Join us  

How to make Methi Kadhi: थंडीत वाफाळत्या भातासोबत खा पौष्टिक ' मेथीची कढी'! खास रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 6:25 PM

मोठी मेथीची जुडी आणली की भाजीला वापरुनही मेथी उरतेच. अशावेळी उरलेल्या मेथीचं काय करावं बरं असा प्रश्न पडतो. पण हा प्रश्न सोडवणं खूपच सोपा आहे. कडसर उग्र चवीच्या मेथीचा कोणताही पदार्थ चविष्टच लागतो.

ठळक मुद्देमेथीची कढी करताना ताज्या मेथीच्या पानांसोबतच फोडणीत मेथ्याही घालाव्यात.मेथीची कढी घट्टसरही छान लागते. तशी हवी असल्यास बेसनपिठाचं प्रमाण वाढवावं.कढी मुळातच आरोग्यदायी असते. त्यात जर चिरलेली मेथी घातली असेल तर मग तिचा स्वादही वाढतो आणि पोष्टिकताही.

थंडी म्हटली की बाजारात जाऊन भाज्या आणायलाही मजा येते. हिरव्यागार भाज्या, निरनिराळ्या रंगाच्या भाज्या पाहूनच मन तृप्त होतं. पालेभाज्यांमधे ऑल टाइम फेव्हरिट भाजी म्हणजे मेथीची भाजी. थंडीत तर या मेथीचा रुबाब आणखीनच खुलतो. मस्त मोठ्या पानांची हिरव्यागार मेथीच्या मोठ्याला जुड्या स्वस्तात मिळतात. मोठी मेथीची जुडी आणली की भाजीला वापरुनही मेथी उरतेच. अशावेळी उरलेल्या मेथीचं काय करावं बरं असा प्रश्न पडतो. पण हा प्रश्न सोडवणं खूपच सोपा आहे. कडसर उग्र चवीच्या मेथीचा कोणताही पदार्थ चविष्टच लागतो. थंडीत गरमागर भातासोबत चविष्ट पण वेगळं काही खाण्याची इच्छा असेल तर मेथीची कढी हा उत्तम पर्याय आहे. सुटीच्या दिवशी दुपारच्या जेवणात गरमागरम भात आणि सोबत गरम मेथीची कढी खाल्ली की सुटी सार्थकी लागल्याचा अनुभव येतो.

Image: Google

मेथीची चव तर उत्कृष्ट असतेच सोबतच मेथीमधे जीवनसत्त्वं, खनिजं, अँण्टिऑक्सिडण्टस आणि आरोग्यास फायदेशीर इतर घटकही असतात. म्हणूनच मेथी खाणं आवश्यक असतं. मग तिची भाजी खा नाहीतर कढी.. मेथीची कढी? वाचून कानाला वेगळं वाटत असलं तरी मेथीच्या अनेक प्रकारातला हा एक चविष्ट प्रकार आहे. प्रामुख्याने राजस्थानामधे ही कढी केली जाते. चवीला जबरदस्त लागणारी कढी तयार करणं अगदीच सोपं आहे.

Image: Google

मेथीची कढी कशी करायची?

मेथीची कढी करायला खूप काही सामग्री लागते असं नाही. मेथीची कढी करण्यासाठी 1 कप आंबट दही, 1 कप चिरलेली मेथी, 2 मोठे चमचे बेसनपीठ, 1 चमचा हिरव्य्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा लसणाचे बारीक तुकडे ( थंडीत लसणाची पातही मिळते ती चिरुन टाकावी उत्तम स्वाद येतो. लसणाचे बारीक तुकड्यांऐवजी ही पात वापरावी), चवीपुरतं मीठ, थोडया मेथ्या आणि मोठा चमचा तेल घ्यावं.

मेथीची कढी करताना आधी एका मोठ्या भांड्यात दही घ्यावं. ते फेटावं. त्यात बेसनपीठ घालावं. ही कढी जास्त घट्टही छान लागते. तशी करायची असल्यास बेसनपीठ जास्त घालावं. बेसनपीठ घातल्यानंतर ते दह्यात एकजीव करावं. गुठळी राहू देवू नये. मग यातच हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा.

Image: Google

आधी तेल तापत ठेवावं. ते तापलं की मोहरी आणि मेथ्या घालाव्यात. नंतर जिरे घालावेत. लसणाचे तुकडे/ पात घालून चांगली परतून घ्यावी. ते परतलं गेलं की हिंग घालावा. मग चिरलेली मेथी घालावी. मेथीचा हिरवा रंग बदलेपर्यंत मेथी परतावी. हळद घालावी. दह्याचं मिश्रण घालून ते चांगलं ढवळून घ्यावं. नंतर त्यात मीठ घालावं. कढी जितकी पातळ हवी त्याप्रमाणे त्यात पाणी घालावं. कढीला छान उकळी काढावी. या कढीची चव वाढण्यासाठी थोडी कच्ची मेथी कोथिंबीरसारखी वरुन भुरभुरुन घालावी. ही कढी आणखी चटपटीत करायची असल्यास थोडं तेल तापवून त्यात आख्ख्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून त्याचा तडका उकळत्या कढीला द्यावा. मग या कढीचा स्वाद आणखीनच खुलतो.कढी मुळातच आरोग्यदायी असते. त्यात जर चिरलेली मेथी घातली असेल तर मग तिचा स्वादही वाढतो आणि पोष्टिकताही.