Join us  

पोह्याचं कुरकुरीत कटलेट; कमीतकमी साहित्यात खमंग कटलेट, करा परफेक्ट नाश्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 5:06 PM

वेगळं चटपटीत करायचं तर हातात वेळ हवा. म्हणून रविवारवर हे पदार्थ ढकलले जातात. पण पोह्याचं कटलेट आपल्या वर्किंग डे ला सुध्दा धावत पळत लवकर जमतात. हे कटलेट खाऊन मूडही छान होतो.

ठळक मुद्देकटलेटसाठी पोहे धुवून थोडे कोरडे होवू द्यावेत.कटलेटसाठीचे बटाटे हातानेच कुस्करावेत.कोथिंबीर आणि पुदिन्याच्या आंबट गोड चटणीसोबत पोह्यांचे कटलेट छान लागतात.

 पोहे, उपमा, डोसे, इडली, थालिपीठ. नाश्त्याला हे पदार्थ खाऊन कंटळा आला की काहीतरी वेगळं हवं अशी मागणी घरातले तर करु लागतातच शिवाय आपल्यालाही काहीतरी वेगळं करायला हवं, खायला हवं असं आवर्जून वाटतं. पण वेगळं काही करायचं म्हटलं की सामानाची यादी करुन ते घेऊन येण्यापर्यंत अनेक कामं असतात. पण घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरुन नवीन चटपटीत पदार्थ करता येतो. पोह्याचं कटलेट हा तो पदार्थ. वेगळं चटपटीत करायचं तर हातात वेळ हवा. म्हणून रविवारवर हे पदार्थ ढकलले जातात. पण पोह्याचं कटलेट आपल्या वर्किंग डे ला सुध्दा धावत पळत लवकर जमतात. हे कटलेट खाऊन मूडही छान होतो.

छायाचित्र- गुगल

पोह्याचं कटलेट करण्यासाठी 2 कप पोहे, 3 उकडलेले बटाटे, अर्धा कप किसलेलं पनीर, अर्धा कप किसलेलं गाजर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काळे मिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेलं/ किसलेलं एक चमचा आलं , 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे मैदा,चार मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप ब्रेडचा चुरा, तेल आणि मीठ एवढी सामग्री घ्यावी.

छायाचित्र- गुगल

पोह्यांचं कटलेट करताना आधी पोहे निवडून धुवून घ्यावे. नंतर दहा मिनिटं पोहे कोरडे होवू द्यावेत. उकडलेले बटाटे साल काढून कुस्करुन घ्यावेत. एका भांड्यात कुस्करलेले बटाटे, भिजवलेले पोहे, गाजर, पनीर, मीठ, मिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घालावा. हे सर्व जिन्नस छान एकजीव करुन घ्यावं. नंतर या मिश्रणाचे कटलेट करुन घ्यावेत. एका भांड्यात मैदा घ्यावा. त्यात पाणी घालून पातळ पेस्ट तयार करावी. पेस्ट करताना त्यात मैद्याच्या गुठळ्या राहायला नकोत. या पेस्टमधे मिरे पूड आणि मीठ घालावं. मग प्रत्येक कटलेट मैद्याच्या या पेस्टमधे बुडवावं. नंतर ब्रेडच्या चुर्‍यात घोळून ते तेलात तळावेत. सोनेरी रंगावर ते तळून घ्यावेत. कोथिंबीर आणि पुदिन्याच्या आंबट गोड चटणीसोबत पोह्यांचे कटलेट छान लागतात.