Join us

ताकाची कढी तर करतोच पण आंब्याची कढी खाल्ली आहे का? सिझन संपण्यापूर्वी खाऊन पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:51 IST

कढी ही ताकाचीच असते. पण आंब्याची कढी देखील केली जाते. मूळ गुजरातचा असलेला हा प्रकार बाजारातून आंबे संपायच्या आत करुन खाऊन बघायला हवा. ही आंब्याची कढी करायची कशी?

ठळक मुद्देआंब्याच्या कढीत आंब्याचा रस, कैरीचा गर आणि ताक हे मुख्य घटक असतात.आंब्याची कढी पोळी, भात किंवा गरम गरम नुसतीच खायलाही छान लागते.

ताकाची कढी सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या भारतात तर प्रांतानुसार ही कढी बनवण्याचे प्रकार आहेत. सिंधी कढी, बटाटा कढी, कांदा आणि मटाराची कढी, भोपळ्याची सांबार कढी, कढी पकोडे, कढी गोळे, सोयाबीन कढी असे अनेक प्रकार ऐकून, खाऊन माहिती असतात .पण आंब्याची कढी हा कढीचा प्रकार खाल्ला आहे का? मूळ गुजरातची असली तरी ती इतर प्रांतातही त्यांच्या त्यांच्या वैशिष्ट्यांसह केली जाते. या कढीला आंब्याचा असलेला स्वाद हे त्याचं खास वैशिष्ट. अजून बाजारात आंबे आहेत. ही कढी शिकून घ्या आणि करुन पहा!

आंब्याच्या कढीसाठी काय हवं?

एक कप आंब्याचा रस, एक कप उकडलेल्या कैरीचा गर, एक कप ताक, पाव कप बेसन, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, फोडणीसाठी दीड चमचा तेल, अर्धा चमचा जिए, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा मोहरी,कढीपत्ता, दोन तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यातडक्यासाठी एक चमचा तेल, एक चमचा बारीक चिरलेलं आलं, एक काश्मिरी मिरची, थोडी कोथिंबीर, मेथीची पानं.

आमरस कढी कशी करायची?

एका भांड्यात आंब्याचा रस, कैरीचा गर आणि ताक एकत्र करा. ताकातच बेसन कालवून ते चांगलं फेटून घ्यावं. नंतर त्यात हळ्द, तिखट आणि हिंग घालावा. कढईत तेल गरम करावं, त्यात जिरे टाकून तडतडू द्यावेत. नंतर त्यात मेथ्या, मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकावा. आंबा-कैरी-ताकाचं मिर्शण हलवून फोडणीत घालावं. मंद गॅसवर हे मिश्रण उकळू द्यावं. नंतर त्यात परत थोडं ताक घालावं. मिश्रण जर घट्ट वाट्लं तर आणखी थोडं ताक घालावं. परत सात आठ मिनिटं कढीला उकळी आणावी. मग एक छोटी कढई घेऊन त्यात थोडं तेल गरम करावं. त्यात बारीक तुकडे केलेलं आलं आणि काश्मिरी मिरचीचे तुकडे टाकावेत. नंतर कोथिंबीर आणि थोडी बुंदी घालावी. हा तडका तयार कढीवर घालावा. ही कढी पोळी, भात किंवा नुसती खाण्यासही छान लागते.