Join us  

पीनट बटर... बटर आहे तरीही रोज खा! घरी बनवून खाल्लं तर अधिक उत्तम.. ते कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 7:58 PM

पीनट बटरमधील गुणांमुळे हे बटर आरोग्यदायी मानलं जातं आणि म्हणूनच तज्ज्ञ थोड्या प्रमाणात का होईना ते रोज खाण्याचा सल्ला देतात. पीनट बटरमधे असं आहे तरी काय?

ठळक मुद्देपीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनवलं जातं. शेंगदाण्यांमधे जे पोषक तत्त्वं असतात तीच पीनट बटरमधेही असतात.वजन वाढवायचं असू देत किंवा कमी करायचं असू देत पीनट बटर दोन्हींसाठी उपयुक्त असतं.

बटर म्हटलं की तोंडाला पानी सुटतं. बटर घालून किंवा बटर लावून केलेला कोणताही पदार्थ मस्त लागतो. पण म्हणून डेअरी बटर रोज खाणं योग्य नाही. ते रोज खाऊ नका असं म्हटलं जातं. पण पीनट बटरच्या बाबत मात्र उलटं आहे. आरोग्य जपण्यासाठी पीनट बटर मात्र रोज थोडं खा असं तज्ज्ञ सांगतात. हे कसं?

कारण पीनट बटरमधील गुणांमुळे हे बटर आरोग्यदायी मानलं जातं. उलट आता तर डेअरी बटरपेक्षा पीनट बटरला मागणी वाढली आहे ती पीनट बटरच्या पौष्टिकतेमुळेच पीनट बटरमधे प्रथिनं आणि लो फॅट आणि फायबर तत्त्वं असतं. आणि म्हणूनच ते पोळी किंवा ब्रेडला लावून खाल्लं जातं.पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनवलं जातं. शेंगदाण्यांमधे जे पोषक तत्त्वं असतात तीच पीनट बटरमधेही असतात. पीनट बटर थोड्या प्रमाणात रोज खाल्ल्यास त्यामुळे मधुमेह, कॅन्सर आणि रक्त दाबाशी निगडित आजारांचा धोका कमी होतो. डेअरी बटरचं नियमित सेवन हे ह्दयाच्या आरोग्यासाठी घातक मानलं जातं कारण त्यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असतं मात्र पीनट बटरमधील लो कोलेस्ट्रॉलमुळे ते हदयाचं आरोग्य जपतं.

आता पावसाळा तोंडावर आलाय. पावसळ्यात पीनट बटर रोज मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण या काळात बुरशीचे आणि इतर संसर्ग होतात त्यापासून शरीराचं रक्षण करण्याचं काम पीनट बटरमधील पोषक मुल्यं करतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही पीनट बटर उपयोगी ठरतं.

ज्यांना मधुमेह त्यांना डेअरी बटरचं सेवन करण्यास मनाई केली जाते. मात्र पीनट बटरचा समावेश जर मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारात केल्यास ते सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं. शिवाय मधुमेहाचा धोकाही पीनट बटरच्या सेवनानं कमी होतो.

वजन वाढवायचं असू देत किंवा कमी करायचं असू देत पीनट बटर दोन्हींसाठी उपयुक्त असतं. फक्त त्याचं सेवन किती आणि कसं करावं याबाबत एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पण एरवी पीनट बटर खाण्यापासून स्वत:ला रोखण्यापेक्षा ते रोज खाण्याची सवय लावून घ्या हेच खरं.

घरच्याघरी पीनट बटरपीनट बटर हे बाजारात मिळत असलं तरी घरी बनवलेल्या पीनट बटरची चव काही औरच असते. ते घरच्या घरी सहज बनवता येतं.सध्या बाजारात मस्त भूईमूगाच्या शेंगा मिळत आहेत. त्या घरी घेऊन या. पीनट बटरसाठी शेंगा सोलून दोन कप दाणे काढावेत. पाण्यानं स्वच्छ धूवून सुकवून घ्यावे. दाणे सूकले की एका कढईत शेंगदाण्याचं थोडं तेल घ्यावं. ते थोडं गरम करावं. आणि त्यात हे दाणे चांगले भाजावे. भाजलेले दाणे फूड प्रोसेसरमधे वाटून घ्यावेत. वाटताना त्यात एक अर्धा चमचा साखर, एक किंवा दोन चमचे मध आणि चिमूटभर मीठ घालावं. हे जिन्नस चांगले तीन चार मिनिटं वाटले की पीनट बटर तयार होतं. हे पीनट बटर बाहेर मिळणाऱ्या पीनट बटरपेक्षाही चविष्ट आणि पौष्टिक असतं.