Join us  

आता घरच्या घरी बनवा मॅगी मसाला, घरी करायला अगदी सोपा आणि चटपटीतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:40 PM

रटाळ भाज्यांनाही चविष्ट करणारा मॅगी मसाला हा घरच्या घरी अगदी सोप्या पध्दतीने आणि उपलब्ध सामग्रीतून तयार करता येतो.

ठळक मुद्देमॅगी मसाल्यात टाकण्यात येणारा अख्खा मसाला भाजण्याआधी कडकडीत उन्हात किमान दोन तास तरी वाळवून् घ्यावा. 

  रोजच्या भाज्या वेगळ्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच चवीच्या भाज्या  खाऊन सगळेच कंटाळतात. आता रोजच्याच भाज्यांना चव आणण्याची एक युक्ती महिलांनी शोधून काढली आहे. ती म्हणजे दुकानातून मॅगी मसाला आणून ठेवायचा आणि तो भाज्यांवर भुरभुरुन त्या चविष्ट करायच्या. भाज्यांना चविष्ट करणारा मॅगी मसाला हा घरच्या घरी अगदी सोप्या पध्दतीने आणि उपलब्ध सामग्रीतून तयार करता येतो. तो कसा?

मॅगी मसाला तयार करण्यासाठी काय लागतं?

3 मोठे चमचे कांद्याची पावडर, 3 मोठे चमचे लसणाची पावडर, अडीच चमचे कॉर्न फ्लोर, 10 मोठे चमचे पीठी साखर, 2 मोठे चमचे आमचूर , दीड चमचा सुंठ पावडर, 3 मोठे चमचे चिली फ्लैक्स, 1 मोठा चमचा हळद, 2 मोठे चमचे जीरे, 3 मोठे चमचे काळे मिरे, 1 मोठा चमचा मेथ्या, 3 ते 4 अख्ख्या लाल मिरच्या, 2 मोठा चमचा अख्खे धने, 2 तमालपत्रं, चवीनुसार मीठ.

मसाला कसा तयार करणार?

सर्वात आधी जिरे, मेथ्या, तमालपत्रं, धने, अख्या मिरच्या, मिरे दोन तास कडक उन्हात वाळवून घ्यावेत. यामुळे त्यांच्यात असलेला ओलसरपणा निघून जातो. मसाले भाजायला घेताना कढई आधी गरम करावी. कढई गरम झाल्यावर उन्हात वाळवलेली सर्व मसाल्याची सामग्री टाकून ती चार ते पाच मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यावी.भाजलेले मसाले एका ताटात काढून घ्यावेत. त्यांना थंड होवू द्यावं. मसाले थंड झाले की ते मिक्सरमधे वाटून घ्यावेत. वाटलेल्या मसाल्यात, कांदा, लसूण पावडर, कॉर्न फ्लोर, आमचूर, पिठी साखर, सुंठ पावडर, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून ते मिश्रण परत बारीक वाटून घ्यावं. हा मसाला चाळणीनं चाळून घेतला की तयार होतो घरगुती मॅगी मसाला.