Join us  

उपवासाला कुणी पराठा खातं का? बटाटा -भगरीचा चटपटीत उपवास पराठा करुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 3:33 PM

मारवाडी पध्दतीचा बटाटा भगरीचा पराठा बनवण्याची पध्दती वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि चवही भन्नाट आहे.

ठळक मुद्दे हा पराठा करण्यासाठी भगर मिक्सरमधून बारीक करुन त्याची उकड घ्यावी लागते.पराठा लाटताना तो बारीक केलेल्या भगरीच्या पिठावरच लाटावा. लाटताना भेगा पडल्याप्रमाणं दिसू शकतं. पण या भेगा हातानं दाबल्या तरी चालतात.

नवरात्रीच्या उपवासाचे पहिले एक दोन दिवस चव, भूक याबाबत काही विशेष वाटत नाही. पण जसजसे उपवासाचे दिवस पुढे सरकतात, तसं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. उपवासाचे कितीही पदार्थ करता येत असले तरी त्यात रोजच्या स्वयंपाकात जसे मसाले वापरतो तसे उपवासाच्या पदार्थात वापरता येत नाही. पण उपवास असूनही आपली चटपटीत खाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यासाठी मारवाडी पध्दतीचा बटाटा भगरीचा पराठा करुन पाहा. हा पराठा बनवण्याची पध्दतही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि चवही भन्नाट आहे. उपवासाला फराळ केल्यानंतरही थोड्या वेळानं भूक लागल्यासारखं वाटतं ते हा बटाटा भगरीचा पराठा खाऊन होत नाही. या पराठ्यामुळे पोट भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं.

Image: Google

उपवासाचा बटाटा पराठा

उपवासाचा बटाटा पराठा करण्यासाठी 4 उकडलेले बटाटे, एक वाटी भगर, 4 हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, जिरे, सैंधव मीठ , पाणी, तूप आणि कोथिंबीर हे जिन्नस घ्यावं.बटाटा पराठा करताना भगर आधी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी आणि बटाटे उकडून ठेवावेत. कढईत थोडं तूप गरम करावं. तूप गरम झालं की त्यात जिरे घालावेत. त्यानंतर वाटलेली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घालावं. फोडणीत भगरीच्या दुप्पट पाणी घालावं.पाण्याला उकळी आली की त्यात सैंधव मीठ घालावं. नंतर मिक्सरमधून वाटलेली भगर टाकावी. भगर टाकल्यानंतर मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. भगर फोडणीत एकजीव झाली की यात उकडलेले बटाटे किसून घालावेत. कुस्करलेला बटाटा भगरीच्या मिश्रणात चांगला एकजीव करुन घ्यावा. मिश्रण उकड घेतलेल्या पिठासारखं घट्ट होतं. गॅस बंद करुन या मिश्रणावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावं. ते थंड होवू द्यावं. थंड झालं की हाताला थोडंसं तेल लावून बटाटा भगरीचं पीठ चांगलं मळून घ्यावं.

Image: Google

पराठे करताना पिठाची एक छोटी लाटी घेऊन भगरीच्या वाटलेल्या पिठात घोळवून ती पोळपाटावर लाटावी. पराठा लाटताना बाजूने भेगा पडल्याप्रमाणं दिसू शकतं. पण या भेगा हातानं दाबल्या तरी चालतात. जर पराठा छान गोल गरगरीतच आवडत असेल तर एका मोठ्या वाटीच्या सहाय्यानं लाटलेया पोळीतून गोल पराठा कापून घ्यावा. आपण एरवी जसे पराठे शेकतो त्याप्रमाणे पराठे शेकावेत. पराठे शेकताना दोन्ही बाजूने तूप लावून शेकावेत.उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नेहेमीच्याच जिन्नसातून चटपटीत पदार्थही करता येतात. बटाट्याचा पराठा हा असाच एक भारी चवीचा पदार्थ आहे. करुन तर पाहा.