Join us  

मसाला चाय पीओ तो जानो! मसाला चहाचे 7 जबरदस्त फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 6:18 PM

सर्व प्रकारच्या चहात मसाला चहाची गोष्टच न्यारी. या चहात घातल्या जाणार्‍या मसाल्यांमुळे तरतरी येते, मूड फ्रेश होतो,रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षणही होतं.

ठळक मुद्देसांधेदुखीचा त्रास असल्यास दिवसातून दोनदा आलं घातलेला चहा घेतल्यास फायदा होतो.तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. चहात तुळशीची पानं टाकल्यामुळे मनावरचा ताण एकदम निघून जातो. मासिक पाळीमधे पोटदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो. या त्रासातून आराम मिळावा यासाठी मसाला चहाचा उपयोग होतो.

मसाला चहाचं नाव काढलं की वेळ कोणतीही असो चहा प्यावासा वाटतोच. मसाला चहाचा सुंगध, त्याचा कडकपणा यामुळे जी तरतरी येते त्याला तोड नाही. पण मूड फ्रेश करण्यासोबतच या मसाला चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. चहा हा आरोग्याल घातक आहे असं म्हटलं जातं. पण तो केव्हा जेव्हा तो चुकीच्या पध्दतीने बनवला जातो आणि अति प्रमाणात प्यायला जातो तेव्हा. पण मसाला चहाची गोष्टच न्यारी. या चहात घातल्या जाणार्‍या मसाल्यांमुळे तरतरी येते, मूड फ्रेश होतो ,रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षणही होतं.मसाला चहा पिण्याचे फायदे समजून घेतानाच मसाला चहा करण्याची योग्य पध्दतही समजून घ्यायला हवी.

छायाचित्र- गुगल

मसाला चहा करताना..

मसाला चहा करताना आधी भांड्यात एक कप पाणी उकळायला ठेवावं. त्यात थोडंसं आलं किसून घालावं. अर्धा चमचा चहापावडर घालून चहाच्या पाण्याला उकळी आणावी. चहा उकळल्यावर त्यात तयार चहाचा मसाला घालू शकता किंवा घरगुती मसाले वापरुन चहा मसालेदार करता येतो. यासाठी वेलची, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तुळशीची पानं , थोडंसं जायफळ आणि गवती चहा घालून चहाचं पाणी उकळावं. मसाला चहा करताना साखर आणि दूध एकदम कमी प्रमाणात वापरायला हवं. तरच हा मसाला चहा आरोग्यदायी होतो.

छायाचित्र- गुगल

मसाला चहा आरोग्यदायी कसा?

1.मसाल चहा आरोग्यदायी होतो तो या चहात घातलेल्या विविध मसाल्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे. चहात किसलेलं आलं टाकल्यामुळे चहाला चव तर येतेच शिवाय सर्दी, खोकला, ताप अथवा डोकंदुखी असल्यास आरामही मिळतो. सांधेदुखीचा त्रास असल्यास दिवसातून दोनदा आलं घातलेला चहा घेतल्यास फायदा होतो.

2. चहात वेलची टाकल्यास पचनास चांगला फायदा होतो. अँसिडिटीचा त्रास होत नाही.

3. हवामान थंड असल्यास मसाला चहा करताना त्यात काळीमिरी, लवंग घालावी. या दोन मसाल्यांच्या पदार्थांमधे भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

4.  ऋतू कोणताही असो मसाला चहात दालचिनी अवश्य घालावी. यामुळे चहाला स्वाद आणि गंध तर येतोच शिवाय दालचिनीमुळे खोकला अथवा कफाचा त्रास होत नाही.

छायाचित्र- गुगल

5. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. चहात तुळशीची पानं टाकल्यामुळे मनावरचा ताण एकदम निघून जातो. म्हणून तणावमुक्तीसाठी तुळस घातलेला मसाला चहा घ्यावा.

6. मासिक पाळीमधे पोटदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो. या त्रासातून आराम मिळावा यासाठी मसाला चहाचा उपयोग होतो.

7. मसाला चहा करताना फॅटी फ्री दूध वापराव. आणि चहात साखर थोडी घालावी. दिवसातून दोनदा मसाला चहा घेणं हे योग्य मानलं जातं. पण त्यापेक्षा जास्त वेळा चहा घेणं हे नुकसानकारक ठरु शकतं. माहिती असूनही जास्त वेळा मसाला चहा घ्यावासा वाटला तर किमान दूध आणि साखर यांचं प्रमाण एकदम वजा केलं तर उत्तम.