Join us  

थंडीत गाजराचा हलवा खाल्लाच असेल, आल्याचा औषधी-चविष्ट हलवा खाऊन पाहा!-आगळीवेगळी स्विट डिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 6:36 PM

आल्याचे औषधी गुणधर्म आणि चवीला रुचकर असा हा थंडीत अवश्य खावा असा पदार्थ आहे.

ठळक मुद्देथंडीच्या दिवसांत नक्की उपयुक्त अशी पाककृती.

प्रतिभा जामदार

थंडीत आल्याचा वापर आपण करतोच. आल्याचा चहा आवडतोच. याशिवाय अनेक पदार्थांतही आपण आलं घालतो. मात्र आल्याचा हलवा सहसा केला जात नाही. थंडीत गाजर हलवा आवडीने खाल्ला जातो, तसाच हा आल्याचा हलवाही करता येईल. चवीला उत्तम आणि आल्याचा औषधी गुणधर्म असलेला रुचकर हलवा. थंडीच्या दिवसांत नक्की उपयुक्त अशी पाककृती. सोपी पद्धत.आल्याचा हलवा थंडीत अवश्य खाऊन पहा..

साहित्य- वाटी ताजे ओले आले सालं काढून तुकडे करून घेतलेले, १ वाटी साखर, १ वाटी दूध, १ वाटी खवा, २ चमचे वेलदोडा पूड.

(Image : Google)

कृती- आलं मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्यावी. लागलं तर थोडं पाणी घालून वाटावं. २ चमचे तूप बाजूला ठेवून उरलेलं तूप गरम करून मंद गॅसवर ही असल्याची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यावी. आल्याचा रंगही बदलेल आणि बाजूने तूप सुटू लागेल. त्यामध्ये १  वाटी दूध घालून मिश्रण एकजीव करून झाकण ठेवून शिजू द्यावं. ७-८  मिनिटानंतर दूध सुटल्यावर त्यात १ वाटी साखर घालून मिक्स करावी. मिश्रण परत पातळ होईल. ते तसेच मंद गॅसवर परतत राहून त्याचा गोळा होऊ द्यावा. दुसऱ्या पॅनमध्ये २ चमचे तुपावर गुठळ्या मोडून खवा हलका सोनेरी होइपर्यंत परतून मऊ करून घ्यावा. शिजलेल्या आल्याच्या हलव्यामध्ये हा खवा व्यवस्थित मिक्स करावा. चांदीचा वर्ख लावून सजवावा.थंडीच्या दिवसात आवर्जून खाण्यासारखा औषधी गुणधर्म असलेला हलवा अतिशय रुचकर लागतो. स्विट डिश म्हणूनही वेगळा खास पदार्थ.

 

(प्रतिभा जामदार यांच्या संध्याई किचन या यूट्यूबवरही अशा खास पाककृती पाहता येतील.)

टॅग्स :थंडीत त्वचेची काळजीअन्न