणा पोह्यांना छान चव येते. हे असे गरमागरम साबुदाणा पोहे वरुन बारीक शेव घालून खावेत. कोणाला हे साबुदाणा पोहे न आवडणं केवळ अशक्य!